खौफमुक्तीचा ‘रहाफी’ लढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
सौदी अरेबियामध्ये एकीकडे महिलांच्या सुधारणेचे वारे वाहतानाचे निर्णय कानी पडताना, दुसरीकडे गेल्याच आठवड्यात सौदीमधून पलायन करणारी रहाफ अल्कुनून चर्चेत आली. याच रहाफच्या या लढ्याविषयी...
 

गेल्या आठवड्यात सौदी अरेबियातून पलायन करून निवाऱ्याच्या शोधात भटकणाऱ्या एका मुलीने जगभरात चांगलीच खळबळ माजवली. “माघारी पाठवले तर माझे कुटुंबीय मला मारून टाकतील,” अशी आर्त हाक देत ती सर्वत्र आश्रय मागत होती. थायलंड, ऑस्ट्रेलिया, संयुक्त राष्ट्र अशा प्रत्येकाकडे तिने आशेने मदत मागितली आणि अखेर तिला मदत मिळालीही. पण कोण होती ही मुलगी? का पळाली ती घर सोडून? विशेष म्हणजे तिला स्वतःचा देश सोडावासा का वाटला? आपल्याला माहितीच असेल की, इस्लाम धर्माचे धार्मिक नीती-नियम किती कठोर असतात ते. महत्त्वाचे म्हणजे इस्लामी देशात जसे की, अरब राष्ट्रे, पाकिस्तान, सीरिया, इराक आदी ठिकाणी महिलांवर कितीतरी बंधने लादली जातात. असाच एक देश म्हणजे सौदी अरेबिया. जगातल्या उदारमतवादी देशांनी आपल्याला आश्रय द्यावा म्हणून मदत मागणारी ही मुलगी सौदी अरेबियाचीच नागरिक, तिचे नाव रहाफ मोहम्मद एम. अल्कुनून आणि वय वर्षे १८. तिने ७ जानेवारीला कुटुंबीयांच्या भीतीने देश सोडला आणि थेट बँकॉक गाठले. तिथे गेल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी तिला रोखले व पुन्हा स्वदेशी जाण्यास सांगितले. नंतर मात्र तिने जी आपबिती सांगितली ती ऐकून तिला माघारी पाठविण्याचे प्रयत्न सोडून देण्यात आले.

 

सौदी अरेबियातील एका श्रीमंत कुटुंबातील सदस्य असलेल्या रहाफचे वडील व्यावसायिक. कट्टर इस्लामी प्रथा-परंपरांचे पालन करणाऱ्या या कुटुंबात रहाफ वाढली. सुरुवाती-सुरुवातीला पूर्वापार चालत आलेल्या रुढींचे तिने रडतखडत पालनही केले. पण, नंतर मात्र तिला इस्लाममधील नियमांचा जाच होऊ लागला व तिने त्याला विरोधही केला. मुली-महिलांनी धर्माच्या वर्चस्वाखालीच राहावे, अशी मानसिकता बाळगणाऱ्या कुटुंबात तिचे स्वतंत्र स्थानच नव्हते. जे काही करायचे, ते घरच्यांच्या संमतीनेच. पण, एकदा तिने अशी परवानगी न घेता स्वतःचे केस कापले, बॉयकट केला. झाले, मुलींनी केस न कापण्याचे बंधन तोडले म्हणून तिला सहा महिने घरात कोंडण्यात आले. तिथून पुढे तिच्या स्त्री असण्याचा पदोपदी अवमान केला जाऊ लागला. तिच्याविरोधात हिंसक पद्धतीने वर्तन केले जाऊ लागले. परिणामी तिला हा त्रास असह्य झाला आणि रहाफने एके दिवशी इस्लामचा त्याग केला. रहाफने धर्म सोडून नास्तिकतेचा मार्ग पत्करला, तेव्हा तिचे वय होते १६. अत्यंत कडक आणि सक्तीने नियमपालन केल्या जाणाऱ्या कुटुंबीयांना ही गोष्ट कळली तर काय होईल, या भीतीने रहाफ घाबरली. पण असे घाबरून, मारून-मुटकून, मनाविरुद्ध किती दिवस जगणार? जर स्वतःच्या नास्तिकतेबद्दल घरातल्या सदस्यांना समजले तर, ते जीवच घेतील, ही तिची धारणा झाली. अखेर तिने यापासून सुटका करून घेण्याचे ठरवले. पण सुटका तरी कशी करणार? कारण घराबाहेर पडलो तरी संपूर्ण देशात स्त्रियांबाबतचे कायदे-कानून सारखेच तर होते ना! मग करायचे तरी काय? पलायन. कुठे तर देशाबाहेर... हाच एक मार्ग सुटकेचा, स्वातंत्र्याचा! आणि ती पळाली...

 

कुटुंबीयांसह कुवेतमध्ये सुट्टी घालवतानाच तिने ऑस्ट्रेलियाला जाण्याची व तिथे शरणार्थ्याचा दर्जा मागण्याची योजना तयार केली. कुवेतमधूनच तिने ऑस्ट्रेलियाचे तिकीट काढले. कारण, तिथे टुरिस्ट व्हिसा मिळण्याची प्रक्रिया सोपी-सुलभ आहे. पण, कुवेत एअरलाईन्सद्वारे ती जशी बँकॉकला पोहोचली तसा तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. थायलंडला पकडल्यानंतर तिला घरी पाठविण्याचा प्रयत्न झाला, तर तिने स्वतःला विमानतळावरील हॉटेलमध्ये बंद करून घेतले. तिला घेण्यासाठी आलेल्या वडील आणि भावाचीही रहाफने भेट घेतली नाही. थायलंडमधूनच मग तिने आपल्याला शरणार्थ्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली. तिने ऑस्ट्रेलियन सरकार, संयुक्त राष्ट्रांकडेही आश्रयाची मागणी केली. पुढे जगातील मानवाधिकार कार्यकर्ते व उदारमतवादी लोकांनीही अन्य देशांकडे रहाफला निवारा मिळावा, यासाठी आवाहन केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या ‘हाय कमिशन ऑफ रिफ्युजी’ने रहाफला शरणार्थ्याचा दर्जा दिला. अखेर कॅनडाने तिची मागणी मान्य केली व टोरंटोत स्वागत असेल, असेही सांगितले.

 

सध्या रहाफ कॅनडाची राजधानी टोरंटोत राहत असून तिने तिथल्या काही प्रसारमाध्यमांना मुलाखतही दिली. “कॅनडात आल्यानंतर माझा पुनर्जन्म झाल्याचे वाटत आहे,” अशा भावना तिने व्यक्त केल्या. कॅनडातील लोकांनी केलेले स्वागत आणि त्यांच्या प्रेमामुळे मी भारावल्याचेही रहाफ म्हणाली. सोबतच, “जर मी आणखी काही दिवस सौदी अरेबियात राहिले असते तर, मी जी काही स्वप्ने पाहिली, ती कधीही पूर्ण करू शकले नसते,” असेही तिने सांगितले. कॅनडात आश्रय मिळाल्याने आतापर्यंत सौदी अरेबियात ज्या काही मध्ययुगीन अटी व शर्तींवर ती आणि तिच्यासारख्या कित्येक स्त्रिया जीवन कंठतात, तसे रहाफच्या वाट्याला येणार नाही. तिने जी कामे कधी केली नव्हती तीदेखील तिला आता करता येतील. शिवाय ज्या गोष्टी शिकण्याची संधी सौदी अरेबियात मिळाली नाही, त्यादेखील रहाफला शिकता येतील. या सगळ्या भावी जीवनाबद्दलच्या अपेक्षा तिने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून मांडल्या आहेत. त्याचबरोबर रहाफला आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे, जेणेकरून तिला चांगली नोकरी मिळेल व त्यानंतर ती सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगू शकेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@