यवतमाळी दिसला हा ‘श्याम’ सुंदर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019   
Total Views |


 


९२व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात उत्स्फूर्तपणे निमंत्रितांसाठी वाहनव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या श्याम जोशी यांची ओळख झाली आणि मग त्यांच्या जीवनातले विविधांगी पैलू अगदी अलगदपणे उलगडत गेले.

 

यवतमाळ.... नागपूरपासून अवघ्या तीन तासांवर असलेला विदर्भातील एक जिल्हा. पण, तरीही सर्वस्वी दुर्लक्षित आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे कलंक माथी लागलेला. पाण्यासाठीही तितकीच वणवण. असा हा चारही बाजूंनी माळांनी वेढलेला यवतमाळ... या जिल्ह्याची लोकसंस्कृती, शेतकऱ्यांचे प्रश्न ९२व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्राच्या प्रकाशझोतात आले. त्याचबरोबर आतिथ्यशील, कायम चेहऱ्यावर स्मित ठेवून सदैव मदतीसाठी तत्पर यवतमाळकरांना भेटण्याचाही योग आला. असेच एक यवतमाळकर म्हणजे श्याम जोशी. श्याम जोशी आणि त्यांच्या तरुण टीमने निमंत्रितांना संमेलनस्थळ ते त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेपर्यंत नेण्या-आणण्याची व्यवस्था अगदी तीन दिवस चोखपणे सांभाळली. याच दरम्यान त्यांच्याशी चांगला परिचय झाला आणि श्याम जोशी ही केवळ एक व्यक्ती नसून ती वल्लीच आहे, यावर पूर्ण विश्वास बसला.

 

जोशी हे मूळचे यवतमाळचे. शालेय शिक्षणही इथलेच. दहावीनंतर त्यांना सैन्यात भरती होण्याची तीव्र इच्छा होती. पण, वडिलांच्या नकारामुळे ते शक्य झाले नाही. श्याम यांची चित्रकलेतील आवड लक्षात घेता, त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये दोन वर्षांच्या आर्ट-टीचर डिप्लोमासाठी पाठवून दिले. पण, त्यांना शिक्षकी पेशाही पत्करायचा नव्हता. याच दरम्यान लपून-छपून त्यांनी बांद्रा स्कूल ऑफ आर्ट्सला कमर्शियल आर्ट्ससाठी परस्पर घेतलेला प्रवेश त्यांच्या लोकलच्या पासमुळे उघडकीस आला. मग काय, ज्या मावस बहिणीकडे ते राहत होते, तिने जोशींच्या वडिलांना बोलवून घेतले. त्यानंतर मुकाट्याने जोशींनी मग दोन वर्षांचा डिप्लोमा जे.जे. मधूनच पूर्ण केला. मुंबईहून यवतमाळला परतले आणि कलाशिक्षक म्हणून अँग्लो इंडिया हायस्कूलमध्ये रुजू झाले. पुढे इतर शिक्षक आणि घरच्यांच्या सांगण्यावरून बी.ए, बी.एड, एम.ए. पर्यंतचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. मराठी विभागप्रमुख म्हणून शाळेत जबाबदारी स्वीकारली आणि ३६ वर्षांच्या सेवेनंतर ते शिक्षकी पेशातून अधिकृतपणे निवृत्त झाले. अधिकृत यासाठी की, आजही जोशी सरांना वेगवेगळ्या शाळेत व्याख्यानांसाठी, मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते. कारण, श्याम जोशी हे हाडाचे पर्यावरणप्रेमी आणि सर्पमित्र. त्यामुळे यासंबंधी ते विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करतात.


 

त्यांच्या लहानपणी त्यांच्या डोळ्यादेखत एकाने साप मारला. त्या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि तेव्हापासून त्यांनी शपथ घेतली की, यवतमाळमध्ये मेलेला सापच दिसणार नाही. इतक्या वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांची स्वप्नपूर्ती झाल्याचे ते सांगतात. १९९७ साली त्यांनी ‘कोब्रा अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड नेचर क्लब’ची स्थापना केली. आज अनेक तरुण-तरुणी त्यांच्या या उपक्रमात सामील झाले आहेत. या क्लबअंतर्गत तरुणांसाठी अनेक निवासी शिबिरं, जंगलातील शिबिरांचे आयोजन केले जाते. आजच्या पिढीची निसर्गाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडली जावी, वन्यजीवांबद्दल त्यांच्या मनात भूतदया निर्माण व्हावी, निसर्गात राहून सकारात्मकता यावी, शरीर-मन सुदृढ-सशक्त व्हावे, या उद्देशाने या शिबिरांच्या केलेल्या आयोजनाला तरुणांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याविषयी सांगताना जोशी म्हणतात की, “जंगल बघणं म्हणजे नुसतं जंगलात फेरफटका मारणं नव्हे, तर आपल्या मन:चक्षूंनी जंगलाचा आस्वाद घेणं. कारण, दर तासाला जंगल बदलत असतं.” पालकांनी मुलांच्या टक्केवारीच्या मागे लागण्यापेक्षा त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात रमू द्यावे, यासाठी ते पालकांनाही मानसशास्त्रीय मार्गदर्शन करतात. मुलांच्या पायाला चिखल लागू द्या, दगड टोचू द्यावे, त्यांना झाडावर चढणे, आपत्कालीन परिस्थितीत पोहता येणे किती गरजेचे आहे, हे जोशी सर पालकांना पटवून सांगतात. “भौतिक सुखाच्या जंजाळात तुम्ही स्वत:ला ढकलून घेतलंत, किमान तुमच्या मुलांना तरी यामध्ये ढकलू नका,” असा मौलिक सल्लाही ते आजच्या पालकांना देतात.

 

प्रकाश आमटेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जोशी अगदी निरपेक्षपणे समाजसेवेत, पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या कामांमध्ये अग्रेसर आहेत. आज यवतमाळमध्ये कुठेही साप दिसला, प्राणी विहिरीत पडला की आपसूकच मदतीची पावलं जोशीवाड्याकडे वळतात. इतकेच नाही, तर मृत प्राण्यांचे, माणसांचे शवविच्छेदनही जोशींनी कुठलेही अधिकृत प्रशिक्षण न घेता आत्मसात केले आहे. त्यांच्या मते, शहरातील माणूस हा भौतिकदृष्ट्या श्रीमंत असला तरी शारीरिकदृष्ट्या भिकारीच म्हणावा लागेल. कारण, ग्रामीण भागातील माणसं फाटकी असली तरी त्यांचं दोन वेळचं व्यवस्थित भागतं. शरीरयष्टी सुदृढ राहते. सकारात्मकता नांदते. शहरात परिस्थिती नेमकी याउलट. म्हणून आपल्या मुलांना जीवनाला उपयुक्त ठरणारं शिक्षण देण्याचा ते आग्रह धरतात. इतकेच नाही तर गावाकडे विहिरीत पडणाऱ्या, बुडणाऱ्या माणसांच्या समस्येवर त्यांनी मिनरल बॉटलच्या साहाय्याने बनविलेल्या लाईफ जॅकेटचाही आपल्या शेतातील विहिरीत यशस्वी प्रयोग केला आहे. त्याला अधिक व्यापक पातळीवर राबविण्यासाठी जोशी प्रयत्नशील आहेत. “निसर्गापासून जितके दूर जाल, तितके दु:खी व्हाल,” हा संदेश चौफेर देणारा असा हा एक अवलिया. आजचे पालक, तरुण पिढी, एकूणच समाजाला निसर्गाशी जोडणारा हा खऱ्या माळावरचा एक हरित दुवा...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@