त्यांच्या जगण्यातले काही प्रश्न...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019   
Total Views |


 

 
तिकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अडचण, शेतकरी एकल महिलेनं सोडविली. उद्घाटनाच्या कार्यक्रमात ती सादर झाली. संमेलनाच्या उद्घाटनाच्या सांजेला तिकडे तिच्या भाषणावर टाळ्या पडत होत्या. त्याच वेळी हरिभाऊलातेरवंया नाटकात काम करणार्या अशाच एका एकल महिलेचा फोन आला. ‘‘भाऊ, बोलाचं होतं...’’ आता कार्यक्रम सुरू होता, पण हरिभाऊ गर्दीच्या थोडा बाजूला गेला... ‘‘हं, आता बोल...’’ ती काही काळ तशीच थांबली. तिच्या कातर श्वासांचे भेदरलेले उसासेच काय ते काही काळ ऐकू येत होते. खूप काही झाल्याशिवाय त्या अशा इतक्या भेदरत नाहीत. त्यामुळे हरिभाऊला (इथापे) कळलं की, काहीतरी नक्कीच गडबड आहे. ‘‘मले माहीत हाय भाऊ, का तुमी वैशालीच्या कार्यक्रमात आहात, पन इलाजच नोता म्हून फोन केला.’’ हरिभाऊ शांतपणे म्हणाला, ‘‘काही होत नाही, बोल...’’ ती सांगत होती, ती नाटकांत काम करते, शिबिर फॉर्ममध्ये होणार्या तालमींना जाते म्हणून आधीच गावात अस्वस्थता होती. त्यात तिच्या आप्तांचीच जास्त खसखस होती. अशात तिला गावात एकानं आडपं गाठून नाटकाबद्दल अभिनंदन केलं अन्‌ ‘‘नाटकाले जाते, चांगलं काम करते...’’ अशी सुरुवात करत त्यानं, ‘‘नाटकांत नाईट मारतं, किती पयसे भेटते तुले? त्याच्यापेक्षा माह्याकडे मार... जास्त देईन.’’ अशी विकृत ऑफर दिली. यावर काय करावं, असा तिचा प्रश्न होता...
 

तिकडे वैशालीच्या भाषणावर टाळ्या पडत होत्या. सगळ्या वृत्तवाहिन्यांवर तिचं भाषण लाईव्ह दाखविलं जात होतं. तिचा अगदी साधा आणि करारी चेहरा पाहून अनेकांना तिच्याबद्दल आपुलकी वाटत होती. ती सांगत होती, ‘‘मी बारावीच शिकली हाय; पन बहिनाबाईची लेक हाव. म्हून मी ज्योतिषाले हात नाही दाखवत, जो कोनी माह्या आंगावर हात टाकते, त्याले मी हात दाखवत असतो!’’ अडचणीच्या वेळी गल्लीतली बाईच कामी येते, हेही तिनं खरं करून दाखविलं होतं. शेतकर्यांच्या दु:खाचं, समस्यांचं भाडवलं केलं जातं. त्यांचा मस्तपैकी वापर करून घेतला जातो. संमेलनाला विरोध करणार्यांनी तो केला तसा समर्थन करणार्यांनीही केला. जगणं मांडणार्यांपेक्षा ते जगणारेच मोठे असतात. तेच खरे साहित्यिक असतात. काळाच्या छातीवर कृतींच्या लेखणीने ते हे वाङ्मय लिहीत असतात. आता अडचणीत आल्यावर शेतकरी एकल महिला आठवली होती. चेहर्यावरची वेदना लपवून ती तुमच्या आनंदात सहभागी झाली होती. अशा सोहळ्यात येण्यासाठी आवश्यक असलेले किमान बरे कपडे तरी तिच्याकडे आहेत का, याचाही विचार कुणी केला नव्हता. जुन्या कपड्यांत, जुनार साडीत ती येणार होती का?

 

नंतर मात्र ती एकदम नायिकाच झाली. तीन दिवसांचा सन्मान तिच्या वाट्याला आला होता. ते करतानाही आम्ही बघा कसे समाजशील आहोत, असा आविर्भाव आणला गेला होता. तिने तुमची अडचण सोडविली होती. ती तिच्याचसारख्या हजारो महिलांची प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर आली होती. म्हणून म्हणाली, ‘‘आम्ही विधवा नाही... समाजच विधवा झाला आहे.’’ तिच्या वाक्यांवर टाळ्या वाजवीत असताना टाळ्या वाजविणार्या हातांची काही जबाबदारी आहे, याचे भान उपस्थितांपैकी थोडक्यांना आले असेल, तरी कमावले!

 

नंतर तिला नामदार संजय राठोड बोलले. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशीच तिचे बोलणेही करून दिले. आता अनेक जण संपर्क करत आहेत. ‘‘वैशालीताई येतील का आमच्या कार्यक्रमाला?’’ असे विचारले जात आहे. वैशालीच का? तुमच्या आजूबाजूला आत्महत्याग्रस्त एकल महिला बर्याच असतील. त्याही तसलाच संघर्ष करत आहेत. त्यांच्याही वाट्याला तेच भोग आले आहेत. त्यांना केवळ मिरविण्यासाठी कार्यक्रमाला बोलावू नका, त्यांच्या समस्या जाणून घ्या अन्काय करता येते ते बघा, असे आता कार्यकर्ते सांगत आहेत. ज्या वयात गरत्या घरच्या मुलींच्या लग्नाचाही विचार केला जात नाही त्या वयात या मुलींच्या वाट्याला वैधव्य आले आहे. वैशाली म्हणाली तेच खरे आहे. हे निसर्गानं आलेलं वैधव्य नाही. व्यवस्थेनं लादलेलं आहे. वैधव्य लादून परत व्यवस्थेला त्याच्याशी काहीच सोयरसुतक नाही. एकवीस-बाविसाव्या वर्षी एकट्या पडल्या असताना त्यांच्या पदरी एक किंवा दोन लेकरं आहेत. या भगिनींच्या भावना याच की, आम्ही कास्तकारांची पुढची पिढी वाढवीत आहोत. आजा कर्जात गेला, बाप व्याजात मेला अन्ही कोवळी पिढीही अशीच करपली तर शेतीत राबणारे अन्मातीशी नाते सांगणारे कुणीच उरणार नाही. त्यामुळे त्या शेतीच करत आहेत. त्यांना शेतीच करायचीही आहे. कारण त्यांनी तसे नाही केले, तर शेती सामान्यांच्या मालकीचीच राहणार नाही. या बायकांच्या नावे सात-बारा करून द्यायला त्यांचे सासरचे तयार नाहीत अन्माहेरचेही त्यांच्या पाठीशी उभे रहायला तयार नाहीत. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत असताना एकीने सांगितले की, घरी (सासरी) चांगली कास्तकारी असतानाही तिला त्यात वाटा द्यायचे दूरच, पण तिची रवानगी ओस पडलेल्या गोठ्यात करण्यात आली. तिच्याशी कुणी बोलेना. सासरच्यांच्या दबावाखाली गावकरीही कुणी बोलत नव्हते. तिच्या लेकरांनाही शाळेत वेगळे बसविले जाऊ लागले. घरी जावा-नणंदांची मुलं हिच्या मुलाशी खेळत नव्हती अन्शाळेतही अचानक सारी मुलं त्यांच्याशी फटकून वागू लागली. हिला घरच्याच शेतात वेठबिगारी करण्याची सक्ती. त्यामुळे ती शेतात गेली की झाडांजवळ रडायची, त्यांच्याशी बोलायची!

शहरा आणणारं आहे हे. त्यात त्या लढत आहेत. मुलांचे संगोपन करत आहेत. त्यांच्या सावलीत वाढणारी ही पिढीही भारतीयच आहे, हे राष्ट्रगीताला उभे राहणार्या प्रत्येक भारतीयाने समजून घ्यावे.

इंदिरा गांधींनी सीलींगचा कायदा आणला. शेतीचे तुकडे पडले. ते या सामान्य शेतकर्यांना मिळाले. आता पुन्हा ते बडे उद्योगपती, स्थानिक पैसेवाले अन्सेलिब्रेटी विकत घेत आहेत. पुन्हा एकदा तीन-चारशे एकरवाले तयार होत आहेत. त्यासाठी पद्धतशीर वातावरण तयार होत आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही अन्दुसरीकडे जमिनीचे भाव गगनाला भिडत आहेत. गावाजवळून रस्ता गेला की शेतीचे भाव वाढतात. मग शेती विकली जाते. दुष्काळी स्थितीत तर पुण्या-मुंबईच्या गर्भश्रीमंतांच्या घशात या जमिनी घालण्यासाठी एजंटच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा तीन-चारशे एकराचे नवे मालक तयार होत आहेत. त्यांना शेती करायची नाही. विकासात्मक कामांसाठी किंवा रीयल इस्टेटचा धंदा करण्यासाठी या जमिनी वापरायच्या आहेत. मागे एका बड्या उद्योगसमूहाने यवतमाळ जिल्ह्यातील सलग हजार एकर जमीन खरेदी करण्यासाठी एजंटच नेमले होते... भूस्वामी म्हणजे राजा. या देशातल्या जमिनींची मालकी राजकीय नेते, बडे उद्योगपतींकडे गेली, तर सामान्य माणूस राजा राहणार नाही. या बायकांचा लढा किती व्यापक आहे, हे लक्षात घ्या. त्यांना कसायला जमीन हवी आहे. ज्यांना ती मिळाली त्या शेतीच करत आहेत. त्यांचा अडथळा बाजूला करण्यासाठी किती वरच्या पातळीवरचे प्रयत्न आहेत,

हे लक्षात आलं की शहारायला होतं. सासरचे म्हणतात, ‘‘आम्हाले शेती इकाची हाय. तू सही कर. सलग इकली गेली त ज्यादा भाव भेटते...’’ हिला शेती विकायची नाही. तिला गावात राहायचे आहे. शहराकडे तिची धाव नाही. मुलांना शिकवायचे आहे. गावात डोक्यावर छत हवं आहे. आता कौतुक केलं जात असलेल्या वैशाली येडेचं राहतं घर जाऊन बघा. जनावरंदेखील अशा जागेत राहणार नाहीत. तिच्या मुलांना शिक्षणासाठी तरी दत्तक घ्यायला हवे. हे सारे केवळ तिच्याचसाठी व्हावे असे नाही. पाच-सात हजार अशा महिला आहेत. शासनानेच हे करावे असेही नाही. समाजाचे कर्तव्य केवळ तिच्या भाषणावर टाळ्या वाजवून पूर्ण होत नाही. संमेलनाध्यक्षांना मराठी भाषेच्या कामासाठी एक लाखाचा धनादेश दिला जातो. ऐनवेळी उद्घाटन करून लाज राखणारीलाही असाच धनादेश दिला असता तर बरे झाले असते. कारण मराठी जिवंत ठेवण्याचे काम खेड्यांतच होते. शहरांत पंचतारांकित शाळांत शिकून न्यू यॉर्क गाठणार्या पिढीच्या पालकांपेक्षा खेड्यात राहून मराठीत शिकून मराठीच बोलणारी पिढी जगविण्यासाठी आयुष्याचं रान करणारीच खरी मराठीची संवर्धक आहे. दोन- अडीच कोटींचं संमेलन घेणारे लाखभराचं वैशालीचं घर उभं करून देतील?
@@AUTHORINFO_V1@@