आपले काम समाजापर्यंत पोहोचवणे काळाची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2019
Total Views |




हिंदू अध्यात्मिक आणि सेवा प्रदर्शनीचा समारोप

 


मुंबई : हिंदू अध्यात्मिक आणि सेवा प्रदर्शनीच्या माध्यमातून एक नवे कार्य सुरू करण्यात आले आहे. आज आपण करत असलेले कार्य कोणत्याही माध्यमातून समाजासमोर पोहोचवले गेले पाहिजे आणि ही काळाची गरज असल्याचे मत १००८ महामंडलेश्वर स्वामी यांनी व्यक्त केले. तीन दिवसीय हिंदू अध्यात्मिक आणि सेवा प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. रविवारी या कार्यक्रमात सांस्कृतिक वेशभूषा, चाणक्य मंचन आणि गंगा आरती अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिवर्तन हा एक नियमच आहे. तसेच एक परिवर्तन १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेतून झाल्याचे महामंडलेश्वर स्वामी यावेळी म्हणाले. रा. स्व. संघाचे कार्य हे अतुलनीय आहे. आज ते केवळ भारतातच नाही तर परदेशातही उत्तम कार्य करत आहेत. त्यांच्या हिंमतीची आपण दाद दिली पाहिजे. आपला हिंदू धर्म हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा धर्म आहे. आपल्या समोर सध्या संघर्षमय परिस्थिती आहे. त्यामुळे आपले काम समाजासमोर पोहोचवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

... तेव्हाच आपण पुढच्या पीढीला काही देऊ

 

गेल्या पाच वर्षांच्या काळात आपण उत्तम जीवन जगलो आहोत. आपण क्षणिक सुखासाठी दुसरीकडे जाऊ नये. असा सूचक सल्ला महामंडलेश्र्वर स्वामी यांनी निवडणुकांबाबत बोलताना दिला. पुढील प्रवास हा खडतर आहे. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांकडे त्यांच्या भविष्याकडे पाहूनच निर्णय घ्यावा. आपण आपल्या कार्याचीही व्याप्ती वाढवली पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीला काही देऊ शकू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

मेळा, तीर्थ, उत्सव समाजाचे प्राणवायू : इंद्रेशकुमार

 

मेळा, तीर्थ आणि उत्सव हे समाजाचे प्राणवायू आहेत. यापासून जीवममूल्य नियंत्रित आणि विकसित होत असते. आपण अशा अनेक गोष्टी जगण्यासाठी आज या ठिकाणी जमलो असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी देशाशी आणि पर्यावरणाशी प्रेम करण्याचा सल्लाही दिला. आपण अनेक स्वार्थी लोक पाहतो. स्वार्थ आपल्याला नरकात घेऊन जातो. परंतु परमार्थ हा आपल्याला मोक्ष मिळवून देतो. त्यामुळे आपण परमार्थाचा मार्ग निवडला पाहिजे. भारत हा परमार्थाने जगणारा देश आहे. त्यामुळेच भारत हा जगाचा गुरू असल्याचे ते म्हणाले. आपण परमार्थ मागितला पाहिजे. त्याने मिळणारा आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. परमार्थाचा अंकूर ज्याला फुटतो ती सेवा असते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी इंद्रेशकुमार यांनी संतांचे आणि विद्वानांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, संत हा सर्वांना सोबत घेऊन चालतो. परंतु विद्वान हा एकटाच चालतो. त्यामुळे आज संतांवर लिहिलेले अनेक ग्रंथ, साहित्य आपल्याला पहायला मिळते. परंतु विद्वानांच्या बाबतीत तसे होत नाही. प्रत्येक संत हा विद्वान असतो कारण तो प्रत्येकाला समाधान देत असतो. त्यामुळेच मानवी जीवनात सुख, समाधान निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले. भारत हा तीर्थ, उत्सव आणि मेळाव्यांचा देश आहे आणि देशात असलेला हिंदू समाज हा केवळ स्वत: जगत नाही तर तो आपल्यासोबत इतरांनाही जगवतो, असेही ते यावेळी म्हणाले.

 

अहिंसा प्रत्येक धर्माची शिकवण

 

अहिंसा ही प्रत्येक धर्मची शिकवण आहे. कोणालाही दुखवू नये असेच प्रत्येक धर्म सांगत असतो. धर्मात कोणीही कट्टरतावादी निर्माण झाला तर सर्वांच्याच आनंदावर विरजण पडते. आज भारतात ज्या प्रथा परंपरा आहेत त्या कोणताही अन्य देश समजू शकत नसल्याचे इंद्रेशकुमार म्हणाले. हिंसा आणि कट्टरतावाद हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नसते. धर्मांतरण आणि धर्मांधता हे अस्वीकार्य आहे. आपण असे केल्यास जे आपल्याला ईश्वराने दिले आहे, त्यालाच आपण नाकारल्यासारखे असते. आपण ईश्वराने दिलेल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आपल्याला कसाबसारखे होऊन चालणार नाही तर आपल्याला एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या थोर व्यक्तींचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

 

हिंदुत्व आपली जीवन प्रणाली : मनोज जोशी

 

हिंदुत्व ही आपली जीवन प्रणाली आणि आपल्या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे. अनेकांनी आजवर आपल्यावर आक्रमण केले पण आपली संस्कृती आणि परंपरा संपवू शकला नाही, असे मत अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केले. मनोज जोशी यांनी कार्यक्रमादरम्यान आपल्या चाणक्य मंचन या नाटकातील काही प्रवेशही सादर केले. यापूर्वी कधीही झाले नाही, अशा पद्धतीने काही लोक २१ व्या शतकात आपल्या धर्मावर टिका करत आहेत. तरीही आपल्या धर्मात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचीच परंपरा असल्याचे ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@