५९वे कलाप्रदर्शन २३ जानेवारीला विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन नाशिकमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2019
Total Views |


महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन, विद्यार्थी विभाग हा शासकीय कला उपक्रमाचा दुसरा भाग दि. २३ जानेवारीला नाशिक येथे सुरू होत आहे. नुकतेच नवी वर्षारंभी कलाकार विभागाचे प्रदर्शन मुंबईत जहांगिर कलादालनात संपन्न झाले.

 

या प्रदर्शनाचे औचित्य साधून त्या परिसरातील म्हणजेच या वर्षी नाशिक परिसरातील सेवानिवृत्त कलाध्यापकाच्या कलाविषयक योगदानाचा विचार करून सन्मान केला जातो. यावर्षी आनंद सोनार यांचा सत्कार शासनातर्फे केला जाणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शासकीय, सर्व अनुदानित आणि सर्व विनाअनुदानित कला महाविद्यालयांमध्ये कलाध्ययन करीत असलेल्या कलाविद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करण्याच्या उद्देशाने, राज्यस्तरीय कलाप्रदर्शनाचे आयोजन केले जाते. १९५६ पासून हा उपक्रम महाराष्ट्र शासनातर्फे साधला जातो. हे राज्य कलाप्रदर्शन ५९वे असून सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कलासंचालनालयामार्फत आयोजित केले जाते. यावेळी असाही एक प्रोत्साहनात्मक भाग असतो की, राज्यभरातून कलासंचालनालयाकडे प्रस्ताव येतात. त्यांना सदर विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी ‘यजमान पद’ हवे असते. याही वर्षी याच प्रथेनुसार नाशिकच्या ‘कलानिकेत नाशिक’ या कलासंस्थेच्या ‘नाशिक चित्रकला महाविद्यालय’ यांनी पुढाकार घेऊन कलासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाची मांडणी, नाशिकच्या महात्मा फुले कलादालन, तळमजला येथे असून कार्यक्रमाचे उद्घाटन दि. २३ जानेवारीला महाकवी कालिदास नाट्यगृहाचे सभागृह येथे होणार आहे.

 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शुभहस्ते हे प्रदर्शन सर्वांसाठी दि. २४ जानेवारीपासून आठवडाभर सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे. या कलामहाविद्यालयाचे प्राचार्य अनिल अभंगे आणि या वर्षीच्या ५९व्या प्रदर्शनाचे अधिकारी गोविंदराव पांगरेकर यांच्याकडून यासंबंधी माहिती मिळाली. ते पुढे म्हणाले की, “या प्रदर्शनात सुमारे साडेचार हजार कलाकृती पाठवून, महाराष्ट्रातील कलामहाविद्यालयांनी भाग घेतला. त्यातून प्रदर्शनासाठी निवडण्यात आलेल्या कलाकृती सुमारे ९५० आहेत.” उपयोजित कलाविभाग, चित्रकला विभाग, शिल्पकला विभाग, अंतर्गत गृह सजावट विभाग, मुद्रांकन विभाग (ग्राफिक आर्ट), वस्त्रकला (टेक्सटाईल अ‍ॅण्ड व्हेविंग) विभाग आणि मेटल अर्थात धातुकला विभाग अशा विभागांत कलाकृतींची विभागणी केलेली आहे. कलाक्षेत्रात पाय रोवणार्‍या पहिल्या वर्गासाठी ज्याला ‘पायाभूत विभाग’ असे संबोधले जाते. यातूनही पाठविण्यात आलेल्या कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. या प्रदर्शनात दिव्यांग कलाकारास खास पारितोषिक दिले जाते. ही माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली. नाशिक हे शहर मुळात गोदाकाठच्या निसर्ग वातावरणात आणि ब्रह्मगिरी, पांडवलेणी, कवी कुसुमाग्रज यांच्या आठवणींनी युक्त शहर. शिवाजी तुपे, सोनवणी बंधु, सावंत बंधु, स्वत: प्राचार्य अनिल अभंगे, आर्टिस्ट आणि अधिष्ठाता रमेश वडजे अशा विविध प्रवाहाच्या कलाकार मंडळींनी सजलेले शहर. ज्येष्ठ चित्रकार आणि निवृत्त प्राचार्य, लेखक, कादंबरीकार पंडितराव देशमुख यांच्यासारखे प्रसिद्धीपासून दूर राहिलेले कलावंतही याच नाशिकचे! अशा बर्‍याच ज्ञात-अज्ञात कलाकार मंडळींचा ‘कुंभमेळा’ अर्थात ‘कलामेळा’ म्हणजे नाशिक..!!

 

 
 

या प्रदर्शनातही प्रदर्शित केल्या गेलेल्या कलाकृती या व्यावसायिक कलाकारांनीही तोंडात बोट घालावे, अशा अद्भुत, शेती आणि तंत्रज्ञानाने युक्त आहेत. त्यांचं कौतुक होणं, त्यांना सन्मानित करणं हाही या प्रदर्शनाचा एक स्तुत्य भाव असतो. म्हणूनच वर उल्लेखिलेल्या सर्व विभागांतून या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांकडून रोख पारितोषिके आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतात. मुंबईत झालेल्या जहांगिर कलादालनाच्या, व्यावसायिक कलाकार विभागातील प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्रिमहोदय रवींद्र वायकर यांनी बक्षिसांच्या रकमेत चौपट वाढ केल्याची आणि याच वर्षापासून सदर रकमा देण्याची घोषणा केली आहे. व्यावसायिक कलाकारांना देण्यात येणार्या रकमेत १० हजार रुपयांहून २५ हजार रुपये एवढी वाढ केल्याची घोषणा केली, तर ज्येष्ठ कलाकार पुरस्काराची रक्कमदेखील २५ रुपयांहून रुपये एक लाख एवढी देण्याचे जाहीर केले. आता या प्रदर्शनातही महाराष्ट्राच्या लाखो कलाविद्यार्थ्यांचे डोळे मान्यवर मंत्रिमहोदयांच्या प्रोत्साहनात्मक घोषणेकडे लागून आहेत. या प्रदर्शनाच्या वेळीदेखील ज्येष्ठ कलाध्यापकाचा सन्मान केला जातो. यावेळी त्या कलाध्यापकांस सन्मानपत्र, शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह दिले जाते. पूर्वी रोख रक्कमही दिली जायची. यावर्षीपासून कलाध्यापकाच्या पुरस्कारातून रोख एक लाख एवढी रक्कम देण्यात यावी, अशी आशा तमाम आजी-माजी कलाध्यापकांना लागलेली आहे.



 
 
 

वास्तविक महाराष्ट्रात कलाक्षेत्राने अटकेपार झेंडा फडकविलेला आहे आणि विद्यार्थी विभागाचे हे प्रदर्शन म्हणजे कलाविद्यार्थ्यांच्या कलागुणांचे अभिव्यक्तीकरण करणारे व्यासपीठ असल्याने या औचित्यावरच आनंद-उत्साह वाढावा, अशी घोषणा मान्यवरांकडून होतील. अशा स्वप्नांच्या गाठोड्यांसह या प्रदर्शनाचे उद्घाटनास उदयोन्मुख आणि प्रस्थापित कलाकार, कलाविद्यार्थी नाशिकात जमणार आहेत. त्या सार्‍यांना शुभेच्छा देतानाच, या प्रदर्शनाला सर्वांनी भेटावे, हे प्रदर्शन पाहावे असे आवाहन प्रभारी कलासंचालक आणि प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

 
-  प्रा. गजानन शेपाळ  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@