अकस्मात सांडूनिया सर्व जाती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2019   
Total Views |

 

 

 
 
नोकरी सांभाळून कलेचा संसार करणे, हे फार कमी अभिनेत्यांना जमते. अभिनेते किशोर प्रधान हे याचे उत्तम उदाहरण आहेत.
 

देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला’ या श्लोकाचा मथितार्थ पाहता, देह जपण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला, तरी मृत्यू हा सर्वांना अटळ आहे. मरण आजवर कोणालाच चुकलेले नाही, परंतु ‘देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी’ या श्लोकाकडे गांभीर्याने पाहिले असता असे लक्षात येते की, मरणोत्तर कीर्ती ही फार कमी लोकांना प्राप्त करता येते. कारण मरणापूर्वी त्यांनी असे काही उल्लेखनीय कार्य केलेले असते की, त्यामुळेच त्यांची आठवण सदैव स्मरणात राहते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. २०१९ या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक ज्येष्ठ अभिनेते आपल्याला सोडून गेले. अभिनेते किशोर प्रधान हे आता आपल्यामध्ये नाहीत. मनोरंजन सृष्टीच्या वर्षाची सुरुवातच अशा दु:खद बातमीने झाली. किशोर प्रधान हे नाव तसे आजच्या युवा पिढीसाठी नवीन नाही. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जब वी मेट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘लालबाग परळ’ अशा अनेक सिनेमांमधून त्यांना प्रेक्षकांनी पाहिले आहे, परंतु त्यांच्या अभिनयाची ही खरी कारकीर्द नव्हे. आपल्या वयाला साजेशा अशा भूमिका किशोर प्रधान या सिनेमांमधून करत गेले. पण रंगभूमी हीच खरेतर किशोर प्रधान यांची कर्मभूमी होय!

 

हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘हनिमून झालाच पाहिजे’, ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ यासारख्या हाऊसफुल्ल नाटकांनी त्यांनी नाट्यरसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. रंगभूमीवर आजवर किशोर प्रधान यांनी अनेक विविधरंगी भूमिका साकारल्या. शंभरहून अधिक मराठी नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. १८ इंग्रजी नाटकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘बॉटम अप्स’ हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक होते. हे अभिनय कौशल्य किशोर प्रधान यांना वारशाने मिळाले आहे. किशोर हे मूळचे नागपूरचे रहिवासी होते. किशोर प्रधान यांच्या आई मालतीबाई प्रधान या एक अभिनेत्री होत्या. ४० च्या दशकात नाटकांमधून त्या काम करायच्या. त्यामुळे अभिनयाचे गुण किशोर यांच्या अंगी उपजतच होते. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून किशोर यांनी विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पुढे नाटकाच्या आवडीमुळे त्यांनी काही सहकाऱ्यांना घेऊन ‘नटराज’ या संस्थेची स्थापना केली. ‘नटराज’ या संस्थेमार्फत किशोर प्रधान यांनी काही नाटके रंगभूमीवर आणली. विनोदनिर्मिती आणि किशोर प्रधान हे समीकरण पुढील अनेक वर्षे रसिकांना पाहायला मिळाले. अभिनयात तर किशोर यांचा हातखंडा होताच पण शिक्षणाकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. किशोर प्रधान हे उच्चशिक्षित होते. नागपूर येथील मॉरिस या महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातील एम. ए. ची पदवी संपादन केली, परंतु किशोर प्रधान हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पुढे जाऊन ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मधून(टीस) दोन वर्षांची रीसर्च स्कॉलरशिप आणि मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवीदेखील प्राप्त केली होती.

 

किशोर यांचे वडील अमृतराव प्रधान उर्फ काकासाहेब हे एक उल्लेखनीय फार्मासिस्ट होते. नागपूरमध्ये ‘अमृत फार्मसी’ नावाची त्यांची स्वत:ची फार्मसी कंपनी होती. किशोर यांना जशी आई मालतीबाईंमुळे अभिनयाची आवड जडली होती, तसेच वडिलांप्रमाणेच किशोर यांना अभ्यासातही विशेष रस होताकिशोर हे ग्लॅक्सो लॅबोरेटरीज या कंपनीत नोकरी करत होते. नोकरी सांभाळून त्यांनी आपली अभिनय क्षेत्रातील कारकीर्दही उत्तमरित्या सांभाळली. नोकरी सांभाळून कलेचा संसार करणे, हे फार कमी अभिनेत्यांना जमते. अभिनेते किशोर प्रधान हे याचे उत्तम उदाहरण आहेत. रोज संध्याकाळी कामावरून घरी आले की, त्यांच्या डोक्यात सतत नाटकाविषयीचे विचार फिरत असायचे. पण पुढे १९८७ साली त्यांनी नोकरीतील कामाच्या वाढत्या व्यापामुळे नाटकांमधून काही काळासाठी विश्रांती घ्यायची ठरवली. त्यानंतर पुढची २५ वर्षे विविध व्यवस्थापकीय पदांवर त्यांनी काम केले. १९९४ साली किशोर प्रधान नोकरीतून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ आपल्या अभिनय कलेला द्यायचे ठरवले. आपला हा अभिनयाचा छंद त्यांनी चांगल्याप्रकारे जोपासला. सर्वसामान्यांप्रमाणे नोकरी, घर, कुटुंब यांकडे त्यांनी परिपूर्ण लक्ष दिलेच, पण काळाच्या ओघात आपल्यातील अभिनेता त्यांनी कधी हरवू दिला नाही आणि तोच त्यांनी जपलेला अभिनेता यापुढेही रसिकांच्या मनात जिवंत राहील!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@