मुंबई पालिका रुग्णालयात रक्त चाचण्या मोफत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2019
Total Views |



मुंबई : मुंबईसह राज्यभरातून रुग्ण तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात येत असतात. अनेकवेळा उपचारादरम्यान खाजगी केंद्रातून रक्त चाचण्या कराव्या लागतात. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर खूप पैसे मोजावे लागतात. हा आर्थिक ताण कमी करण्यासाठी पालिकेच्या रुग्णालयांत गोरगरीबांना विविध आजारांवरील तब्बल १३९ प्रकारच्या रक्तचाचण्या मोफत करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

 

मुंबईत पालिकेची ४ प्रमुख, माध्यमिक सेवा अंतर्गत १६ उपनगरीय व ५ विशेष रुग्णालये आहेत. शिवाय प्राथमिक आरोग्य सेवा अंतर्गत १७५ दवाखाने व २८ प्रसूतिगृहे आहेत. यामधील ४ प्रमुख रुग्णालयांतील प्रयोगशाळेत आठवड्याचे सातही दिवस २४ तास मूलभूत आणि प्रगत चाचण्या केल्या जातात. मात्र, अनेक चाचण्यांसाठी रुग्णांना खासगी लॅबमधून चाचण्या करून घेण्यासाठी साधारण २ ते ५ हजार रुपये खर्च करावे लागतात. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये १०१ चाचण्या १०० रुपयांत तर पुढील ३८ अ‍ॅडव्हान्स चाचण्या २०० रुपयांत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला.

 

यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सर्व चाचण्या मोफत करण्यात याव्यात अशी सूचना मांडली. मात्र, सर्व चाचण्या मोफत दिल्यास गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. यावेळी बीपीएलकार्डधारक गोरगरीब रुग्णांना ही सेवा मोफत द्यावी आणि इतर रुग्णांकडून ५० रुपयांचे शुल्क आकारावे, अशी उपसूचना भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी मांडली. याला शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यामुळे बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जाहीर केले.

 

पालिकेच्या रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे ते राज्याच्या कानाकोपर्‍यातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्यांवर मोठा खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशन' योजनेंतर्गत ही निदान व सेवा' पुरवली जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय गोरगरीबांना फायदेशीर ठरणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@