मोदींची भाषा राष्ट्रनिष्ठेची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |
 
 

नरेंद्र मोदींच्या राष्ट्रनिष्ठेच्या भाषेने कित्येकांच्या सत्तेचे इमले डळमळू लागले, तोल ढळू लागले. ममता बॅनर्जीही त्यापैकीच एक. “मोदी इंग्रजीत एक ओळही बोलू शकत नाही,” ही ममतांची टीका म्हणजे या सत्तेच्या ढासळत्या डोलाऱ्याचाच परिपाक. अन् स्वतःच्या कर्माने उद्ध्वस्त होता होता त्या शिव्याशापही देणारच!

 

सौमित्र खान यांनी तृणमूल काँग्रेसला ‘अलविदा’ केल्यापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची तडफड जरा जास्तच वाढल्याचे दिसते. गेल्याच आठवड्यात ममतांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीत एक ओळही बोलू शकत नाही. इंग्रजी बोलताना त्यांना सतत टेलिप्रॉम्पटरची मदत घ्यावी लागते,” अशा शब्दांत आपल्या जळफळाटाला वाट मोकळी करून दिली. देश चालविण्यासाठी इंग्रजी भाषा आवश्यक आहे, असाच मथितार्थ ममतांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. पण देशातील कोट्यवधी जनतेच्या मनामनातली जी भाषा आहे तिचे काय? ती जनतेच्या मनातली भाषा कोणती? तर याचे उत्तर निःसंदिग्धपणे ‘राष्ट्रनिष्ठेची भाषा’ हेच असू शकते! इंग्रजी वा अन्य कोणतीही भाषा नव्हे आणि नरेंद्र मोदी तर मातेच्या गर्भातूनच हीराष्ट्रनिष्ठेची भाषा’ शिकून आलेत! देशातल्या कोट्यवधी जनतेला मोदींची हीच भाषा आवडते, भावते. मोदींच्या याच भाषेवर देशातल्या सर्वच राज्यांतील, शहरांतील, खेड्यांतील वेगवेगळ्या जाती-धर्म-पंथातील तरुणांपासून थोरांपर्यंत, शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांपर्यंत, महाविद्यालयांपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांपर्यंतचे लोक मनापासून प्रेम करतात. अभिमान वाटतो लोकांना की, माझ्या देशाचा पंतप्रधान माझ्या भाषेत बोलतोय, संवाद साधतोय, ‘मन की बात’ करतोय! म्हणूनच मॅडिसन स्क्वेअरपासून ते कालपरवा सोलापूरात झालेल्या मोदींच्या सभेपर्यंत त्यांची ही भाषा ऐकण्यासाठी जनसागर उसळलेला दिसतो... ‘मोदी मोदी’चे नारे देऊ लागतो... हा माणसांचा प्रवाह भाड्याने वा पैसे देऊन आणला जात नाही तर तो उत्स्फूर्तपणाने, भारलेपणाने येतो... तो मोदींची राष्ट्रनिष्ठेची भाषा ऐकण्यासाठीच...

 

नरेंद्र मोदींच्या धमन्यांत खेळत असलेली ही भाषा आहे, भारताला सर्वोच्च स्थानी नेण्याच्या जिद्दीची, देशाला स्वतःच्या पायावर उभे करण्याची, त्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची आणि कसलाही त्याग करण्याची! मोदींच्या भाषेत जाज्ज्वल्य देशप्रेमाची, राष्ट्रधर्माची, भारतीयत्वाची अस्मिता, आस्था, उत्कटता पुरेपूर भरली आहे. मोदींची भाषा कोणाहीपुढे झुकणारी नव्हे तर जगात भारताला बरोबरीचे स्थान मिळवून देण्यासाठी झटणारी, झगडणारी, प्रसंगी कठोर शब्दांत ठणकावणारी आहे आणि इथल्या कोट्यवधी जनतेला हीच भाषा हवी आहे, पण ममतांचे काय? पश्चिम बंगालच्या सत्तेवर आल्यापासून ममतांनी नेहमीच मुस्लीम तुष्टीकरणाची, हिरव्या दौतीत बुडवून काढलेली, धर्मांधांच्या दाढ्या कुरवाळणारीच भाषा वापरली. बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या पिलावळींसाठी ममतांच्या थोबाडातून कळवळ्याचे नाले वाहत राहिले. देश नष्ट झाला तरी बेहत्तर पण स्वतःच्या मतलबासाठी ममतांनी पश्चिम बंगाल अभारतीयांना आंदण देण्याची तयारी केली. ममतांची ही भाषा देशहिताची नव्हती तर देशाच्या मुळावर येणारीच होती. ममता याच भाषेतून देशविघातक शब्द बरळत राहिल्या, परकीयांची पाठराखण करत राहिल्या. ममतांच्या हिंदूविरोधी भाषेनेच राज्यात दुर्गापूजा व विसर्जन मिरवणुकीवर निर्बंध आणण्याचा दुर्दैवी खेळ केला. 

 

याच भाषेच्या साहाय्याने ममतांच्या राज्यात रोझ व्हॅली आर्थिक अफरातफर, शारदा चिट फंडसारखे घोटाळे झाले. ममतांनी याच भाषेच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांच्या रथयात्रेला मनाई करण्याचा उद्दामपणा केला. याच भाषेच्या बळावर ममतांनी भारत सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’तून बाहेर पडण्याचा करंटेपणा केला. ममतांनी याच भाषेच्या जीवावर देशभरातील विद्यापीठांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बंगालमधील कुलपतींनी सहभागी होऊ नये, असा फतवा काढला. याच भाषेच्या उन्मादात तृणमूलच्या गुंडांनी बंगालच्या कोपऱ्याकोपऱ्यात उच्छाद मांडला, भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले. ममताजी, ही तुमची भाषा ना इथल्या जनतेला रुचणारी होती ना परवडणारी! कारण अर्थातच ही सगळीच जनता देशहितवादी आहे, ती देशविरोधी नाही. या जनतेला तुमच्या स्वार्थाच्या पोळ्या स्वतःच्या सरणावर भाजून देण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणूनच ममताजी ही जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या जनतेला माहितीय की, मोदी देश विकून खाणारी नव्हे तर देशातल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांना सत्यात उतरविणारी व्यक्ती आहे. आज आपल्या याच ‘सबका साथ सबका विकास’च्या भाषेवर अटळ राहून मोदीजी अथकपणे काम करत आहेत, पण ममतांसारख्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना ते कसे कळेल?

 

केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार अवतरल्यापासून ममता बॅनर्जींनी अपशकुन करण्याची एकही संधी सोडली नाही. भारत सरकारच्या प्रत्येक योजनेपासून स्वतःला आणि राज्याला एकतर दूर नेले किंवा प्रत्येक ठिकाणी केंद्र सरकारच्या नाव आणि पंतप्रधानांच्या फोटोऐवजी स्वतःचे फोटो चिकटवले. ममतांचे बरोबरच आहे म्हणा, आपली रेष छोटी असली आणि समोरच्याच्या रेषेपेक्षा मोठी रेष काढण्याची कुवत नसली की, कोत्या मनोवृत्तीची मंडळी द्वेषाचीच विषवल्ली रुजवतात ना! पण ममतांच्या केंद्र सरकारच्या प्रत्येक कृतीत मोडता घालण्याच्या उफराट्या उद्योगाचा अर्थ काय घ्यायचा? त्यांना भारतापासून फुटून निघायचे आहे? त्यांना बंगालला केंद्रापासून तोडायचे आहे? त्यांना राज्याचे रूपांतर पश्चिम बांगलादेशात करायचे आहे? ममतांच्या या ताळतंत्र सोडलेल्या वागणुकीवर हे प्रश्न उपस्थित केलेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी. खरेतर ममतांना याचा जाब राज्यातल्या जनतेनेच विचारला पाहिजे. दुसरीकडे ममतांच्या या आक्रस्ताळ्या वागण्यामागे लपलेले एक कारणही आहे. नोटाबंदीमुळे बांगलादेशमार्गे चालणारा बनावट नोटांचा व्यापार थांबला. यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचेही आरोप झाले. सत्ता टिकवण्यासाठी नीती आणि ध्येयधोरणे नसले की, राज्यकर्ते मनी पॉवरचा वापर करतात, पण मोदींच्या एकाच फटक्याने देशातल्या काळ्या पैसेवाल्या कित्येक भ्रष्टांचा त्रिफळा उडाला. ममताही त्यापैकीच एक असाव्यात. म्हणूनच सगळे व्यवहार ठप्प पडल्याने तोंडाने मोदींवर आगपाखड करण्याचा धंदा ममतांनी चालू केला असावा. सोबतच पश्चिम बंगालमधल्या गेल्या काही निवडणुकांत भाजपने आपल्या कष्टाच्या आधारावर विजयाचा ध्वज उंचावला. भाजपच्या या मुसंडीने पायाखालची वाळू सरकलेल्या ममतांचे बावचळणे साहजिकच. त्याच भरात त्या मोदींवर वैयक्तिकरित्या टीका करण्याचे, अमित शाहंची रथयात्रा अडविण्याचे आणि केंद्र सरकारशी उभा दावा मांडण्याचे उद्योग करत असाव्यात. पण ज्यांचा पाया स्वतःच्याच कर्माने ढासळलाय, त्यांच्या इमारती टिकतील कशा? त्या कोसळणारच! अन् उद्ध्वस्त होता होता शिव्याशापही देणारच!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@