'कामाला लागा', भाजपाध्यक्षांचा कानमंत्र; महाराष्ट्रातील खासदारांसोबत दोन तास खलबते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : नवे वर्ष उजडताच देशाच्या राजकीय वर्तुळात येत्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षही आता 'इलेक्शन मोड'वर गेल्याचे दिसत आहे. बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनी महाराष्ट्र व गोव्यातील भाजप खासदारांची नवी दिल्लीत बैठक घेतली. तब्बल दोन-सव्वादोन तास चाललेल्या या बैठकीत अमित शाह यांनी भाजप खासदारांना 'कामाला लागा' असा सूचक संदेश दिला असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

 

नवीन महाराष्ट्र सदनात झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, डॉ. सुभाष भामरे, भाजपचे केंद्रीय संघटनमंत्री रामलाल, भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदींसह भाजपचे महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकसभा व राज्यसभा खासदार उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यसभा खासदार नारायण राणे हेही भाजपच्या या संघटनात्मक बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक अधिवेशनात भाजपच्या प्रत्येक राज्यातील खासदारांची अशी बैठक होतच असते, तसेच या बैठकीत केवळ संघटनात्मक बाबींवरच चर्चा झाली, असे या बैठकीनंतर रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतील निवडणूक निकालांचा महाराष्ट्रातील निवडणुकांवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा दानवे यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीत भाजपला यश मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

'विकास की राजनीती करो' असा संदेश अमित शाह यांनी भाजप खासदारांना दिल्याचे या बैठकीनंतर काही खासदारांनी अनौपचारिक वार्तालापात सांगितले. तसेच, येत्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागण्याची सूचनाही शाह यांनी केल्याचे खासदारांनी सांगितले.

 

म्हणून राणे भाजपच्या बैठकीत

 

काही दिवसांपूर्वी स्वबळाचे संकेत देणाऱ्या खा. नारायण राणे यांनी भाजपच्या बैठकीला उपस्थिती दर्शवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, नारायण राणे हे भाजपच्या बी फॉर्मवर निवडून आले आहेत. या बैठकीला भाजपच्या सर्व खासदारांना बोलावण्यात आले होते. म्हणून राणे या बैठकीला उपस्थित होते, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@