कन्या वन समृद्धी योजनेत पुणे विभाग अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |



मुंबई : वन विभागाची 'कन्या वन समृद्धी योजना' यशस्वी होताना दिसून येत आहे. राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात २ हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर २१ हजार ७७० रोपांची लागवड झाली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरु झाली होती. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करावी लागतात. यामुळे रोप लावून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची एक अनोखी परंपरा राज्यात रुजली.

 

या योजनेअंतर्गत झालेल्या रोप लागवडीत पुणे विभागाने आघाडी घेतली असून २०१८ च्या पावसाळ्यात ९७१ मुलींच्या जन्मानंतर तिथे सर्वाधिक ९ हजार ७१० रोपांचे वाटप करण्यात आले. त्या पाठोपाठ नागपूरचा नंबर लागतो येथे ६७४ मुलींच्या जन्मानंतर ६ हजार ७४० रोपांचे वितरण योजनेअंतर्गत करण्यात आले. अमरावतीमध्ये ४३८ मुलींच्या जन्मानंतर योजनेतून ४ हजार ३८० झाडे लागली. औरंगाबाद, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातदेखील या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

 

वाढत्या जागतिक तापमानाचे धोके कमी करायचे असतील तर राज्यात वृक्षाच्छादन वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे हरित क्षेत्र राष्ट्रीय वननीतीनुसार ३३ टक्क्यांपर्यंत जावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वन विभागाने ही योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत वन विभागाकडून पाच सागाची तर पाच फळझाडाची रोपे प्रोत्साहन म्हणून दिली जातात. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्माला येते, त्या शेतकरी कुटुंबाने पुढे येत या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याची आवश्यकता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@