पाकी कुरापतींमुळे धुमसते बलुचिस्तान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2019
Total Views |


भारताला अल्पसंख्याकांचे हित जपण्याचे उपदेशाचे डोस देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी बलुचिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या दयनीय परिस्थितीकडे डोळझाकच केलेली दिसते. तेव्हा, अल्पसंख्याकांवरील अन्याय-अत्याचारामुळे धुमसत्या बलुचिस्तानमधील परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...

 

पाकिस्तानचा मुळात जन्मच हा सांप्रदायिकतेतून झाला असून मार्क्सवादी इतिहासकारांप्रमाणे या सांप्रदायिकतेच्या जन्माच्या अचूक तारखेवर विश्वास करायला मात्र आम्ही स्वत:लाच असमर्थ समजतो. जर आपण स्वतंत्र पाकिस्तानसाठीच्या आंदोलनाचा जन्म मुस्लीम लीगच्या स्थापनेत, मुस्लीम लीगचा जन्म अलीगढ आंदोलनात आणि अलीगढ आंदोलनाचा जन्म सर सैय्यद आणि त्यांच्यासारख्याच इतर मध्यमवर्गीय शिक्षित मुस्लीम वर्गात आहे, असे क्षणभर मानले तर काय चित्र दिसते? हेच की, इंग्रजांचे कृपापात्र असलेल्या या सैय्यद आणि मंडळींना इंग्रजांच्या हाती स्वत:ची सत्ता गमावल्याचे दु:ख तर होतेच, पण त्याचबरोबर सरकारी सेवांपासून ते अगदी कौन्सिलपर्यंत हिंदूंचा सर्वत्र होणारा प्रवेश आणि मुस्लिमांची निसटती सत्ता ही त्यांच्या दु:खाची खरी भळभळणारी जखम होती. मुस्लीमहिताच्या रक्षणार्थ याच अभिजातवर्गीय धनाढ्यांनी १९०६ साली मुस्लीम लीगची स्थापना केली आणि १९०९ साली मॉर्ले-मिंटो सुधारणांच्या माध्यमातून मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त करण्यातही ते यशस्वी झाले. परंतु, १९०९ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट असो वा १९३५ चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, त्यांना एक गोष्ट कळून चुकली होती की, या लोकशाहीत त्यांची मध्ययुगीन शासनव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होऊ शकत नाही आणि म्हणूनच या मध्ययुगीन राज्यस्थापनेसाठी मुस्लीम अभिजातकांनी सुरू केलेल्या उपाययोजनांचा परिणाम म्हणजेच आजचा पाकिस्तान.

 

पाकिस्तानची मागणी ही मुसलमानांच्या ‘होमलँड’च्या स्वरूपात केली गेली की, जिथे ते आपला स्वतंत्रपणे विकास साधू शकतील आणि कालांतराने पाकिस्तान नामक इस्लामिक प्रजासत्ताक देश जगाच्या नकाशावर आला. याचा सरळ अर्थ असाच होता की, पाकिस्तान हा इस्लामी नियमांचे अनुशासन करणारा देश असेल आणि इस्लामी कायद्यानुसारच बिगर इस्लामी जनतेचे अधिकार आणि सोयीसुविधा निर्धारित केल्या जातील. मार्च १९४८ मध्ये बलुचिस्तानला पाकिस्तानात विलीन करण्यात आले आणि त्यानंतर १९७२ साली पाकिस्तानच्या संघराज्यात बलुचिस्तानला एक स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला. बलुचिस्तानात सुन्नी इस्लामवादी मुस्लिमांना प्राधान्यक्रम असला तरी शिया मुसलमानांची संख्याही मोठी आहे. त्याचबरोबर हिंदू, ख्रिश्चन यांचेही या राज्यात वास्तव्य आहे. परंतु, पाकिस्तानच्या अल्पसंख्याकविरोधी नीतींचे बलुचिस्तानात भयंकर दुष्परिणाम दिसून येतात. बलुचिस्तानमधील अल्पसंख्याकांचे दोन भागात वर्गीकरण करता येईल, एक धार्मिक आणि दुसरे जातीय अल्पसंख्याक. यातील पहिल्या म्हणजेच धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक गणल्या जाणार्‍या समुदायात हिंदू, ख्रिश्चन, अहमदी, जिकरी आणि काही प्रमाणात बहाई यांचा समावेश होतो.

 

बलुचिस्तानात हिंदू हे प्रमुख अल्पसंख्याक समुदायात मोडतात. या भागातील हिंदूंनी बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या एकूणच विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे परंतु, दुर्देवाने आज हेच हिंदू धर्माच्या आधारावर सांप्रदायिक भेदभावाला बळी पडताना दिसतात. परिणामी, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बलुचिस्तानातील हिंदू अत्यंत दयनीय अवस्थेत आपले जीवन कसेबसे जगत आहेत. १९४१ च्या जनगणनेनुसार, बलुचिस्तानमधील हिंदूंची लोकसंख्या ही जवळपास ५४ हजार इतकी होती. पण, विविध स्रोतांच्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीनुसार, वरील लोकसंख्येत तब्बल ९३ टक्क्यांची घट झाली आहे. ही अत्यंत चिंतानजक स्थिती असून पाकिस्तानी सेना आणि जिहादी संघटनांच्या प्रकोपामुळे हिंदूंना बलुचिस्तानातून पलायन करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही. एवढेच नाही, तर हिंदूंची धार्मिक स्थळे अजूनही उपेक्षित आहेत आणि त्यांच्या दुरुस्ती, रंगरंगोटीलाही पाकिस्तानी सरकारचा तीव्र विरोध आहे. बलुचिस्तानात हिंदूधर्मीयांची दोन प्रमुख तीर्थस्थळे असून जगभरातील हिंदूंची या स्थळांवर अपार श्रद्धा आणि आस्था आहे. पहिले तीर्थक्षेत्र म्हणजे, बलुचिस्तानातील लासबेला येथे स्थित माता हिंगलाजचे मंदिर आणि दुसरे कलात स्थित कालीमातेचे मंदिर. मात्र, पाकिस्तानी सेना आणि जिहादी गट मंदिरातील धार्मिक विधींना संशयास्पद मानून त्यामध्ये सातत्याने अडथळा आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. इतकेच नाही तर या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी जाऊ नये, म्हणून सेना आणि जिहादी गटांच्या सातत्याने उचापती सुरूच असतात.

 

बलुचिस्तानच्या किनारी क्षेत्रात वास्तव्यास असलेला जिकरी समुदाय गेली कित्येक वर्षं इस्लाममध्ये धर्मांतरणास नकार दिल्यामुळे अन्याय आणि अत्याचाराच्या भक्ष्यस्थानी पडला. जनरल जिया यांच्या शासनकाळापासून तर जिकरींवरील अत्याचारात आणखीन भर पडली. बलुचिस्तानच्या उत्तर पश्चिमेच्या केच जिल्ह्यातील जिकरींचे धार्मिक स्थळ असलेल्या कोह-ए-मुरादच्या मार्गातही असेच अनंत अडथळे निर्माण केले गेले आणि भक्तिभावाने तिथे निघालेल्या भाविकांच्या जत्थ्यांवर सशस्त्र हल्ले करून निरपराध्यांचे खून पाडण्यात आले. अशाच प्रकारे बलुचिस्तानातील हजारा समुदायही व्यापकरित्या हिंसाग्रस्त आहे आणि स्वत:च्या अस्तित्वासाठी तो आजही संघर्ष करतोय, झगडतोय. बलुचिस्तानात शिया समुदायाचा बर्‍याच जातींशी तसा संबंध आहे, पैकी हजारा समुदाय हा सर्वाधिक धोक्याच्या वर्तुळात आहे. हा समुदाय पाकिस्तानी सेना आणि इस्लामी जिहादी गटांच्या कायमच निशाण्यावर राहिला. बलुचिस्तानात हजारा समुदायाची लोकसंख्या ही जवळपास सात लाखांच्या आसपास असून क्वेटा आणि लगतच्या परिसरात ती प्रामुख्याने केंद्रित आहे. लष्कर-ए-झांगवी, सिपाह-ए-सहाबासारख्या दहशतवादी संघटनांनी या समुदायावर कित्येक वेळा प्राणघातक हल्ले केले. अशा या प्राणघातक हल्ल्यांपासून बचावार्थ हजारा समुदायातील लाखोंनी बलुचिस्तानातून स्थलांतरित होणेच पसंत केले.

 

पाकिस्तानात अहमदिया हा एक प्रमुख, प्रभावशाली अल्पसंख्याक समुदाय आहे. इस्लामवर विश्वास ठेवणारे अहमदिया हे १९०८ साली मृत्युमुखी पडलेल्या धर्मसुधारक गुलाम मोहम्मद यांचे अनुयायी मानले जातात. पाकिस्तानात या अहमदिया मुस्लिमांची संख्या तशी मोठी आहे. पाकिस्तानचे पहिले परराष्ट्रमंत्री मोहम्मद जफरुल्ला खान आणि पाकिस्तानचे एकमेव नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अब्दुसलाम हे याच अहमदिया समुदायातील होते. १९७२ साली जुल्फिकार अली भुत्तोंच्या सरकारने संविधानात पहिली दुरुस्ती करून अहमदिया समुदायाला इस्लामपासून विभक्त केले. त्यामुळे कदाचित हे जगातील असे पहिलेच उदाहरण असावे, जिथे एक लोकनिर्वाचित सरकारद्वारा लोकप्रतिनिधींच्या मदतीने कोणा एका समुदायाचा कुठल्या तरी पंथावर विश्वास नसल्याचा असा निर्णय घेण्यात आला. पण, यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. अहमदिया समुदायाविरोधात सामाजिक आणि सांस्कृतिक भेदभावाच्या मुखवट्याआड त्यांच्यावर, त्यांच्या संपत्तीवर भ्याड हल्ले केले गेले. अशा या अहमदिया समाजाची लोकसंख्या बलुचिस्तानातील क्वेटा व आसपासच्या परिसरात आजही भीतीच्या सावटाखालीच वावरत आहे. त्यांना संविधानिक पद्धतीने इस्लामशी वेगळे केल्यामुळे राज्यातील पोलीस आणि न्यायव्यवस्थेचीही त्यांच्याप्रती वागणूक ही भेदभावपूर्णच राहिली. पण, दुर्देव हेच की, या अहमदिया समुदायाच्या व्यथांना ऐकणारे पाकिस्तानात आज कोणी नाही.

 

त्यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, धार्मिक तसेच जातीय अल्पसंख्याकांसाठी पाकिस्तान हा एक अत्यंत धोकादायक देश आहे आणि हीच स्थिती बलुचिस्तानचीही. पाकिस्तानमध्ये आजवर सत्तारूढ झालेली सरकारे आखाती देशांमधून मिळणार्‍या पेट्रो-डॉलरच्या लालसेपोटी पुरती आंधळी झाली आणि म्हणूनच आज पाकिस्तानकडे याच आखाती देशांचा अजेंडा राबविणारा एजंट याच नजरेने पाहिले जाते. पाकिस्तानातील मदरशांमध्ये वहाबी आणि सलाफी विचारसरणीचा प्रचार-प्रसार केला जातो. त्याचे शिक्षण तब्बल ३५ लाख विद्यार्थ्यांना मदरशात दिले जाते आणि मग हेच विद्यार्थी दहशतवादी संघटनांसाठी जिहादी म्हणून रुजू होतात. हे लोक इस्लाममधील मतांचाच आदर करत नाहीत, तर इतर धर्म तर यांच्यासाठी अनंतकाळापर्यंत संघर्ष करण्यासाठीच आहेत. बलुचिस्तानातील असहिष्णुता आणि कट्टरवादाचा विकास ही पाकिस्तानची एक जाणूनबुजून आखलेली रणनीती आहे, ज्याचा उद्देश बलुची एकतेला धार्मिक आणि जातीय आधारांवर छिन्नविछिन्न करणे हाच आहे. बलूच राष्ट्रवादावरून लक्ष विचलित करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे. बलुचिस्तानला विभाजित करण्याचा, अंतर्गत कलहात व्यस्त ठेवून स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीच्या आधारालाच डळमळीत करण्याकडे पाकिस्तानचा सर्वस्वी कल आहे.

 

शेकडो वर्षांपासून बलुचिस्तानात वेगवेगळे जातीय समुदाय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आले, पण या प्रकारची असहिष्णुता आणि संघर्ष कधी पाहायला मिळाले नाही. हा संघर्ष पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित असून केवळ आणि केवळ स्वार्थासाठी बलुचिस्तान धुमसते ठेवले गेले आणि या सगळ्याची एक मोठी किंमत येथील समुदायाला आपले प्राण गमावून मोजावी लागत आहे, हेच मोठे दुर्देव.

 - संतोषकुमार वर्मा

(अनुवाद : विजय कुलकर्णी)

 
 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@