इतिहासाची पुनरावृत्ती?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी क्रिकेट चाहत्यांना एक चांगले औचित्य देऊन भारताने ३४ वर्षांपासून कायम अबाधित असलेला एक विक्रम मोडला आणि पहिल्यांदा बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत आघाडी मिळवली. पण, ज्याप्रमाणे विराट सेना मैदानावर अधिराज्य गाजवतेय, त्यावरून या आणखी एका इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय शिलेदारांचे दडपण हे ऑस्ट्रेलियाच्या संघावर असेल. १९९६ पासून दोन उत्कृष्ट फलंदाज सुनील गावस्कर आणि अॅलन बॉर्डर यांच्या नावाने भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये या कसोटी सामन्यांची सुरुवात झाली आणि हा अटीतटीचा सामना गेली २३ वर्षे सुरू आहे. पण, गेली ७२ वर्षे भारत आणि ऑस्ट्रेलियात खरंतर हे शीतयुद्ध रंगले आहे. पण, आतापर्यंत झालेल्या ९७ कसोटी सामन्यांत भारताला केवळ २८ सामन्यांतच विजय मिळवता आला, त्यामुळे ही आकडेवारी सुधारण्याचे दडपण भारतावर असले तरी, सिडनीमध्ये गुरुवारपासून होणाऱ्या सामन्यात भारताचे गोलंदाज पुन्हा कमाल करतील, यात काही वाद नाही. मात्र, संघ निवडीमध्ये झालेले बदल भारतासाठी काही प्रमाणात घातक ठरू शकतात. सिडनीचे एससीजी मैदान हे गोलंदाजीसाठी पूरक असल्यामुळे गेली तब्बल ४० वर्षे भारताचे मोजके फलंदाज वगळता इतर कोणालाही जास्त यश आले नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर या सामन्याचे दडपण असेल. भारताच्या सलामीच्या फलंदाजांचा प्रश्न सुटला असला तरी, भारताची मधली फळी अजूनही दुबळी आहे. त्यातच मागील तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रडवणारी मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह ही तिकडीही शेवटच्या सामन्यात पाहायला मिळणार नाही, कारण इशांत शर्मा दुखापतीमुळे शेवटच्या सामन्याला मुकणार आहे, तर भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनही दुखापतग्रस्त असल्यामुळे तो खेळेल की नाही, हे गुरुवारीच कळेल. त्यामुळे एकूणच या सामन्यात भारतावर विशेष दबाव नसला तरी, ही मालिका जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यातच सिडनीचे एससीजी मैदान भारतासाठी काही विशेष चांगले ठरले नाही. या मैदानावर भारताने १९७८ साली शेवटचा विजय मिळवला होता, असे असले तरी, मागच्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ही मालिका जिंकल्यानंतर आता ही मालिका बरोबरीत सुटावी, अशी इच्छा भारताची मुळीच नसावी. त्यामुळे भारतीय संघ पुनश्च इतिहास घडविण्यास तयार आहे का, या प्रश्नाचं उत्तर गुरुवारपासून सामना सुरू झाल्यानंतरच कळेल.

 

छेत्रीच्या छत्रछायेखाली

 

२०१८ हे वर्ष भारताच्या क्रीडा विश्वाला चांगले गेले, यात काही वाद नाही. मात्र, असे असले तरी भारतातला प्रेक्षकवर्ग व क्रीडा चाहता हा काही अंशी क्रिकेटकडे झुकलेला आजवर पाहायला मिळाला. पण, २०१८ या वर्षात चमत्कारिकरित्या भारतीय प्रेक्षकवर्ग वळला तो, फुटबॉलच्या मैदानाकडे आणि त्याचे श्रेय जाते ते, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याला. छेत्रीच्या छत्रछायेखाली भारतीय फुटबॉल संघाने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वळवले. यात छेत्रीच्या वैयक्तिक खेळीकडे विशेष लक्ष दिले, तर छेत्रीने जगातील दोन दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या तोडीस तोड खेळ २०१८ मध्ये केला. त्यामुळे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये छेत्री अर्जेंटिनाच्या मेस्सीसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे आणि आता नववर्षात छेत्रीच्याच नेतृत्वाखाली भारत २८ वर्षांनंतर एएफसी आशियाई फुटबॉल चषकात पात्र ठरला आहे. त्यामुळे दि. ५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आशियाई चषकात सगळ्यांचे लक्ष भारताकडे आहे. याकरिता भारताला आपल्या गटातील युएई, थायलंड आणि बहरिन या संघासोबत आपला उत्तम खेळ करावा लागणार आहे. भारताचा आजवरचा आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेतील खेळ फारसा चांगला राहिलेला नाही, मात्र सुनील छेत्री भारताला दुसऱ्या फेरीपर्यंत घेऊन जाईल, अशी शक्यता भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने वर्तविली आहे. त्यामुळे एकदाही हे चषक न जिंकलेल्या भारताकडे विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात नसले तरी, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि बहरिन या देशांना कडवे आव्हान देईल यात काही शंका नाही. त्यामुळे भारताने आपले फिफा रँकिंग सुधारण्यावर जास्त भर दिला पाहिजे. सद्यस्थितीत भारत ९७व्या क्रमांकावर आहे, तर भारताने ओमान विरोधात झालेल्या सराव सामन्यात कडवी झुंज देत सामना बरोबरीत सोडवला होता. त्यामुळे भारताला हलक्यात घेण्याची चूक कोणताही संघ करणार नाही. मात्र, भारतानेही छेत्रीच्या छत्रछायेबाहेर येण्याची काही अंशी गरज आहे. सुनील छेत्रीचा वैयक्तिक खेळ बघता, तो भारताला सामने जिंकवून देऊ शकतो. मात्र, चषक जिंकण्यासाठी भारताला सांघिक खेळावर भर देण्याची खरी गरज आहे. त्यामुळे भारताची खरी मदार ही खेळाडूंच्या मेहनतीवर आणि थोडीफार नशिबावर अवलंबून असेल. त्यामुळे खेळाडूंनी झोकून खेळ तर करावाच, बाकी छेत्रीकडून अपेक्षा या आहेतच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@