सत्त्वगुणाची महती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
मानवी समाजात सर्व तऱ्हेची माणसे आढळतात. कपिल महामुनींनी त्यांचे वर्गीकरण करून त्यांची सत्त्व, रज आणि तम अशा तीन गटांत विभागणी केली. त्यापैकी रजोगुणी आणि तमोगुणी माणसांची वैशिष्ट्ये आपण मागील लेखांकात पाहिली. समर्थांनी या त्रिगुणांचे आणखी दोन भाग केले आहेत. एक शबल आणि दुसरा शुद्ध. या गुणांतील शबल गट पूर्णतः प्रापंचिक स्वरूपाचा असतो, तर शुद्ध गुण हा पारमार्थिक स्वरूपाचा असतो. मानवी जीवनात सर्वसाधारणपणे देहबुद्धीचा प्रभाव पाहायला मिळतो. त्याचे सर्व व्यवहार, त्याची सुखदुःखे देहावर अवलंबून असतात. देहबुद्धीमुळे अशा माणसांना ‘मी, माझे’ या पलीकडे पाहण्याची सवय नसते. एका अर्थाने ही माणसे स्वार्थी असतात. ती सर्व कर्मे आपल्या प्रपंचासाठी करीत असतात. त्यामुळे हा रजोगुणी असला तरी शबल गटात बसणारा असतो. याउलट आत्मबुद्धीने प्रभावित असणाऱ्या माणसाचे जीवन वेगळ्या प्रकारचे असते. त्याचे प्रापंचिक जीवन सामान्य माणसांप्रमाणे असले तरी त्याच्या ठिकाणी स्वार्थ नसतो. आसक्ती कमी झाल्यामुळे तो निःस्वार्थपणे विवेकाने आपले जीवन व्यतीत करतो. त्याचे वागणे-बोलणे विवेकी असल्याने त्याच्या ठायी सतत भगवंताचा विचार असतो. त्याचे वागणे रजोगुणी वाटले तरी, त्या रजोगुणाचे स्वरूप शुद्ध असते. त्यामुळे हा शुद्ध रजोगुण सत्त्वगुणाकडे झुकणारा असतो. तो निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत असल्याने तो लोकांना योग्य मार्गदर्शन करून भगवंताकडे, समाधानाकडे वळवतो. थोडक्यात तो समाजाला सत्त्वगुणाकडे वळवून सुखी -समाधानी आदर्श जीवनाची माहिती देतो.
 

सत्त्व, रज, तम या त्रिगुणांची लक्षणे स्वामी दासबोधात विस्ताराने सांगतात. तथापि त्या लक्षणांचा शब्दशः अर्थ न घेता त्यात तारतम्य-विवेक बाळगावा लागतो. लक्षणे वरवर पाहताना रजोगुणी-तमोगुणी वाटली तरी त्यामागील हेतूला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्या कृतीमागील भाव महत्त्वाचा असतो. उदाहरणच सांगायचे तर काही तमोगुणी लक्षणांचे सांगावे लागेल. तमोगुणी माणसाची प्रवृत्ती असते की, युद्ध, मारामाऱ्या आपण डोळ्यांनी पाहाव्या. त्यासंबंधीच्या हकिगती ऐकाव्या. एवढेच नव्हे तर स्वतः युद्ध करून कोणाला तरी मारावे किंवा स्वतः मरावे. अशा गोष्टीत त्याला खूप रस असतो. ही सारी तमोगुणी माणसाची लक्षणे आहेत, असे स्वामींनी दासबोधात सांगितले आहे.

 

युद्ध देखावे ऐकावे । स्वये युद्धचि करावें ।

मारावें कीं मरावें । तो तमोगुण ॥

(दा. २.६.१६)

 

आता ही लक्षणे जशीच्या तशी लावून एखाद्याला तमोगुणी ठरवल्याने अनवस्था प्रसंग ओढवेल. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्राच्या आज्ञेने अनेक राक्षसांना कंठस्नान घातले. पुढे सीतेला कपटाने पळवले म्हणून रावणाशी घनघोर युद्ध केले. राम-रावणाचे युद्ध एवढे भयानक होते की, या युद्धाला उपमा द्यायची तर राम-रावणाच्या युद्धाचीच, असे म्हणण्याचा प्रघात पडला. श्रीकृष्णाने मथुरेत जाऊन कंसाच्या दरबारात कंसासमोर त्याचे मल्ल सेवक मुष्टीक आणि चाणूर यांना ठार केले. तसेच कंसाचा वध केला. शिवरायांनी कपटी अफझलखानाला ठार केले. औरंगजेबाच्या सैन्याबरोबर लढाया केल्या. पण, या घटनांना कोणी तमोगुणी म्हणणार नाही. कारण, दुष्टांचा नाश आणि सज्जनांचे रक्षण हे सत्त्वगुणात मोडते. तेच या महान विभूतींनी केले. घटना युद्धाच्या असल्या तरी हेतू सत्त्वगुणी आहे.

 

परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ (गी. ४.८)

 

अशी ग्वाही स्वतः भगवंतांनी दिली आहे. घटनांमागील हेतू बघून सत्त्व, रज, तम ठरवावे लागते, नुसत्या लक्षणांवरून नाही. समाजात सत्त्वगुणी माणसे थोडी असली तरी त्यांच्या एकंदर वागणुकीवर धर्म आणि संस्कृती यांची इमारत उभी असते. सत्त्वगुणी माणसे निःस्वार्थी व विवेकी असल्याने आपल्या गुणांनी ते एकंदर समाजाचे भले करीत असतात. आत्मबुद्धी जागृत असल्याने त्यांची देहबुद्धी मावळून गेलेली असते. अशा आदर्श सात्त्विक गुणाचे वर्णन समर्थांनी दासबोधात समास २.७ मध्ये विस्तारपूर्वक केले आहे. या समासात सत्त्वगुणाच्या ८८ ओव्या आहेत. तथापि त्यातील फक्त काही भाग सारांशरूपाने पुढे मांडला आहे.

 

सत्त्वगुणी माणसाला शुचिर्भूततेचे महत्त्व कळलेले असते. तो प्रातःस्नान, संध्या तसेच नैमित्तिक उपासना न चुकता करीत असतो. त्याला पुण्यकर्मे करणे आवडते. त्यामुळे तो सदैव अंतर्बाह्य शुद्ध असतो. त्याचे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असतात. भजनासाठी भगवंतावर प्रेम असावे लागते. प्रेमासाठी सत्त्वगुणाची आवश्यकता असते. त्यामुळे सत्त्वगुणी माणसाला भजन आणि हरिकथा करणे आवडते. सत्त्वगुणाने मानवाला उत्तम गती प्राप्त होऊन भगवंताच्या दर्शनाचा मार्ग सापडतो आणि सायुज्जमुक्ती त्याच्या हातात येते. परमेश्वरावर त्याचे प्रेम जडते. त्याला परमार्थाची, हरिभक्तीची आवड उत्पन्न होते. परमार्थ मार्गात शांतता, भगवंताचे प्रेम आणि ज्ञान यांची आवश्यकता असते. त्यामुळे सत्त्वगुणी माणसाला या गोष्टी प्राप्त होतात. यज्ञ करणे आणि यज्ञ करवून घेणे सत्त्वगुणी माणसाला आवडते. आज यज्ञकल्पना फारशी प्रचलित नाही. क्वचित प्रसंगी कोठे यज्ञ दिसतात. समर्थांनी सत्त्वगुणाचे हे लक्षण सांगितले. कारण, यज्ञातील त्यागाची, समर्पणाची भावना व त्याद्वारा विश्वकल्याणाचा संकल्प, कृतज्ञता या सार्‍यांतून सत्त्वगुण व्यक्त होत असतो. सत्त्वगुणी मनुष्य अनेक प्रकारची दाने करीत असतो. धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान अशा दानांत सत्त्वगुण असतो. देवाधर्माची आवड, मंदिरे बांधणे, मंदिराभोवती विहिरी तलाव खणणे, पडशाळा, दीपमाळा, भांडारगृहे बांधणे, तुळशीवृंदावन बांधणे ही सारी सत्त्वगुणांची लक्षणे आहेत. देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोय करणे, मंदिरातील व त्यासभोवतीचे वातावरण स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी झटणे, ही सारी सत्त्वगुणाची लक्षणे आहेत. असा मनुष्य देव-देवतांचे उत्सव साजरे करतो. उत्सवासाठी देवळाच्या आवारात नाना वाद्यांचा गजर करणे, देवळात दिंड्या, पताका लावणे यात तो आवडीने भाग घेतो. थोडक्यात, देवद्वारी पडेल ते सारे काम तो आनंदाने करतो. त्यात त्याला कमीपणा वाटत नाही.

 

ऐसी भक्तीची आवडी ।

नीच दास्यत्वाची गोडी ।

स्वयें देवद्वार झाडी ।

तो सत्त्वगुण ॥ (दा. २.७.३०)

 

हरिकथा करायला केव्हाही तत्पर असणे, हा सत्त्वगुणच. हा हरिभक्त एखाद्या कामात गुंतला असला तरी भगवंताच्या प्रेमामुळे ते बाजूला ठेवून तो हरिकथेला तयार होतो. आपला व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवून तो भक्तीसाठी उभा राहतो. उत्सवाला येणाऱ्या भक्तांना तो कधी कठोर शब्दाने बोलत नाही. त्याच्या मुखात नेहमी भगवंताचे नाम असते. त्यामुळे तो सारी कामे निष्काम बुद्धीने करतो. प्रपंचातील आघातांनी त्याचे चित्त डळमळीत होत नाही. त्याने केलेल्या कामांमुळे लोक त्याला ओळखत असतात. तो मेल्यावरही त्याच्या कार्यामुळे त्याची कीर्ती कायम राहते.

 

मरोन कीर्ती उरवावी तो सत्त्वगुण ।

 

आजकाल सभोवार दिसणारे समाजाचे चित्र आशादायक नाही. द्वेष, मत्सर, हाणामाऱ्या अशा तामसी गुणांनी ते रंगवलेले पाहायला मिळते. वृत्तपत्रातील बातम्या, प्रसारमाध्यमांतील दृश्ये सारे मन विषण्ण करणारे आहे. त्रिगुणाच्या भाषेत बोलायचे तर आज तमोगुण व शबल रजोगुण यांची प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे आपोआप शुद्ध रजोगुण व सत्त्वगुण हे निद्रिस्त अवस्थेत गेल्यासारखे वाटतात. ज्या समाजात सत्त्वगुणी व शुद्ध रजोगुणी माणसांचे प्रमाण अधिक असते, तो समाज सुखी असतो. तो समाज शांतताप्रिय, समाधानी असतो. रामराज्याची कल्पना यात दडलेली आहे.

ऐसा हा सत्त्वगुण सात्त्विक ।

संसारसागरीं तारक ।

येणे उपजे विवेक ।

ज्ञानमार्गाचा ॥ (दा. २.७.८६)

 

- सुरेश जाखडी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@