तया सत्कर्मी रती वाढो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |
 


जीवनाची ओंजळ आत्मतेजाच्या तेजस्वी फुलांनी भरण्यासाठी विवेक आणि वैराग्याची कास सदैव धरणं गरजेचं आहे. त्यामुळे अज्ञान कधीच त्रस्त करणार नाही. वासना क्षीण होऊन विकार, विकृती तोंड काळं करतात. कामना डोकं वर काढत नाही. वैर निघून जाऊन वैराग्य प्रगट होतं. अशा सुलक्षणांनी संपन्न झालेला समाज जगाला सुसंस्काराचा आणि संस्कृतीचा अमूल्य असा खजिना प्रदान करतो. आपली भारतीय संस्कृती या गुणांच्या रत्नांनी भरलेली आहे. त्यामुळेच ती जगामधली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. भारावून जाऊन परदेशातील लोक भारताकडे आकर्षित होतात. देवभूमी असलेल्या भारतामध्ये संत, साधू, सद्गुरू यांच्या दैवी गुणांचा सतेजपणा नजरेत भरतो.

 

तास, दिवस, महिने, वर्ष भराभरा पुढे पुढे पळत राहतात. काळ झरझर निघून जातो. अनेक जीव जन्मतात, त्याचप्रमाणे कित्येक जीव मृत्यूच्या कराल दाढेखाली जातात. हे कालचक्र सदैव गतिमान असतं. सत्ययुग असो नाही तर त्रेतायुग असो, काळ सरकत राहतो. द्वापारयुगात काळ थांबला, असं झालं नाही. कलियुगात तर काळाला खूपच काम आहे. त्याला दिलेलं काम तो कर्तव्यभावनेने करतो. त्यामध्ये भावनांचा गुंता कधीच करत नाही. सुखदुःखामध्ये सापडत नाही. तो तटस्थापणे कर्तव्य करत राहतो. अशा कालचक्राकडे बघून भयकंपित होण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येक जीवाचा सृष्टीवरील काळ परमात्मा परमेश्वराने ठरवलेला असतो. त्यामध्ये कोणालाही ढवळाढवळ करता येत नाही.

 

हे सगळं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून समजावून सांगितलेलं आहे. सकल सृष्टीलादेखील यामधून मार्गक्रमण करावं लागतं. उत्पत्ती, स्थिती आणि लयामधून तिला जावं लागतं. यामध्ये चेतन-अचेतन तसेच सजीव-निर्जीव अशा समस्त गोष्टी येतात. पंचमहाभूतांचा हा पसारा परमात्मा लयाच्या वेळी आवरून टाकतो. उत्पत्तीच्या वेळी पुनश्च पसारा मांडतो. स्थितीमध्ये सांभाळून घेतो. याचा शांतपणाने अभ्यास वारंवार केला तर अलिप्तपणा आपोआप येत जातो. माया, नाती सहजपणाने मनातून दूर जातात. याचं फलित म्हणजे शोक, भय, चिंता यांचा लवलेश उरत नाही.

 

सृष्टीच्या सुरेख क्रमामध्ये मानवाच्या हातात काय आहे तर जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे ना, तो आनंदात व्यतीत करणं आहे. एकमेकांना समजून घेऊन सामंजस्याने समाजाला एकसंघ करणं. गुणांचं स्मरण तर अवगुणांचं विस्मरण करून समाजातील प्रत्येक घटकाला एकोप्याने नांदण्यासाठी प्रयत्न करणं. मानव, मानवता, माणुसकी या तीन ‘म’च्या मकारातून सकारात्मकतेकडे घेऊन जाणं. नकारात्मकता नैराश्याला जवळ करते, तर सकारात्मकता सृजनशीलता, सुसंस्कारता यांच्याशी मैत्री करते. सकस बीजाची पेरणी करून त्याला खतपाणी घालून सांभाळते. त्यामधून सुरेख, सुंदर मनोविकासाची वेल तरारते. प्रयत्नपूर्वक प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिची जपणूक केली की, आत्मविकासाची सदैव टवटवीत राहणारी फुलं फुलतात.

 

देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच परमार्थ होय. तेच सकल संतांनी सांगितलेलं आहे. देहबुद्धी संपली की देवबुद्धी प्रगट होतेे नं! जे जीवन भगवंताने दिलं आहे, त्याचा सदुपयोग करून घेतला की, प्रगती, उन्नती साध्य होते. त्यासाठी सत्कर्मांचा सुगंध सर्वत्र दरवळत ठेवणं आवश्यक आहे. सद्गुरू, संत यांचं जीवन सुंदर सात्त्विक विचार, आचारांनी भरलेलं असतं. म्हणून त्यांच्या सहवासात जाणार्‍या प्रत्येकाला आनंदाची अनुभूती येते. जीवाचा गतजन्माच्या संस्कारानुसार स्वभाव बनलेला असतो. तरीदेखील अशा स्वभावाला सुयोग्य वळण लावण्याची ताकद संत, आई, सद्गुरूंजवळ असते. म्हणूनच म्हटलेलं आहे.

 

संतचरणरज लागता सहज ।

वासनेचे बीज जळूनी जाय ॥

 

नको असणार्या वासना नाहीशा होणं कठीण आहे. परंतु, संतांच्या चरणांची धूळ लागताच वासनांचं बीज जळून नष्ट होतं. म्हणूनच संतदर्शन, संतपूजन आणि संतसहवास यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर्शन झालं की, पूजन करावंसं वाटतं. मग संतसहवासाची ओढ अनावर होते. भाग्य उजळून उठलं की, सहवासाचा चंदनगंध दरवळतो. असुरी वृत्ती जाऊन दैवी वृत्ती प्रगटते. साधना वर्धित होत जाते. साधनेमधून सतेजता प्राप्त होते. सजग, सावध राहून संयमाची सोनेरी किनार लाभते. शुद्ध सात्त्विकतेच्या सुंदर साजांनी व्यक्तिमत्त्व खुलतं. समाजदेखील अंध:काराला दूर सारून प्रकाशपर्वात प्रवेश करतो. जीवनाची ओंजळ आत्मतेजाच्या तेजस्वी फुलांनी भरण्यासाठी विवेक आणि वैराग्याची कास सदैव धरणं गरजेचं आहे. त्यामुळे अज्ञान कधीच त्रस्त करणार नाही. वासना क्षीण होऊन विकार, विकृती तोंड काळं करतात. कामना डोकं वर काढत नाही. वैर निघून जाऊन वैराग्य प्रगट होतं. अशा सुलक्षणांनी संपन्न झालेला समाज जगाला सुसंस्काराचा आणि संस्कृतीचा अमूल्य असा खजिना प्रदान करतो. आपली भारतीय संस्कृती या गुणांच्या रत्नांनी भरलेली आहे. त्यामुळेच ती जगामधली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. भारावून जाऊन परदेशातील लोक भारताकडे आकर्षित होतात. देवभूमी असलेल्या भारतामध्ये संत, साधू, सद्गुरू यांच्या दैवी गुणांचा सतेजपणा नजरेत भरतो.

 

भौतिक सुखापेक्षा आत्मसुखाला प्राधान्य देणारा समाज समाधानाच्या सुगंधाने भरलेला आणि भारलेला राहणं स्वाभाविक आहे. सकल सृष्टी काळाच्या अधीन असून नश्वर अशा सुखामागे धावणारा समाज आनंदी राहणं शक्य नाही. कालचक्राचं भान ठेवून आत्मभानावर येऊन साधना करणारा समाज भारतात आहे. म्हणूनच भगवंताला संतरूपात या भूमीवर वारंवार यावंसं वाटतं. अवतारदेखील याच भूमीवर घेऊन लोकांचा उद्धार करावासा वाटतो. खरंच आपण फार भाग्यवान आहोत. जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून भारतभूमी लाभलेली असताना कालचक्राचं भय बाळगण्याचं काहीच कारण नाही. जे जीवन लाभलेलं आहे, ते साधना, उपासना करून अलौकिक आनंदाने भरून टाकण्यात जीवनाचं सार्थक आहे.

 

- कौमुदी गोडबोले 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@