सपा-बसपा आघाडी किती काळ टिकणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2019
Total Views |

 
 
 
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा यांच्यात आघाडी झाली. राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू आणि मित्र नसतो, असे वारंवार म्हटले जात होते, ते या आघाडीने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजकीय स्वार्थासाठी एकमेकांचे कट्टर दुष्मन असलेले पक्षही एकत्र येत असतात, तर एकमेकांचे मित्र असलेले पक्षही दुरावत असतात. उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा हे कधीकाळचे शत्रू एकत्र आले आहेत, तर महाराष्ट्रात एकमेकांचे दीर्घकाळापासून मित्र असलेले भाजपा आणि शिवसेना यांच्यातील अंतर वाढत आहे.
 
सपा आणि बसपा यांच्यात आघाडी झाली असली तरी ही आघाडी कितीकाळ टिकेल, असा प्रश्न आतापासून विचारला जात आहे. विशेष म्हणजे हा अन्य राजकीय पक्षातून नाही तर सपातूनच विचारला जात आहे. मुळात सपा आणि बसपात पहिल्यांदाच अशी आघाडी झाली नाही, तर या आधी म्हणजे 1993 मध्येही झाली होती. त्यावेळी सपानेते मुलायमिंसह यादव आणि बसपाचे नेते कांशीराम यांनी आघाडी केली होती.
 
आता सपा आणि बसपातील नेतृत्वाच्या दुसर्या पिढीने म्हणजे सपानेते अखिलेश यादव आणि बसपाच्या नेत्या मायावती यांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आघाडी करावी लागली. सपा आणि बसपा यांच्यात दुसर्यांदा झालेली आघाडी पाहण्यासाठी बसपा नेते कांशीराम आज जिवंत नाहीत, मात्र सपाचे नेते मुलायमिंसह यादव मात्र जिवंत आहेत. या आघाडीवर मुलायमिंसह यादव यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. मात्र त्यांचा या आघाडीला मूक आशीर्वाद असावा, असे मानायला हरकत नाही.
सपा आणि बसपात पहिल्यांदा आघाडी झाली तेव्हा मायावती बसपात कांशीराम यांचा उजवा हात होत्या. त्यावेळी अखिलेश यादव राजकारणातच नव्हते. 1993 मध्ये सपा आणि बसपा आघाडी झाली तेव्हाही या आघाडीला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या, आघाडीच्या मतांची टक्केवारीही भाजपापेक्षा कमी होती. भाजपाने तेव्हा 422 जागा लढवत 177 जागा जिंकल्या होत्या, भाजपाला 33 .30 टक्के मते मिळाली होती. सपाने 256 जागा लढवत 109 जागा जिंकल्या होत्या, सपाला 17.90 टक्के मते मिळाली होती. बसपाने 164 जागा लढवत 67 जागा जिंकल्या होत्या. बसपाला 11.10 टक्के मते मिळाली होती. म्हणजे त्यावेळी सपा-बसपा आघाडीने 176 जागा जिंकल्या होत्या, आणि आघाडीच्या मतांची टक्केवारी 29 होती.
 
 
सपा-बसपा आघाडीला तेव्हाही भाजपापेक्षा एक जागा आणि 4 टक्के मते कमी मिळाली होती. मात्र अन्य पक्षांच्या मदतीने सपा-बसपा आघाडीने सरकार बनवले, आणि मुलायमिंसह यादव मुख्यमंत्री झाले. मात्र दीडदोन वर्षातच मायावती यांच्या राजकीय महत्वाकांक्षेने तोंड वर काढले, आणि त्यांनी 1995 च्या मे महिन्यात मुलायमिंसह यादव सरकारचा पाठिंबा काढला. 2 जून 1995 रोजी मायावती लखनौतील व्हीआयपी गेस्टहाऊस मध्ये बसपा आमदारांची बैठक घेत असताना सपाच्या कार्यकत्यार्र्नी गेस्टहाऊसवर हल्ला चढवत मायावती यांचे कपडे फाडत त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाचे आमदार ब्रम्हदत्त द्विवेदी आणि लालजी टंडन यांनी मायावती यांना वाचवले होते. या घटनेेने त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती. नंतरच्या राजकीय घटनाक्रमात मायावती यांनी भाजपाच्या मदतीने सरकार बनवत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
व्हीआयपी गेस्टहाऊसमधील घटना मायावती कधीच विसरल्या नाही. या घटनेने सपा आणि बसपा यांच्यातील राजकीय वैर आणखी वाढले होते, तर बसपा आणि भाजपा जवळ आले होते. मायावती यांनी भाजपा आमदार ब्रम्हदत्त द्विवेदी यांना आपला भाऊच मानले होते. मायावती नंतर अनेक वर्षे भाजपा नेते लालजी टंडन यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन राखी बांधत होत्या. आज आपल्या भावाच्या पक्षाला पराभूत करण्यासाठी मायावती यांनी आपल्या त्यावेळच्या शत्रूशी म्हणजे सपाशी हातमिळवणी केली आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत आघाडी करणार्या मायावती अद्यापही मुलायमिंसह यादव यांना माफ करायला तयार नाही, त्यामुळे सपा आणि बसपातील आघाडीनंतर अखिलेश यादव यांनी मायावती आणि मुलायमिंसह यादव यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला असता तर मायावती यांनी त्याला नकार दिला असता.
 
 
 
सपा आणि बसपा आघाडीनंतर व्हॉटस्अपवर एक संदेश व्हायरल झाला होता. त्यात देव स्वर्गात जोड्या ठरवत असला तरी मोदींच्या भीतीने पृथ्वीवरही काही जोड्या ठरत असल्याचा उल्लेख त्यात होता. यातील विनोद बाजूला ठेवला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तसेच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मायावती आणि अखिलेश यादव यांना एकत्र यावे लागले, ही वस्तुस्थिती आहे.
 
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बसपाचे उत्तरप्रदेशात पानदान वाजले होते. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाची स्थिती फारशी चांगली नव्हती. 2014 मध्ये झलेल्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा स्वतंत्रपणे लढले होते, 78 जागा लढवणार्या सपाला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या. तर 80 जागा लढवणार्या बसपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. सपाला 22.30 टक्के तर बसपाला 19.80 टक्के मते मिळाली होती. राज्यात लोकसभेच्या 78 जागा लढवणार्या भाजपाने 71 जागा जिंकल्या होत्या. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या असलेल्या अपना दलने 2 जागा जिंकत 1 टक्के मते मिळवली होती. म्हणजे त्यावेळी राज्यात भाजपा आघाडीला 73 जागा आणि 43.60 टक्के मते मिळाली होती.
 
 
2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाने अपना दल आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसोबत युती करत निवडणूक लढवली होती. 384 जागा लढवत भाजपाने 312 जागा जिंकल्या होत्या. भाजपाला 39.70 टक्के मते मिळाली होती. अपना दलने 11 जागा लढवत 9 जागा जिंकल्या, तर सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने 8 जागा लढवत 4 जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांना मिळून पावणेदोन टक्के मते मिळाली होती. म्हणजे भाजपा आघाडीच्या मतांची बेरीज 41.35 टक्के होती.
विधानसभा निवडणुकीत सपाने कॉंग्रेससोबत आघाडी केली होती. सपाने 311 जागा लढवत 47 जागा जिंकल्या, तर कॉंग्रेसला 114 जागा लढवत फक्त 7 जागा जिंकता आल्या. सपाला 21.90 तर कॉंग्रेसला 6.20 टक्के मते मिळाली होती. 403 जागा लढवणार्या बसपाने 19 जागा जिंकत 22.20 टक्के मिळवली. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभेच्या दोन मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत बसपाच्या पाठिंब्याने सपाचा विजय झाला.
 
 
कैराना विधानसभा मतदारसंघातही रालोदचा उमेदवार विजयी झाला. या तीन पोटनिवडणुकांनीच सपा आणि बसपा आघाडीचा पाया घातला गेला. सपा आणि बसपाने आघाडी करताना कॉंग्रेसला पूर्णपणे डावलले आहे. तर रालोदसाठी फक्त तीन जागा सोडल्या. रालोदला पाच जागा हव्या होत्या. पण, त्यात रालोदला यश आले नाही. मात्र कॉंग्रेसला या आघाडीत स्थान नाही, हे निश्चित आहे, त्यामुळे कॉंग्रेसने राज्यात स्वबळावर 80 जागा लढवण्याची घोषणा केली आहे.
सपा आणि बसपा यांचा राज्यात दलित, मुस्लिम आणि यादव तसेच काहीप्रमाणात मागासवर्गीय मतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. गणितात दोन अधिक दोन चार होत असले तरी राजकारणात दोन अधिक दोन चार होतीलच, याची खात्री नसते, कधी ते पाचही होतात, तर कधी तीनही होऊ शकतात. मुळात सपा आणि बसपा यांची आघाडी ही नैसर्गिक नाही, तर अनैसर्गिक आहे.
 
‘चढ गुंडन की छाती पर, मुहर लगेंगी हाथीपर’ अशा घोषणा आधी बसपातर्फे दिल्या जात होत्या. आता त्याच गुंडांच्या पक्षाशी आघाडी करण्याची वेळ बसपावर आली आहे. सपाची सायकल हत्तीवर चढू शकत नाही, आणि बसपाचा हत्ती सायकलवर बसला तर सायकलचा चकनाचूर झाल्याशिवाय राहणार नाही. आमची आघाडी दीर्घकाळासाठी असल्याचे या दोन पक्षांतर्फे सांगितले जात असले तरी 1993 चा या आघाडीचा अनुभव लक्षात घेता भाजपाने फारसे विचलित होण्याचे कारण नाही.
1993 मध्येही मायावती यांनी सपासोबतची आघाडी तोडली होती, लोकसभा निवडणुकीत आघाडीचा पराभव झाल्यानंतर 2019 मध्ये मायावती पुन्हा आघाडी तोडतील, याबद्दल शंका नाही. सपा आणि बसपा हे मित्र कमी आणि शत्रू जास्त आहेत. विचारधारेशिवाय फक्त सत्तेसाठी एकत्र आलेेले फारकाळ एकत्र राहू शकत नाही, हा राजकारणाचा सर्वांनाच अनुभव आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@