गोवर आणि रुबेला लसीकरण एक महत्त्वाकांक्षी मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
महाराष्ट्रात २७ नोव्हेंबर, २०१८ पासून सुरू झालेल्या मोहिमेमध्ये जवळपास ३.३७ कोटी मुलांना सहा आठवड्यांच्या कालावधीत विनामूल्य, सुरक्षित आणि प्रभावी लस टोचण्याचं लक्ष्य आहे. सहा आठवड्यांच्या मोहिमेतील पहिल्या पाच आठवड्यांमध्ये शाळा, अंगणवाडी आरोग्य केंद्रे आणि परिसरात लसीकरण शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सहाव्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात राहून गेलेल्या लाभार्थ्यांना लस मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
 

भारतात गोवर (मीझल्स) आणि रुबेला (जर्मन गोवर) लसीकरण मोहीम (एम. आर. कॅम्पेन) टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात या महत्त्वाकांक्षी लसीकरण मोहिमेस दि. २७ नोव्हेंबर, २०१८ पासून सुरुवात झाली आहे. ही मोहीम राबविणारे महाराष्ट्र हे २२ वे राज्य. जगभरात सन २०१५ मध्ये पाच वर्षांखालील १.३५ लाख, तर सन २०१६ मध्ये ८९ हजार, ७८० बालकांचा मृत्यू गोवरमुळे झाला. भारतात दरवर्षी जवळपास पन्नास हजार मृत्यू गोवरने होतात. सन २००० ते २०१६ या कालावधीत लसीकरणाने जगभरात गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात ८४ टक्के घट झाली. म्हणून गोवर लसीकरण सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त सेवा ठरली आहे. सन २०२० पर्यंत जग गोवरमुक्त होण्यासाठी आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आखलेल्या मोहिमेत भारत सहभागी झाला आहे.

 

गोवर कोणत्याही वयोगटात होऊ शकणारा, परंतु प्राथमिकतः लहान मुलांना होणारा विषाणूजन्य आजार असून सुरुवातीला रुग्णामध्ये ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे इत्यादी लक्षणे आढळतात. नंतर अंगावर पुरळ उठतो. जगात कोणत्याही वेळी सर्वत्र आढळणारा हा आजार दर दोन ते पाच वर्षांनी साथीच्या स्वरूपात उद्भवतो. भारतात ही साथ जानेवारी ते एप्रिल दरम्यान उद्भवते. या आजाराचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या तुषारबिंदूंमार्फत प्रत्यक्षरित्या होतो. कुपोषित मुलांमध्ये गोवर प्राणघातक ठरू शकतो. गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची पातळी कमी होते. हे जीवनसत्त्व डोळे निरोगी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आवश्यक असते. शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णाला डोळ्यांचे आजार तसेच अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर इत्यादी गुंतागुंती होऊ शकतात. वेळेवर उपचार न झाल्यास अशा गुंतागुंतीमुळे रुग्ण दगावू शकतो.

 

रुबेला (जर्मन गोवर) हा सौम्य विषाणूजन्य आजार असून सर्वसाधारणपणे लहान मुले आणि तरुण त्याच्यापासून बाधित होतात. संसर्ग सौम्य असला तरी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. सदर संसर्ग गर्भवतीस झाल्यास अचानक गर्भपात, गर्भाचा मृत्यू अथवा उपजत दोष निर्माण होण्याचा धोका असतो. हृदयरोग, मोतीबिंदू, मतिमंदता, बहिरेपणा, वाढ खुंटणे, पायात व्यंग इत्यादी दोष असलेले बाळ जन्माला येऊ शकते. या अवस्थेला ‘कन्जेनिटल रुबेला सिंड्रोम’ म्हटले जाते. जगभरात दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक ‘कन्जेनिटल रुबेला सिंड्रोम’ झालेल्या मुलांचा जन्म होतो. या आजारावर निश्चित उपचार उपलब्ध नसून लसीकरणाने मात्र त्याचा प्रतिबंध करता येतो.

 

गोवर आणि रुबेला या दोन आजारांच्या प्रतिबंधासाठी एम. आर. लस टोचण्याची मोहीम जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून भारतात सुरू आहे. सदर मोहिमेची सुरुवात फेब्रुवारी, २०१७ मध्ये झाली. तेव्हापासून ते जुलै, २०१८ पर्यंत २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९ महिने ते १५ वर्षे वयाच्या ९.६ कोटींपेक्षा अधिक मुलांना गोवर आणि रुबेला (एम. आर.) लसीचा एक डोस टोचण्यात आला. सूक्ष्म आखणी आणि प्रभावी समन्वयामुळे या मोहिमेला यश मिळालं. महाराष्ट्रात २७ नोव्हेंबर, २०१८ पासून सुरू झालेल्या मोहिमेमध्ये जवळपास ३.३७ कोटी मुलांना सहा आठवड्यांच्या कालावधीत विनामूल्य, सुरक्षित आणि प्रभावी लस टोचण्याचं लक्ष्य आहे. सहा आठवड्यांच्या मोहिमेतील पहिल्या पाच आठवड्यांमध्ये शाळा, अंगणवाडी आरोग्य केंद्रे आणि परिसरात लसीकरण शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सहाव्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात राहून गेलेल्या लाभार्थ्यांना लस मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

 

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील मोहिमेमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संबंधित अधिकाऱ्यांचा मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना, स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, तरुण मित्रमंडळे, राजकीय पुढारी, समाजसेवक, रोटरी क्लब, लायन्स क्लब, सिनेसृष्टीतले कलावंत इत्यादींना सदर मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. लाभार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याने शिक्षण विभागाची भूमिका, सहभाग आणि जबाबदारी फार महत्त्वाची आहे. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची भूमिका आणि त्या साऱ्या विभागांमधील सुयोग्य समन्वय सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा आहे. शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याकारणाने त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले. शाळांमध्ये पालक-शिक्षक सभांचं आयोजन करण्यात येऊन त्यामध्ये संबंधित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कृतीला चांगला प्रतिसाद मिळाला. सदर मोहिमेसंबंधी पालकांच्या मनातील गैरसमज दूर होण्यास मदत झाली.

 

आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, विद्यार्थी, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी या मोहिमेचे आधारस्तंभ आहेत. त्यांची कामगिरी, भूमिका, पाठिंबा आणि त्यांच्यातल्या समन्वयावर या मोहिमेचे यश अवलंबून आहे. सदर मोहिमेची इथ्यंभूत माहिती आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा सहभाग प्राप्त करण्यासाठी प्रसारमाध्यमं, आरोग्य कर्मचारी तसेच शिक्षक प्रयत्न करीत आहेत. एम. आर. लस परिणामकारक असून ती टोचल्यानंतर गोवर आणि रुबेला या दोन संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते आणि समाजाची आरोग्यस्थिती उंचावते. ही बाब लोकांना पटवून सांगणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. हे काम आरोग्य कर्मचारी आणि शिक्षक उत्साहाने करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि सी.डी.सी.सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा पाठिंबा, सन २०२० पर्यंत भारतातून गोवर आणि रुबेला विषाणूंना हद्दपार करण्यासाठी आखलेल्या मोहिमेस लाभला आहे.

 

प्रत्येक लाभार्थ्याला विशिष्ट डिस्पोजेबल ए.डी. सिरिंज आणि सुईचा वापर करून ०.५ मिली. डोसचं एक इंजेक्शन उजव्या दंडावर त्वचेखाली प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी अथवा डॉक्टरांमार्फत देण्यात येत आहे. लस टोचल्याची खूण म्हणून डाव्या अंगठ्याच्या नखावर ठसा आणि लस घेतल्याचे कार्ड दिले जात आहे. गोवर आणि रुबेला लस पूर्वी घेतली असल्यास देखील ‘एम. आर. लस’ परत देण्यात येत आहे. यामुळे गोवर आणि रुबेला संसर्गाविरोधी प्रतिकारशक्तीत आणखी भर पडणार आहे. एम. आर. कॅम्पेनची यशस्वी सांगता झाल्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये गोवर लसीऐवजी एम. आर. लस टोचण्यात येईल. सदर लसीचा पहिला डोस वयाचे नऊ महिने पूर्ण झाल्यावर आणि दुसरा डोस १६ ते २४ महिन्यांच्या दरम्यान देण्यात येणार आहे. सदर कॅम्पेनदरम्यान लसीकरण कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

 

गोवर आणि रुबेलाचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तसेच या आजारांना कारणीभूत असलेल्या विषाणूंना नष्ट करण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना एकाचवेळी लस मिळणे आवश्यक आहे. असे झाले तरच या मोहिमेला यश लाभेल. हे दोन्ही आजार गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण असा भेदभाव करत नाहीत. समाजातील कोणत्याही स्तरातील मुलांना ते होऊ शकतात. त्यांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचा उपाय आहे. लस आधी दिली असताना परत का द्यायची? लस टोचल्यावर मुलांना काही त्रास होईल का? इत्यादी पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मोहिमेची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास सापडतात. ही मोहीम म्हणजे त्या आजारांचा धोका असलेल्या सर्व मुलांना एकाच वेळी लस मिळण्यासाठी भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने उचललेले क्रांतिकारी पाऊल आहे. ही लस त्वचेखाली दिली जात असल्याने लाभार्थ्यांना त्रास होत नाही. मुलांना ही लस टोचली नाही, तर रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना हा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. एम. आर. लसी परिणामकारक राहण्यासाठी ‘शित-साखळी’वर लक्ष केंद्रित करणे, लसीकरण सत्रासाठी तयार केलेली लस चार तासांच्या आत वापरण्याची काळजी घेणे, लसीचा पुरेसा साठा आणि इतर साधनसामुग्रीच्या उपलब्धतेची खात्री करणे, लसीकरण सत्राच्या शेवटी जमा झालेल्या जैव-वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, लसीकरण सत्रासंबंधी नोंदी आणि अहवाल इत्यादी बाबी मोहीम यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. मोहीम राबविण्यासाठी सांघिक कामगिरी अत्यंत गरजेची आहे. गेल्या महिन्याभरात दोन कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ज्या बालकांना अजून लस मिळाली नाही, अशांना सार्वजनिक दवाखान्यांमध्ये लसीकरणाची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोहिमेच्या माध्यमातून मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवून गोवर आणि रुबेला आजारांवर सहज मात करता येईल आणि भविष्यातील जीवित तसेच वित्तहानी टाळता येईल. तसेच एवढ्यावरच न थांबता येणाऱ्या दोन वर्षांत गोवर आणि रुबेला आजारांचे विषाणू पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जोरदार प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणून पालकांनी पुढाकार घेऊन मुलांना एम.आर. लस देऊन मोहीम यशस्वी करण्यास हातभार लावणे गरजेचे आहे.

 

- डॉ. रवींद्र गुरव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@