आणखी एक भारतीय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
 
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी एका भारतीय वंशाच्या महिलेचे नाव चर्चेत येणे सर्वार्थाने कौतुकास्पद आहे व तितकेच महत्त्वाचेही आहे. 
 
 
गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या अनेक जागतिक कंपन्या, आर्थिक, राजकीय व सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक नामवंत संस्था यांच्या प्रमुखपदांवर एकामागोमाग एक भारतीय वंशाच्या व्यक्ती विराजमान होत आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे जगभरात भारतीयांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका वाजताना दिसत आहे. यामध्ये आता जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या रूपाने आणखी एका नावाची भर पडण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष जिम याँग किम यांनी येत्या फेब्रुवारीमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता या महाशक्तीशाली संस्थेचा अध्यक्ष कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, पेप्सिकोच्या माजी प्रमुख इंद्रा नुई यांचे नाव या पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.
 

जगातील एक अत्यंत बलाढ्य वित्तीय संस्था म्हणून जागतिक बँक आपल्याला परिचित आहे. १९४४ साली स्थापन झालेल्या या बँकेमध्ये १९४९ पासून सर्वाधिक समभागधारक असलेली अमेरिका या बँकेच्या अध्यक्षपदाची निवड करते आहे. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, मल्टिलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्युट्स अशा पाच महत्त्वपूर्ण संस्थांचा ‘वर्ल्ड बँक ग्रुप’ आहे. ही संस्था जागतिक बँकेची ‘पेरेंट ऑर्गनायझेशन’ आहे. जागतिक राजकारण आणि अर्थकारणात या समूहाची अत्यंत अफाट अशी ताकद व प्रभाव आहे. जागतिक बँकेचा अध्यक्ष हाच या समूहाचाही अध्यक्ष असतो. त्यामुळे अशा या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी एका भारतीय वंशाच्या महिलेचे नाव चर्चेत येणे सर्वार्थाने कौतुकास्पद आहे व तितकेच महत्त्वाचेही आहे.

 

इंद्रा नुई यांची आतापर्यंतची प्रभावी कारकीर्द पाहता, नुई या पदासाठी पूर्णपणे सक्षम आहेत, यात शंकाच नाही. पेप्सिकोसारख्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद त्यांनी थोडीथोडकी नाही, तर सलग १२ वर्षे समर्थपणे सांभाळले. १९५५ मध्ये तामिळनाडूतील चेन्नईमध्ये इंद्रा नुई यांचा जन्म झाला. मद्रास ख्रिश्चन कॉलेज, आयआयएम कोलकाता, अमेरिकेतील येल विद्यापीठ आदी नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये त्यांचे शिक्षण झाले आणि त्यानंतर त्या कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत झाल्या. मोटरोला कंपनीमध्ये कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी विभागात उपाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. पुढे त्या पेप्सिकोमध्ये रुजू झाल्या व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या पुढे थेट सीईओ पदापर्यंत पोहोचल्या. २००६ पासून २०१८ पर्यंत म्हणजे सलग १२ वर्षे त्यांनी पेप्सिकोचे नेतृत्व केले. जागतिक स्तरावर पेप्सिकोचा पाया भक्कम करण्यात नुई यांच्या धोरणांचा वाटा सिंहाचा मानला जातो.

 

अशी ही यशस्वी कारकीर्द घडविल्यानंतर गेल्या वर्षी पेप्सिकोतून त्या सन्मानपूर्वक निवृत्त झाल्या. याशिवाय त्यांनी युएस-चायना बिझनेस कौन्सिल, युएस-इंडिया बिझनेस कौन्सिल, कंझ्युमर गुड्स फोरम आदी संघटनांमध्येही सदस्य म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. २००७ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय जागतिक स्तरावरील अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी नुई यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘फोर्ब्स’ने त्यांचा समावेश जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत केला होता.त्यामुळे भारतीय महिलेच्या कर्तृत्वाचे एक शिखर म्हणून इंद्रा नुई यांच्याकडे पाहता येईल. त्यामुळे जागतिक बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या भारतात जन्माला आलेली महिला या समूहाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यास ही जागतिक स्तरावरील एक उल्लेखनीय घटना ठरेल. अर्थात, ही वाटचाल वाटते तितकी सोपी नाही. कारण, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाशी जागतिक बँकेच्या अध्यक्षाला जुळवून घ्यावे लागेल. नुई या स्पष्टवक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवाय नुई यांच्यासह आणखी दोन नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. मात्र, त्यांचा ‘बायोडाटा’ नुईंइतका प्रभावी नाही. त्यामुळे अंतिमतः ट्रम्प प्रशासन कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. परंतु, नुई यांची खरोखरच या पदावर निवड झाल्यास पुन्हा एकदा भारतीयांच्या जागतिक कर्तृत्वाचा डंका साऱ्या विश्वात गाजेल, हे निश्चित.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@