अर्जुनास दृष्टांत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
कृष्ण आपल्या मंचकावर निद्रेची वाट पाहात बसून होता, पण त्याला काही केल्या झोप येत नव्हती. त्याने आपला सारथी दारूक यास बोलावून घेतलं आणि त्यास म्हणाला, “दारूका, अर्जुनाने घेतलेली शपथ तुला ठाऊकच आहे, पण तो जयद्रथास ठार करू शकेल कीनाही, याबाबत मी साशंकच आहे. कारण, त्याला भिडणारे सारे योद्धे एकाहून एक भयंकर आहेत. शिवाय, आता दक्षिणायन सुरू असल्यामुळे सूर्यास्तही लवकर होतो. त्यामुळे त्याला वेळ कमी मिळणार आहे. मला त्याची खूप चिंता लागून राहिली आहे. जर तो जयद्रथापर्यंत पोहोचू शकला नाही तर? त्याला अग्निप्रवेश करावा लागेल आणि जिथे अर्जुन नाही त्या जगात मलाही राहायचे नाही. मला माझी शपथ मोडून उद्या लढावे लागेल, असे वाटते. तू माझी सारी आयुधे रथात आणून ठेव. मला अर्जुनाहून माझी प्रतिज्ञा काही मोलाची नाही. मी ती मोडेन. माझे सुदर्शन चक्र आणि माझी कौमोदकी गदा यांचा मी उद्या प्रयोग करेन. माझे सारंग हे धनुष्यदेखील रथात आणून ठेव. रथावर गरुड ध्वज लाव. वालाह्क, शैब्य, मेघापुश्प आणि सुग्रीव या माझ्या उत्कृष्ट घोड्यांना रथास जोड. घोड्यांना चिलखत घाल आणि तुही चिलखत घाल. मी उद्या पराक्रमाची शर्थ करीन आणि माझ्या अर्जुनाचे प्राण वाचविन.” यावर दारूक म्हणाला, “प्रभू, तुम्ही त्याच्याबरोबर असताना अर्जुन पराजित होऊच शकत नाही. तो नक्कीच यशस्वी होईल. पण तरीही मी सारे तयार ठेवतो.”
 

इकडे अर्जुनही शय्येवर पडला होता, पण त्यालाही झोप लागत नव्हती. ‘अविचाराने प्रतिज्ञा केलीस,’ हे कृष्णाचे शब्द त्याला सारखे आठवून तो अस्वस्थ होत होता. त्याची झोप अस्वस्थ झाली आणि त्याला एक विचित्र स्वप्न पडले. त्यात कृष्ण वितळून जातोय,असे दिसले. स्वप्नात कृष्ण त्याला म्हणाला,“अर्जुना, चिंता माणसाला जाळत असते, तेव्हा तू चिंता करणे सोड. ती तुला दुर्बल करेल.” अर्जुन म्हणाला, “कृष्णा, मी जर माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर? मला अग्निप्रवेश करून मरावे लागेल.” यावर कृष्ण म्हणाला, “तू पाशुपत अस्त्र विसरलेला दिसतोस! उद्या तू त्या अस्त्राचा वापर जयद्रथावर कर. तुझी प्रतिज्ञा पूर्ण व्हावी म्हणून शंकराची प्रार्थना कर.” अर्जुनाने त्याचे ध्यान केले आणि एकदम एक अद्भुत अनुभव त्याला आला. तो कृष्णाबरोबर आभाळात उडतो आहे, असे दिसले. ते दोघे एका चमकदार पर्वतावर आले, जिथे शंकराचे दर्शन त्यांना घडले. सहस्त्र सूर्यांचे तेज शंकराचे होते. ते त्याला वंदन करीत होते. प्रसन्न होऊन शंकराने विचारले, “तुमची काय इच्छा आहे? मी ती पूर्ण करीन.” अर्जुन म्हणाला, “मला ते विख्यात पाशुपत अस्त्र हवे आहे.” शंकर म्हणाले, “अमृताच्या तळ्यात मी ते ठेविले आहे, तुम्ही तिथून ते घेऊ शकता.” मग शंकराचे अनुयायी त्यांना त्या तलावाकडे घेऊन गेले. तलावात त्यांना एक महाभयंकर साप दिसला आणि आग ओकणारा हजारो फणे असलेला दुसरा सापदेखील दिसला. कृष्ण आणि अर्जुन यांनी रुद्रपठण केले, तेव्हा त्या सापांचे आकार बदलून धनुष्यबाण दिसले. ते घेऊन मग दोघे पुन्हा श्री शंकराकडे गेलेअचानक शंकराच्या अंगातून एक लाल डोळ्यांचा आणि काळ्या निळ्या केसांचा ब्रह्मचारी प्रकटला. त्याने ते धनुष्यबाण हाती घेऊन कसे वापरायचे ते दाखवले. शंकर स्वत: पाशुपत अस्त्राचे मंत्र उच्चारत आहेत, असे त्यांना दिसले. मग त्या ब्रह्मचाऱ्याने ते धनुष्यबाण पुन्हा तलावात सोडून दिले. शंकरास वंदन करून कृष्ण आणि अर्जुन पुन्हा सैन्यातळावर परतले. ते विचित्र स्वप्न हा अर्जुनास एकप्रकारे शुभ दृष्टांतच होता, असे म्हणायचे! 

 
- सुरेश कुळकर्णी 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@