पृथ्वीचा इतिहास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
मागील लेखातच आपण रचनात्मक भूशास्त्राची माहिती घेतली. आता आपण पृथ्वीच्या इतिहासात डोकावून बघू.
 

तिहास! बऱ्याच जणांना कंटाळवाणा वाटणारा विषय! मला स्वत:ला इतिहास हा विषय जरासा, खरं म्हणजे अजिबातच आवडत नाही. कारण, इतिहास म्हटला म्हणजे त्यात सन सनावळी आल्या, कोण, कुणास, केव्हा, काय व का म्हणाले याचे तपशील आले, कुणी कुणाला मारले वा तारले या गोष्टी आल्या आणि मला या गोष्टी लक्षात ठेवणं जरा कठीणच जातं. पण, पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करताना यापैकी कोणताही अडथळा माझ्यासमोर आला नाही. कारण, यापैकी कोणतीच गोष्ट पृथ्वीच्या इतिहासामध्ये लागू पडत नाही. पृथ्वीचा इतिहास हा अनेक मनोरंजक, तसेच संहारक घटनांनी भरलेला आहे. येथेच सृष्टीची सुरुवात झाली व येथेच किती तरी विनाशकारक घटनांनी कित्येक युगांचा शेवट झाला. आता माझे काही या विषयावर प्रभुत्त्व नाही किंवा हा विषय माझ्या प्राथमिक कुतूहलाच्या शाखेच्या (ज्वालामुखीशास्त्र) तसा जवळचा नाही, पण मला याचा अभ्यास करताना नेहमीच मजा येते आणि अनेक मनोरंजक तसेच माझ्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सामान्य ज्ञानाच्या तसेच तांत्रिक गोष्टीही समजतात. याचबरोबर पृथ्वीचा इतिहास हा भूगर्भशास्त्रातील एक महत्त्वाचा विषय आहे व भूगर्भशास्त्रावर लेख लिहिताना याचा अभ्यास आवश्यक आहे.

 

पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ऐतिहासिक भूशास्त्र (Historical Geology) या शाखेत आता आपण शिरणार आहोत. या शाखेचे अनेक पैलू आहेत. कारण, पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करताना संपूर्ण ग्रहाचा एकत्रित (As a Whole) अभ्यास करावा की, तिच्या प्रत्येक अंगाचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा, हे आपल्याला ठरवावे लागते. संपूर्ण ग्रहाचा एकत्रित अभ्यास करताना पृथ्वीचा जन्म, तिच्यात कालांतराने झालेले प्राकृतिक बदल, तसेच तिच्यावर झालेले आघात (उल्कापात, भूकंप, ज्वालामुखी, इ.) इत्यादी गोष्टींचा अभ्यास करता येईल, तर तिच्या प्रत्येक अंगाचा स्वतंत्र अभ्यास करताना कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी कोणते प्राणी अथवा वनस्पती अस्तित्वात होते, कोणत्या वेळी कोणते खडक निर्माण झाले, कोणत्या वेळी कोणते युग सुरू झाले वा संपले या गोष्टींचा अभ्यास करता येईल. प्रत्येक अंगाचा जेवढा स्वतंत्र अभ्यास होईल, तेवढी त्याची खोली व अचूकता वाढेल. आपण पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करताना सुरुवातीला संपूर्ण पृथ्वीचा एकत्रित अभ्यास करू व नंतर तिच्या विविध अंगांचा स्वतंत्र अभ्यास करू.

 

 

पृथ्वीचे वय २४ तासांच्या घड्याळात साधारण असे असेल, छायाचित्र सौजन्य - Google Images, link goes to (https://flowingdata.com/२01२/10/09/history-of-earth-in-२४-hour-clock/)

 
 

आपल्याला माहीतच आहे की, पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते विश्वाचे वय हे सुमारे १३.७ अब्ज वर्षे आहे. एवढ्या प्राचीन विश्वात पृथ्वीचे साडेचार अब्ज वर्षे वय म्हणजे तरुणच म्हटले पाहिजे. सुमारे पाच अब्ज वर्षांपूर्वी आपल्या आकाशगंगेत कुठेतरी एका अतिनवताऱ्याचा (Supernova) स्फोट झाला. त्या स्फोटातून निघालेले मॅटर (Matter) जवळपासच्या वायूच्या ढगांबरोबर एकत्रित झाले. कालांतराने यातील मोठेमोठे तुकडे एकत्र आले व त्यांचे एका फार मोठ्या गोळ्यात रूपांतर झाले. या गोळ्यात स्वत:ची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) सुरू झाली व त्याने केंद्रकीय सम्मिलनाद्वारे (Nuclear Fusion) स्वत:ची ऊर्जा स्वत:च तयार करायला सुरुवात केली. हाच आपल्या सूर्याचा जन्म. याचे वस्तुमान व गुरुत्त्वाकर्षण याच्या आसपासच्या परिसरात सर्वात जास्त असल्यामुळे इतर सर्व तुकडे याच्या अवतीभोवती फिरायला लागले. असे होत असतानाच इतर तुकडेही छोट्या-छोट्या गटांमध्ये फिरायला लागले व यातूनच ग्रहांचा जन्म झाला. पृथ्वी ही यातलीच एक. हे होत असतानाच साधारणपणे मंगळाच्या आकाराच्या एखाद्या तुकड्याने पृथ्वीला धडक दिली व पृथ्वीचा काही भाग व त्या दुसऱ्या तुकड्याचा काही भाग असे पृथ्वीपासून तुटून थोडे दूर जाऊन एका गोळ्यात स्वतंत्रपणे पृथ्वीभोवती फिरायला लागले. यालाच आपण चंद्र म्हणतो. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की, त्यामुळे पृथ्वी थोडीशी कलली व तिच्या अक्षाचा सूर्याशी असलेला ० कोन बदलून तो २३.५ झाला. यामुळे सूर्याच्या जवळ असलेल्या गोलार्धात उन्हाळा, तर सूर्यापासून दूर असलेल्या गोलार्धात हिवाळा सुरू झाला. अर्थात, त्यावेळी पृथ्वीचे तापमानच एवढे जास्त असेल की, उन्हाळा अथवा हिवाळा असल्याने काही विशेष फरक पडला नसेल.

 

पृथ्वी ही तिच्या जन्माच्या वेळी पूर्णपणे अतितप्त गोळ्याच्या अवस्थेत होती. कालांतराने पृथ्वीचा स्वत:चा लोह्याचा गाभा तयार झाला. तसेच ती पृष्ठभागापासून आत हळूहळू थंड होत गेली. यामुळेच पृथ्वीचे कवच किंवा क्रस्ट तयार झाले. दूध तापवल्यावर त्यावर साय कशी जमते तसेच आत पृथ्वी अजूनही तप्तच आहे. म्हणूनच मॅटल हा द्रवरूप आहे. कवच, मॅटल, गाभा अशा रचनेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्लेट टेक्टॉनिक्सची (Plate Tectonics - काँटिनेंटल प्लेट्सची हालचाल - यामुळेच मोठे भूकंप व ज्वालामुखींचे उद्रेक होतात) सुरुवात झाली व यामुळे पृथ्वी ही पृथ्वीसारखी दिसायला लागली. पृथ्वीच्या गाभ्यातून प्रचंड उष्णता बाहेर फेकली जाते. या उष्णतेमुळे संमेलन प्रवाह (Convection Currents) तयार झाले व या प्रवाहांमुळे विजेचा सुवाहक असलेल्या लोह्याच्या गाभ्यामध्ये विद्युत प्रवाह (Electric Currents) तयार झाले. यामुळेच पृथ्वीला स्वत:चे चुंबकीय क्षेत्र (Magnetic Field) मिळाले. हे चुंबकीय क्षेत्र सूर्याकडून आलेल्या घातक सौरवाऱ्यांना (Solar Winds) बाजूला ढकलते व आपल्या ओझोनच्या (Ozone) स्तराचे व पर्यायाने अतिनील किरणांपासून (Ultraviolet Rays) पृथ्वीचेच रक्षण करते.

 

शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवर सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी वातावरण तयार झाले. हे दोन प्रकारे तयार झालेले असू शकते. एक म्हणजे पृथ्वीवर ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे विविध वायू आकाशात फेकले गेले. तेथे त्यांनी पृथ्वीभोवती वातावरण तयार केले. दोन म्हणजे पृथ्वीवर धूमकेतू (Comets) येऊन आदळले व त्यांनी पाणी व गरजेचे वायू आणले. किंवा या दोन्ही प्रकारांचे संयोजनही (Combination) झालेले असू शकते. सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर पाणी आले होते. एकदा पाणी आल्यानंतर सृष्टीची सुरुवात व्हायला कितीसा वेळ लागणार? सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी एकपेशीय सजीवांची सुरुवात झाली. सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी प्रकाशसंश्लेषण सुरू झाले, सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी वातावरणात ऑक्सिजन आला, तर सुमारे दीड अब्ज वर्षांपूर्वी बहुपेशीय सजींवाचे अस्तित्व दिसायला लागले. पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व हे जास्तीत जास्त ४० लक्ष वर्षे आहे. म्हणजेच जर पृथ्वीचे साडेचार अब्ज वर्षे हे वय आपण एका दिवसासमान मानले, तर मानव हा केवळ सव्वा ते दीड मिनिटेच पृथ्वीवर अस्तित्वात आहे. या एवढ्याशा वेळात आपण आपल्या हावेपोटी व अहंकारापोटी पृथ्वीची काय अवस्था करून ठेवली आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाहीच. मला वाटतं, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर, अणुबॉम्बचे प्रयोग, वृक्षतोड, अवाजवी शिकारी माझ्या म्हणण्याची साक्ष देतीलच. या लेखापुरते आपण इथेच थांबू. पुढील लेखात पृथ्वीमध्ये झालेले भूशास्त्रीय बदल व त्यांचे भूतकाळातील, आताच्या व भविष्यकाळातील जगाच्या नकाशावर झालेले व होणारे परिणाम यांची माहिती घेऊ.

 
 

(संदर्भ - https://www.theguardian.com/science/2008/apr/28/starsgalaxiesandplanets.geology)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@