कुचिंतनाचा फ्लू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. यावर एका प्रसिद्ध वेबपोर्टलच्या पत्रकाराने एक ट्विट केले. ‘स्वाईन फ्लूमुळे लोक मरतात, बरोबर ना?’ असे त्या पत्रकाराने नेमके आताच ट्विट करण्यामागचे कारण न समजायला लोक दुधखुळे नक्कीच नाहीत. याचबरोबर ‘मी बाई पुरोगामी’ असे म्हणत स्वत:च स्वत:ला ‘विचारवंत’ समजणाऱ्या मुग्धा कर्णिकनेही मत मांडले की, “डुकरालाच फ्लू झाला.” असो, मग काँग्रेसच्या खासदाराने तरी का मागे राहावे म्हणा? हे महाशय म्हणाले की, “कर्नाटकच्या जनतेने शाप दिला. त्या शापामुळे अमित शाहंना स्वाईन फ्लू झाला.” आता हे सगळे ऐकून-वाचून हसावे की रडावे की आणखी काय करावे, हे काही कळत नाही. स्तुती मिश्रा काय, मुग्धा कर्णिक काय किंवा हे काँग्रेसी खासदार काय यांच्यात बाह्य फरक असले बाकी वृत्ती अगदी जिवाशिवासारखी एकच. ती वृत्ती म्हणजे, ज्या व्यक्ती आपल्या विचारांच्या चौकटीत बसत नाहीत त्यांनी मरायलाच हवे. अर्थात, ते स्वत:ला कितीही निष्पक्ष वगैरे समजत असले तरी सर्व चोर मंडळी (माफ करा ‘थोर’ म्हणायचे होते.) तर हो, ही सारी मंडळी सडक्या विचारसरणीची पिलावळ आहेत, हे सांगायला नको. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, आपले मत कुणीही मांडू शकतो. पण, एखाद्याच्या मृत्यूची कामना करणे, एखाद्याचे वाईट चिंतणे हे कोणत्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यामध्ये मोडते? आपण ज्याचे वाईट चिंतीत आहोत, त्या व्यक्तीचे बाह्यपद काहीही असले तरी ती व्यक्ती माणूसच आहे. त्या व्यक्तीलाही कुटुंब असेल. हे विसरून त्या व्यक्तीवर जळजळ व्यक्त करणारे लोक कोणत्या मानसिकतेचे गुलाम आहेत? ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असे म्हणत विश्वकल्याणाची चिंता करणारी आपली संस्कृती. मात्र, आजही वस्तीपातळीवर काही प्रेमळ वाक्यं अगत्याने ऐकू येतातच, जसे ‘अशा ठिकाणी मरशील जिथे तुला प्यायला पाणी मिळणार नाही,’ ‘मेलास तर शांती मिळणार नाही,’ ‘तू नरकातच जाशील,’ वगैरे वगैरे. पण, हे बोल आजारी असलेल्या व्यक्तींसदंर्भात गल्लीपातळीवरही चुकूनही वापरले जात नाहीत. कारण, विद्वानांच्या आणि पुरोगाम्यांच्या चौकटीबाहेरील या माणसांनाही संवेदनशीलतेचे मानवी मूल्य माहिती आहे. पण, स्वत:ला ‘मानवतावादी विचारवंत’ मानणाऱ्या स्तुती आणि मुग्धाला ही मानवी मूल्यं माहिती नाही. कदाचित तेवढे माणूसपणही त्यांच्याकडे नसेल.
 

यांचा धंदा थांबवायला हवा

 

एक प्रौढ मनुष्य होता. आपण काय बोलतो आहोत, त्याचा संदर्भ न लागता बोलणे ही त्याची खासियत. हो, कुठेही डोळा मारणे हा सुद्धा या व्यक्तीचा अधिकार हस्त. हा प्रौढ मनुष्य तळ्यात मळ्यात खेळत आपले धर्म बदलत असतो. निदान तसे दाखवतो तरी. आता ‘काय भुललासि वरलिया रंगा’ असे संतविभूती म्हणून गेले तरी आपले लोक वरल्या देखाव्याला भुलतातच भुलतात. त्यामुळे या मनुष्याला कुठे कुठे अकस्मात अनपेक्षितपणे सत्तालाभही झाला. असो, तर हा मनुष्य सुट्ट्या घेण्यातही कमालीचा पटाईत. जाऊ द्या माणूस असल्यामुळे गरजच आहे ती. लोकांचे म्हणणे आहे की, ‘आलूपासून सोना’ काढणाऱ्या या माणसाचे काय होणार? आता लोक काहीही म्हणोत, पण मुद्दा असा आहे की, या माणसाने देशातल्या देशात फिरावे, भाजप, मोदी गेला बाजार रा. स्व. संघाला शिव्या घालाव्यात, त्यांच्याबद्दलच्या खोट्या अफवा पसरवाव्यात. शून्य माहिती आणि तितकेच शून्य ज्ञान असताना कोणत्याही विषयावर चुकीची माहिती द्यावी. इथपर्यंत ठीकच आहे, पण रोम, इटली, थायलंड वगैरे पट्ट्यात फिरणारा हा माणूस मागे चीनच्या दूतावासातही फेरफटका मारून आला होता. मंदिरामध्ये लोक मुलींना छेडण्यासाठी जातात, असे त्याचे पक्के मत असल्यामुळे तो पूर्वी कधी मंदिरात जाण्याच्या भानगडीत पडला नाही. पण, काही दिवंसापूर्वी प्रत्येक देवळात जाताना लोकांनी याला पाहिले. त्यावेळी पहिल्यांदा कळले की, याचे कुणालाही माहिती नसणारे गोत्रबित्रही आहे. हा विषयांतर झाले. तर मुद्दा असा की, हा माणूस सौदी अरेबियाला सध्या भेट देत आहे. का? म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर देशांना भेटी देऊ शकतात, तर परंपरेने युवराज असलेले आणि बापजाद्यांपासून सत्ताफळ चाखणाऱ्या या मनुष्याने इतर देशांना का भेट देऊ नये? द्यावी, जरूर द्यावी, पण तिथे जाऊन त्याला ज्या देशात पंतप्रधान बनायचे आहे, त्या देशाला परक्या देशात, सौदी अरेबियात जाऊन या माणसाने दूषणे दिली. देशात सध्या शेतकरीवर्ग कसा बेहाल आहे, असे रडगाणे गायले. देश शेतकी तंत्रज्ञानात कसा मागे आहे, हेही अभिमानाने सांगितले. ज्या माणसाला परदेशात देशाची उणीदुणी काढताना काहीही वाटले नाही, त्या माणसाला देशवासीयांबद्दल काय वाटत असेल? याबद्दल लोकांनी विचार करायलाच हवा. कारण, देशाचे खायचे आणि देशालाच बदनाम करायचे हा यांचा धंदा थांबवायला हवा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
@@AUTHORINFO_V1@@