थोर साहित्यिकांना चित्ररुपी मानवंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |


 
यवतमाळ (विजय कुलकर्णी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी साहित्य संमेलनामध्ये केवळ पुस्तक एके पुस्तक नाही, तर इतरही कलांचा जागर पाहायला मिळतोय. कवी संमेलनासाठीच्या कवी कट्ट्यावर तर कवितांची पारायणंच सुरु आहेत. पाचशे कवी अपेक्षित असताना तब्बल हजारांहून अधिक कवींनी काव्यवाचनासाठी इच्छुक असल्याचे समजते. पण, याच कवी कट्ट्यात सध्या लक्ष वेधून घेताहेत ती थोर साहित्यिकांची चित्रकारांनी रंगवेलेली काही आकर्षक चित्रे. ही कलाकिमया साधली आहे ती यवतमाळच्या स्कूल आफ स्कोलर्सचे रविंद्र क्षीरसागर आणि त्यांच्या सोबतच्या चित्रकारांनी. क्षीरसागर स्वत: कलाध्यापक असून त्यांच्यासोबत इतरही काही चित्रकारांनी मिळून साहित्यिकांना आपल्या चित्रांच्या माध्यमातून मानवंदना अर्पण केली आहे. समन्वयक निखील परोपटे यांच्यासोबतच रणजीत वणकर, संजय संबाजवार, नीता शिरकुरकर, योगेश धनकासार, चारुदत्त क्षीरसागर, वैशाली शेटे, सावी उर्गुंडे, श्रीकांत भारती यांसारख्या चित्रकारांनी ही साहित्यिकांची चित्रं साकारली आहेत.
 
 

 
 

पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, सुधीर मोघे, बा. भ. बोरकर, मुरलीधर गुप्ते, केशवसुत यांसारख्या अनेक थोर साहित्यिकांच्या चित्तवेधक चित्रांनी कवी कट्ट्यात सगळ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रकारांमध्ये काही कलाविद्यार्थ्यांचाही समावेश आहे. याविषयी क्षीरसागर यांना विचारले असता ते म्हणतात की, दीड महिन्यांपूर्वी आम्ही चित्रकारांनी या चित्रांवर काम सुरु केले. एकूण ५२ साहित्यिकांची चित्रे असून त्यामध्ये ४८ पोट्रेट्सचाही समावेश आहे. नवोदित कवींना या महान साहित्यकांच्या चित्रांतून प्रेरणा मिळावी, हाच यामागचा उद्दात हेतू असल्याचे क्षीरसागर म्हणाले. साहित्यिक हे सागरासारखे आहेत आणि या सागरातून केवळ काही मोती आम्ही रेखाटल्याचे समाधान यावेळी महाएमटीबीशी बोलताना क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@