...आणि वर्तन मात्र पशुचे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
ओठावर नाव येशूचे आणि वर्तन मात्र पशुचेअशी गत असलेल्या बिशप फ्रॅन्को मुलक्कलविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या नन्सवर खार खाऊन असलेल्या ‘मिशनरीज ऑफ जिजस’ने चार-पाच महिन्यानंतर कारवाईचा बडगा उगारला व या नन्सना चर्चमधून हाकलून दिले.
 

ख्रिस्ती धर्मीयांच्या काही ठिकाणच्या पवित्र चर्चेसमध्ये कोणकोणती अपवित्र कामे चालतात, याची असंख्य उदाहरणे जगभरातून नेहमीच समोर येत असतात. रुढीवादी सिद्धांत, परंपरा आणि प्रथांच्या नावाखाली काही चर्च अथवा कॅथलिक संस्था महिला व बालकांच्या लैंगिक शोषणाचे अड्डे बनल्याचेही अनेकदा उघड झाले. ज्या कोणत्याही वेळी अशा घटनांची बाहेर वाच्यता होते, त्या त्या वेळी चर्च प्रशासन ही प्रकरणे दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. यामुळे निष्ठेने ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्या ख्रिस्ती समुदायासमोरही नेमके काय करावे, असे प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल. गेल्याचवर्षी जालंधर येथील बिशप फ्रॅन्को मुलक्कल याने केरळातील ननवर २०१४ ते २०१६ या काळात तब्बल १३ वेळा बलात्कार केल्याचे हिडीस प्रकरण उजेडात आले. ‘ओठावर नाव येशूचे आणि वर्तन मात्र पशुचे’ असा हा एकूणच मामला होता. पुढे मुलक्कलवरील आरोपानंतर त्याच्याविरोधात कित्येक नन्सनी निदर्शने केली व आंदोलनही चालवले. नंतर त्याची परिणती बिशप फ्रॅन्कोला बेड्या ठोकण्यात झाली. पण, केवळ २१ दिवसांच्या कोठडीनंतर मुलक्कलला जामीनही मिळाला. खरे म्हणजे लैंगिक शोषण, बलात्कार यासारख्या विकृत प्रकारांत अडकलेल्यांवर जामिनाची खैरात करणे न्याय्य की अन्याय्य, असा प्रश्नही पडतो. पण... असो. आता मात्र बिशप फ्रॅन्को मुलक्कलविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या नन्सवर खार खाऊन असलेल्या ‘मिशनरीज ऑफ जिजस’ने चार-पाच महिन्यानंतर कारवाईचा बडगा उगारला व या नन्सना कोट्टयम चर्चमधून हाकलून दिले.

 

सिस्टर अनुपमा, सिस्टर अंचिता, सिस्टर अ‍ॅल्फी आणि सिस्टर जोसेफिन अशी कारवाई करण्यात आलेल्या या नन्सची नावे असून यापैकी एकीने बिशप फ्रॅन्को मुलक्कलविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. सूडभावनेने पेटून उठलेल्या चर्च प्रशासनाने या नन्सनाच कोट्टयमच्या कॉन्व्हेंटमधील निवासस्थान खाली करण्याचे आदेश दिले. पावाला बटर लावतो तसा आपल्या कारवाईला साजूकतेचा मुलामा चढवत ‘मिशनरीज ऑफ जिजस’ने या नन्सची चार वेगवेगळ्या ठिकाणी बदली करत असल्याचे म्हटले. परंतु, चर्च प्रशासनाचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे एकूणच कारवाईवरून समजते. कारण, या नन्सना दिलेल्या बदलीच्या आदेशात जुनीच म्हणजे २०१७ आणि २०१८ सालची तारीख टाकण्यात आली आहे. जर बदलीचे आदेश जानेवारी २०१९ मध्ये दिले असतील तर त्यावर तारीखही यंदाचीच हवी. पण तशी ती नाही आणि जर बदली या जुन्याच तारखांना झाली असेल, तर त्या नन्स अजूनही कॉन्व्हेंटमध्ये काय करत होत्या, हा प्रश्न उभा राहतोच. म्हणजेच या बदली प्रकरणाचा संबंध फ्रॅन्को मुलक्कलचे बिंग चव्हाट्यावर आणण्याशीच असल्याची खात्री अगदी सहज पटते. सोबतच प्रेम, दया, करुणा आदी शब्दांच्या आधाराने वावरणाऱ्यांचे खरे रूप द्वेषाने किती ओतप्रोत भरलेले असते, हेही यावरून सिद्ध होते.

 

आपल्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात तक्रार करणे, ही खरे तर सगळ्याच पीडितांची जबाबदारी. पण कित्येकदा अन्याय करणाऱ्याच्या ताकदीला, वजनाला घाबरून अशा व्यक्तीविरोधात कोणी तोंड उघडताना दिसत नाही. कोट्टयमच्या चर्चमधील नन्सनी मात्र हे धाडस दाखवले व त्याविरोधात बंड पुकारले. परंतु, शोषण करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याच्या आविर्भावात वागणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना हा प्रकार रुचला नाही, पचला नाही. चर्च प्रशासनाने बिशप मुलक्कलच्या काळ्या कारवायांविरोधात बोलणाऱ्या नन्सनाच गुन्हेगार ठरवत त्यांच्यावर कारवाई केली. दुसरीकडे चर्च प्रशासनाने फक्त या चार नन्सविरोधात कारवाई केली असे नाही, तर आणखी एका ननचीही मुस्कटदाबी केली. लुसी कलापुरा हे तिचे नाव आणि तिचा गुन्हा काय? तर चर्च प्रशासनाला न विचारता चुडीदार हा पेहराव परिधान करणे, कार चालवणे, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, कर्ज घेणे आणि बिगर ख्रिस्ती माध्यमातून लेख, कविता प्रसिद्ध करणे हा होय. या गुन्ह्यावरून चर्च प्रशासनाने लुसी कलापुरा हिला शिस्तभंगाची नोटीस बजावली. पण, चर्च प्रशासनाने लुसीविरोधात दिलेली कारणे पोकळ असून खरे कारण तिचा फ्रॅन्को मुलक्कलविरोधातील आंदोलनात असलेला सक्रिय सहभाग हेच आहे. मुलक्कलविरोधात केरळच्या चर्चमधील ‘नन्स सेव्ह अवर सिस्टर्स’ असे म्हणत रस्त्यावर उतरल्या होत्या, त्यात लुसीही सहभागी होती. याच कारणावरून आता चर्चने लुसीचे जिणे अवघड करून टाकले असून तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या नियमांचा हवाला देत पद्धतशीरपणे गळचेपी केली आहे. “वरिष्ठांची अनुमती न घेता लुसी यांनी केलेल्या या गंभीर चुका दुरुस्त कराव्या,” असे चर्चमधील मंडळींचे म्हणणे आहे. पण, लुसीने केलेल्या चुका गंभीर कशा, याचे उत्तर चर्च प्रशासन देताना दिसत नाही. त्यामुळे चर्च प्रशासनाच्या या वागणुकीवरून तिथल्या कुटील कारवाया चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून तिथल्या मंडळींनी अवलंबलेला हा एक मार्ग असल्याचेच स्पष्ट होते.

 

दुसरीकडे चर्चमध्ये सगळ्याच गोष्टींसाठी वरिष्ठांची परवानगी घेणे अपेक्षित असते का? मग असे असेल तर मुलक्कलने ननवरील बलात्कारही वरिष्ठांना विचारूनच केला होता का? आणि म्हणूनच सर्वच उच्चपदस्थांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. सोबतच आता ज्या नन्सवर बदली वा शिस्तभंगाच्या कारवाया करण्यात येत आहेत, त्यांची माहिती ‘चर्च’ नामक व्यवस्थेचे सर्वोच्च पोप फ्रान्सिस यांनाही असेल किंवा ते या प्रकरणात लक्ष घालत नसतील, या दोन शक्यताही समोर येतात. कारण, चर्च व्यवस्थेत सर्वकाही वरिष्ठांना विचारूनच तर होत असते ना! म्हणजेच एकतर पोप फ्रान्सिस यांना मुलक्कल प्रकरणातील नन्सना शिक्षा देणे मान्य असेल किंवा चर्चमध्ये जागा बळकावून बसलेल्यांनी त्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला असावा, असे म्हणता येते. स्त्री जन्म एक पाप आहे, असे मानून स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करण्याची भूमिका काही शतकांपर्यंत ख्रिश्चन पंथाची होती. नंतर प्रबोधनाच्या चळवळीमुळे चर्च, कॉन्व्हेंट आदी ठिकाणी बसलेल्यांनी जनरेट्यापुढे झुकत स्त्रियांकडे माणूस म्हणून पाहायला सुरुवात केली. पण, आजकाल केरळसह ख्रिश्चन संस्थांत घडत असलेल्या प्रकारावरून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती निर्माण होते की काय, अशी शंका येते.

 

इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे, ती म्हणजे देशातील कथित पुरोगामी विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते, स्त्री मुक्तीदाते, पत्रकार, अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाले आणि असहिष्णुतेची आवई उठविणाऱ्यांचा दुटप्पीपणा. केरळचेच उदाहरण घेतले तर शबरीमला मंदिरात विशिष्ट वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरून निवडक लोकांनी हेतुपुरस्सररित्या आगी लावण्याचे उद्योग केले. पण इथे चर्चमधील बिशपने एका ननवर बलात्कार केल्याचे उघड झाले आणि आता अशा प्रकाराला विरोध करणाऱ्या नन्सवरच कारवाई करण्यात आली तरी, देशातले तमाम पुरोगामी मूग गिळून गप्प बसले. एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याला नख लावल्याचा आरोप करणाऱ्यांनाही ही असहिष्णुता दिसली नाही, ना कोणी निषेधाचे खलिते नाचवले. या लोकांना खरेच महिलांविषयी कळवळा असता तर चर्च प्रशासनाच्या विरोधात त्यांनी पोटतिडकीने आवाज उठवला असता, घोषणाबाजी केली असती. मात्र, त्यांनी तसे काहीही केले नाही. कारण, अर्थातच समोर हिंदू धर्मीयांचा नव्हे तर ख्रिश्चन धर्मीयांचा मुद्दा होता. कुठल्याही घटनेचा जाती-पातीचा, धर्म-पंथाचा निकष लावून विचार करणाऱ्यांच्या दृष्टीने चर्चमधील पापे ही लपविण्यासारखीच असतात. बिशप, फादर, कार्डिनल आदींच्या पांढऱ्या झग्याआड दडलेले काळेबेरे या लोकांना कधी दिसतच नाही. माध्यमांतही ख्रिश्चन वा मुस्लीम धर्मगुरूंनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टींचा बोलबाला कधीही होत नाही. कुठेतरी कोपऱ्यात त्याची बातमी दिली जाते आणि वृत्तवाहिन्यांवर एखाद्या वाक्यात झटपट बातम्यांत हे विषय संपवले जातात. म्हणजेच गुन्ह्यामध्ये अडकलेला मुल्ला-फादर असेल तर अळीमिळी गुपचिळी आणि एखादा हिंदू धर्मातील बाबा-बुवा असेल तर भोकाड पसरायचे, असा हा दुटप्पीपणा. म्हणूनच अशा दुतोंडी लोकांच्या ढोंगाचा बुरखा फाडणे, त्यांची लबाडी उघड करणे आपले कर्तव्य ठरते, जे आपण नेहमी निभावलेच पाहिजे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@