बहिष्काराचे सावट दूर सारुन साहित्य संमेलन यशस्वी

    13-Jan-2019
Total Views |


 

यवतमाळ (विजय कुलकर्णी) : बहिष्काराचे सावट दूर सारुन तीन दिवसांचं साहित्य संमेलन यशस्वी झालं आणि हे सर्वस्वी रसिकांच्या प्रतिसादाचं फळ असल्याचे कौतुकोद्गार ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरुणाताई ढेरे यांनी काढले. त्या तीन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगीच्या सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, यवतमाळचे पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदकेर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या प्रारंभी यवतमाळचे गुरुजी द. तु. नंदापुरे, सेंद्रिय शेतीचा प्रयोग करणारे सुभाष शर्मा यांचाही शाल, श्रीफळ, ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला.

 

समारोपप्रसंगीच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना संबोधित करताना अरुणाताईंनी साहित्य संमेलनात सहभागी हजारो रसिकांबरोबरच आयोजकांचे, कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, संमेलनासाठी इतकी लोकं एकत्र आली, हा खरं तर एक चमत्कारचं म्हणावा लागेल. कवीकट्ट्यासह ग्रंथप्रदर्शनालाही रसिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. तसेच परिसंवादाला गर्दी नव्हे तर दर्दी रसिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच सहभागी साहित्यिकांनीही निषेध नोंदवला, पण संवादाचा हट्ट सोडला नाही, म्हणून अरुणाताईंनी त्यांचे विशेष अभिनंदनही केले. आपल्या भाषणात पुढे अरुणाताईंनी संमेलनासाठी झटणारे जबाबदार कार्यकर्ते, अहोरात्र तत्पर चोख व्यवस्था यांचे तोंडभरुन कौतुक केले. या साहित्य संमेलनामागचा प्रेरणास्त्रोत असलेल्या डॉ. रमाकांत कोलते यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना अरुणाताई म्हणाल्या की, पैसा गोळा करणं एक वेळ सोपं असतं, पण माणसं गोळा करणं हे सोपं काम नाही. डॉ. रमाकांत कोलते यांनी माणसं घडवली. उभी केली. त्यामुळे एक शिक्षक काय करु शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. रमाकांत कोलते असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळकरांचे, त्यांच्या जिद्दीचे, सुसंस्कृत चेहऱ्याचे, उत्साही, स्वागतशीलतेचेही अरुणाताईंनी अंतकरणपूर्वक आभार व्यक्त केले. ज्ञानाची, साहित्याची परंपरा यवतमाळने जपल्याचे त्या म्हणाल्या. वि. भि. कोलते यांच्या रुपाने संशोधन आणि ज्ञान, तर गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यवतमाळमध्ये साहित्य परंपरा, असा दोहोंचा मेळ साधला गेल्याचे त्या म्हणाल्या.

 

पोलिसांच्या साहित्यप्रेमाचाही अरुणाताईंनी विशेष उल्लेख केला. महाराष्ट्रातील ग्रंथालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी डिजिटल ग्रंथालयांची संकल्पना, मराठी भाषेला लवकरच मिळणारा अभिजात भाषेचा दर्जा, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार याविषयांवरही अरुणाताईंनी प्रकाश टाकला. पावले उमटली आभाळावर येथे, संपायचे होते ते संपले असे या काव्यपंक्तींचा दाखला देत तरुण मुलांच्या उपस्थितीतीबद्दल अरुणाताईंनी समाधान व्यक्त केले. पुढच्या पिढीसाठी एक चांगल, निरोगी, सशक्त वातावरण देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन यावेळी अरुणाताईंनी केले.

 

विचारशून्यतेपेक्षा विचारभिन्नता गंभीर – नितीन गडकरी

 

केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. सर्वप्रथम संमेलन यशस्वी केल्याबद्दल गडकरींनी साहित्यरसिकांचे आभार व्यक्त केले. विचारशून्यतेपेक्षा विचारभिन्नता अधिक गंभीर असल्याचे सडेतोड मत गडकरींनी यावेळी व्यक्त केले. साहित्य आणि कला याविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जीवन जगण्याची प्रेरणा, सामाजिक संवेदनशीलता, जबाबदारी कलेच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचते. छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचायची संधी मिळाली नसती, तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता आला नसता. त्यामुळे साहित्यिकांनी दिलेला ठेवा हीच मोठी ताकद असल्याचे सांगत गडकरींनी साहित्यिकांच्या कार्याचे कौतुक केले. परिवर्तन या संकल्पनेवर बोलताना गडकरी म्हणाले की, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिवर्तन हे कोणाच्या मतभेदासाठी कधीही असू नये. माणूस हा परिवर्तनशील प्राणी आहे. अशाच माणसांच्या एकत्र येण्याने समूह निर्माण होतो आणि समुहातूनच पुढे राष्ट्र निर्माण होते. हाच धागा गुंफत राजकीय परिवर्तनाविषयी गडकरी म्हणाले की, राजकारणाचा अर्थ हा समाजकारण, विकासकारण. परंतु, दुर्देवाने सत्ताकरणाचा राजकारण हा अर्थ दुर्देवाने झाल्याचे ते म्हणाले.

 

आपल्या भाषणात पुढे गडकरींनी साहित्यिक आणि राजकारण यावर भाष्य करताना आणीबाणीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, १९७५च्या आणीबाणीविरोधात पुलं, दुर्गाताई भागवत यांनी आवाज उठवला. पण, त्यांचं काम झाल्यावर ते बाजूला झाले. म्हणूनच लोकशाही वाचविण्यामध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाचे असल्याचे गडकरी म्हणाले. संवाद नसेल, तर विसंवाद आणि विसंवादातून वितंडवाद ­उद्भवत असल्याचे सांगत मतभिन्नता हरकत नाही, मनभेद नको. म्हणूनच विरोधी मतांच्या व्यक्तींचाही सन्मान केला पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात श्रोतृवर्गाला जीवन जगण्याचा कानमंत्रही दिला. ते म्हणाले की, माणूस हा जाती, धर्म, लिंग यांवरुन नाही, तर त्याच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ ठरतो. म्हणूनच उद्दिष्टाशिवाय माणसाचा उपयोग नसून कुठल्याही परिणामांचा विचार न करता माणसाने कार्यतत्पर राहावे. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात नीट दिशा दिली पाहिजे. त्यासाठी समन्वय हवा. उद्दिष्टांबद्दल एकवाक्यता हवी. कारण, ही एकवाक्यताचं आपली ताकद आहे. आपल्या भाषणाच्या अखेरीस गुणात्मक परिवर्तनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगत हे जनसंमेलन मोजक्या लोकांचं नाही, वैचारिक चिंतनातून निघालेलं अमृत असल्याचे गडकरी म्हणाले.

 

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर यांनी यवतमाळमध्ये पाण्याचा दुष्काळ असला तरी अतिथ्यशीलतेचा सुकाळ असल्याचे सांगत आयोजकांच्याही मेहनतीचे कौतुक केले. बहिष्काराची भूमिका सोडून अनेक जण संमेलनात सहभागी झाले असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. त्याचबरोबर संमेलनातील गोळा झालेल्या कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण करुन सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार असल्याची माहितीही देवधर यांनी दिली. मराठी भाषा टिकवण्यासाठी लोकांनी आपले उपक्रम साहित्य महामंडळाकडे पाठवण्याचे आवाहन देवधर त्यांनी केले आणि मराठीसाठी काही तरी वेगळं-विशेष काम करण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिली. हंसराज अहिर, मदन येरावर, डॉ. रमाकांत कोलते आणि इतर मान्यवरांनीही त्यांचे हृद मनोगत यावेळी व्यक्त केले. तसेच लोकप्रतिसाद पाहता, ग्रंथप्रदर्शन एक दिवस वाढविण्यासाठी अनुकूल असल्याचीही घोषणा येरावार यांनी केली. कार्यक्रमाच्या अखेरीस ठराव वाचन करण्यात आले आणि मराठी भाषा संवर्धन, मराठी शाळांची बिकट अवस्था यांविषयी शासनाला सूचना करण्यात आल्या.

 

शेतकऱ्यांनो, पेट्रोल-डिझेलचा पर्याय शोधा – नितीन गडकरी

 

यवतमाळ हा महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्मह्त्यांसाठी कुप्रसिद्ध जिल्हा. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकरी बांधवांना गहू, तांदूळ, ऊसाची लागवड करण्यापेक्षा इथेनोल निर्मितीसाठी उपयुक्त पिकांची लागवड करण्याचा हरितमंत्र दिला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.