साहित्य संमेलनात ‘मराठी समीक्षेची समीक्षा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2019
Total Views |



प्रा. शरचचंद्र टोंगो व्यासपीठ

 

यवतमाळ (विजय कुलकर्णी) : साहित्य समीक्षा हाही साहित्याइतकाच महत्त्वाचा विषय, पण तरीही वाचकांपासून काहीसा दुरावलेला. म्हणूनच साहित्य समीक्षा म्हणजे काय, त्याचे प्रकार इत्यादी समीक्षेच्या विविधांगी पैलूंची चर्चा करण्यासाठी ‘मराठी साहित्यातील समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले होते. डोंबिवलीच्या धनश्री साने, मुंबईच्या डॉ. सुहासिनी कीर्तिकर, अमरावतीचे प्रा. रमेश अंधारे आणि डॉ. मनोज तायडे यांनी या परिसंवादात सहभाग नोंदवला. डोंबिवलीच्या डॉ. धनश्री साने यांनी आपल्या भाषणात मानसशास्त्रीय समीक्षा आणि त्याच्या पद्धतींचा आढावा घेतला. ‘सावित्री’ कादंबरीतील मोर आणि त्या कादंबरीतील नायिकेचे त्या मोराशी जुळलेले ऋणानुबंध अशा मानसशास्त्रीय प्रतिकांच्या माध्यमातून त्यांनी समीक्षा प्रक्रियेचा उलगडा केला. ‘कोंडुरा’ या कादंबरीतील दिवास्वप्नात रमणाऱ्या नायकाचाही त्यांनी मानसशास्त्रीय समीक्षेच्या माध्यमातून वेध घेतला. विविध कादंबऱ्या, कवितांमधील मानवी भावनांचा, गुंतागुंतीचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रीय समीक्षा किती महत्त्वाची असते, याचे महत्त्व त्यांनी पटवून सांगितले.

 

३८ वर्षांचा अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मुंबईच्या निवृत्त प्राचार्या सुहासिनी कीर्तिकर यांनी चरित्रात्मक समीक्षेच्या शक्तिस्थान आणि मर्यादांचा सांगोपांग आढावा घेतला. समीक्षेची थोडक्यात व्याख्या सांगताना कीर्तिकर म्हणाल्या की, सुसंस्कृत मनाच्या आस्वादनाचा भाग म्हणजे समीक्षा आणि टीकाकार हा सर्वोच्च सुसंस्कृत अभ्यासक. त्या पुढे म्हणाल्या की, कुठलीही साहित्यकृती ही स्वायत्त नसून परिस्थिती जीवन जगणाऱ्या लेखकाची प्रतिकृती आहे. त्यामुळे कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यक्ती, परिस्थिती समीक्षा करणे क्रमप्राप्त ठरते. आपल्या भाषणात पुढे लेखककेंद्रीत समीक्षा पद्धतीत लेखकाच्या चारित्र्याचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ कवी बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांचे डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी केलेले समीक्षात्मक लेखन, केशवसुतांच्या कवितांची सदानंद रेगे यांनी केलेली वास्तववादी समीक्षा यांचे काव्यपंक्तींसह सोदाहरण स्पष्टीकरण कीर्तिकर यांनी दिले. साहित्याचे प्रतिरुप पाहिले तर ती चरित्रा समीक्षा होते, असे सांगत त्यांनी कलाकाराच्या आयुष्याचे संदर्भ त्याच्या कलाकृतीत प्रतिबिंबित होत असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

 

अमरावतीच्या प्रा. रमेश अंधारे यांनी सर्वप्रथम समीक्षेची व्याख्या करत, समदृष्टीने एखाद्या गोष्टीकडे पाहणं म्हणजे समीक्षा असे सोपे शब्दांत सांगितले. समीक्षा लेखन हे सर्जनशील ललित साहित्य लेखनाचाच प्रकार असल्याचे प्रा. अंधारे यांनी अधोरेखित केले. आपल्या सविस्तर भाषणात त्यांनी मार्क्सवादी समीक्षा लेखन, त्याची पाश्चिमात्त्य परंपरा, भारतीय समीक्षकांचे लेखन अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला. अमरावतीच्या डॉ. मनोज तायडे यांनी कलाकृतीनुसार समीक्षा पद्धती ठरत असल्याचे सांगत कधी कधी संमिश्र समीक्षा पद्धतीची उपयोगिता विशद केली. कुठल्याही कलाकृतीचा आशय, समृद्धी उत्तम पदधतीने लोकांपर्यंत नेता यावी म्हणून समीक्षा अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अंतत:कलाकृतीचे सौंदर्य उलगडून दाखवणे हेच समीक्षेचे काम असल्याचे तायडे यांनी आपल्या वाणीला पूर्णविराम दिला. अमरावतीच्या डॉ. हेमंत खडके यांचे सूत्रसंचालन आणि वक्त्यांइतकीच समीक्षेविषयीची जाण यावेळी उपस्थित श्रोतृजनांना सुखावणारी ठरली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@