होमियोपॅथीक तपासणी (केस टेकिंग) : भाग – ५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 

होमियोपॅथिक तपासणीमध्ये लक्षणे कशा तंत्रशुद्ध पद्धतीने घेतली जातात, हे आपण पाहिले. या भागात आपण रुग्णाचे आरोग्यआधारीत पूर्वेतेहास व कौटुंबिक आरोग्यविषयक इतिहास म्हणजे Past History & Family History बाबत माहिती घेणार आहोत. केस टेकिंगमध्ये Past & Family History ला फार महत्त्व आहे. रुग्णाला पूर्वी होऊन गेलेल्या आजारांबद्दल माहिती विचारली जाते. त्यामुळे तज्ज्ञांना आताच्या आजाराच्या निदानासाठी त्याचा उपयोग होतो. उदा. एखाद्या माणसाला जर पूर्वी काही हृदयरोग असेल व आता त्याला दम लागत असेल तर, या श्वसनरोधाच्या त्रासामागे पूर्वीचा हृदयरोग कारणीभूत असू शकतो म्हणून पूर्वीच्या आजारांबद्दल माहिती घेणे फार महत्त्वाचे असते. होमियोपॅथिक दृष्टिकोनातूनही हे फार महत्त्वाचे असते. या माहितीमुळे शरीरातील दोष कुठल्या प्रकारचा आहे (सोरा, सायकोटिक, सिफिलीटीक) याचा अंदाज येतो. काही पूर्वी होऊन गेलेल्या आजारांनंतर रुग्ण हा बराच होत नसतो, त्याच्या शरीर व मनावर काही प्रमाणात लक्षणे दिसतच असतात. अशा काही केसेसमध्ये प्रायोगिक लक्षणांवरून काही होमियोपॅथीच्या उपचार करणाऱ्या औषधांचा अंदाज येऊ शकतो, परंतु संपूर्ण लक्षणे व चिन्हे जुळल्याशिवाय होमियोपॅथीचे औषध दिले जात नाही.

 

पूर्वी होऊन गेलेल्या आजाराच्या माहिती व लक्षणांच्या अभ्यासामुळे रुग्णाची सर्वसाधारण प्रकृती कशी आहे व तो कुठल्या प्रकारच्या आजाराला प्रवणशील आहे, याचाही अंदाज येतो. त्याचप्रमाणे या लक्षणांच्या अभ्यासामुळे आजार साधारणपणे शरीरातील कुठल्या संस्थांना संसर्गित करतो आहे, हेसुद्धा कळून येते व त्याचा उपयोग हा औषध निवडताना केला जातो. रुग्णाचे औषध निवडताना रुग्णाला झालेल्या आजाराशी निगडित शरीरसंस्था (जसे श्वसनसंस्था, चेतासंस्था इत्यादी) व औषध सिद्धतेमध्ये आलेले औषधांचे परिणाम यांची सांगड घातली जाते. यालाच (Sphere of Action of A Remedy) औषधाच्या अमलाखाली असलेल्या शारीरिक अवयवांचा अभ्यास असे म्हटले जाते. उदा. ओपियम या औषधाचा मुख्य अंमल हा मेंदू व चेतासंस्थेवर असतो, तर लॅकेसिस या औषधाचा अंमल हृदय व रक्ताभिसरण संस्था याच्यावर असतो व त्यानुसारच मग रुग्णाचे औषध ठरवले जाते. ही होमियोपॅथीमधली एक फार महत्त्वाची बाब आहे.

 

पूर्वेतिहासाप्रमाणेच कौटुंबिक आजाराची माहितीसुद्धा फार महत्त्वाची असते. कुटुंबात रक्ताच्या नात्यात असलेल्या लोकांना झालेल्या आजाराचा अभ्यास केल्यामुळे तज्ज्ञांना रुग्णाचा जनुकीय इतिहास (Genetic History) माहिती होतो तसेच कौटुंबिक जडणघडणही माहिती होते. त्यामुळे मग आजार जरी जुनाट असला तरी जुनाट आजाराच्या सिद्धांतानुसार (Theory Of Chronic Disease) मग कुठल्याही आजाराला मुळापासून काढेल, असे होमियोपॅथीचे औषध शोधण्यास साहाय्य होते. पुढील भागात आपण याच तपासणीबद्दल अजून महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत.

 
 
 - डॉ. मंदार पाटकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@