माध्यमांना वेगळ्या स्वायत्ततेची गरजच नाही - नितीन केळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |



यवतमाळ : आपल्या देशाच्या राज्यघटनेने सामान्य नागरिकांना दिलेलीच स्वायत्ता माध्यमांसाठीही लागू पडते. त्यामुळे माध्यमांना वेगळी स्वायत्तता द्यायची गरजच नसल्याचे परखड मत प्रसारभारतीचे वृत्त उपसंचालक नितीन केळकर यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनातील माध्यमांची स्वायत्ता - नेमकी कोणाची?’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपले विचार अगदी स्पष्टपणे मांडले. विशेष म्हणजे, या परिसंवादात सहभागी इतर ज्येष्ठ पत्रकारांनी नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवापसीचे कारण पुढे करत या परिसंवादावर बहिष्कार टाकला. पण, नितीन केळकर यांनी मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उपस्थित राहून आपली रोखठोक भूमिका मांडणेच पसंत केले.

 

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केळकर यांनी नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. तसेच, या परिसंवादावर बहिष्कार घालणाऱ्यांनी त्यांचा विरोध, त्यांची मते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन मांडायला हवी होती, असेही सुनावले. इतकेच नाही, तर परिसंवादातील नियोजित ज्येष्ठ पत्रकारांपैकी एक सध्या क्वालालांपूर येथील एका दुसऱ्या साहित्य संमेलनाला उपस्थित असल्याचे सांगत बहिष्कार घालणाऱ्या पत्रकारांच्या हेतूवरच अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित केली. इतर पत्रकारांच्या बहिष्कारामुळे सोलो परफोर्म्नसची संधी मिळाल्याचेही मिश्कील शैलीत केळकर म्हणाले.

 

माध्यमांच्या स्वायत्ततेवर बोलताना केळकर म्हणाले की, स्वायत्तता ही उधार-उसनवारीवर मिळत नाही, ती हिंमतीनेच मिळवावी लागते. पण, नेमकी स्वायत्तता माध्यमांना कोणापासून हवी, असा प्रश्न उपस्थित करत स्वायत्तता नेमकी कोणाला मिळाली पाहिजे, याचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक, नभोवाणी अशा सर्वच माध्यम क्षेत्रात कामाचा दांडगा अनुभव असलेले केळकर पुढे म्हणाले की, मी सरकारी माध्यमांमध्ये काम करतो. त्यामुळे मी काटेकोरपणे आखून दिलेल्या नियमांचे पालन करतो. म्हणूनच सरकारने केलेले काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मी माझी बांधिलकी समजतो. पण, जे आमच्या नियमांत बसत नाही, मग ते सरकारी वृत्त का असेना, ते आम्ही प्रसारित करत नाही, असेही ते म्हणाले.

 

स्वायत्तता दिल्यानंतरही पत्रकारांची गुणवत्ता वाढेलच असे नाही, ही बाब केळकर यांनी नमूद केली. माध्यमांमधील गुंतवणूक, थेट परदेशी गुंतवणुकीच्या मर्यादा, माध्यमांवरील राजकीय वरदहस्त, माध्यमांचे मालकी हक्क यामुळे माध्यमांची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते, असेही ते म्हणाले. माध्यमकर्मींना उपदेश करताना ते म्हणाले की, बांधिलकी आणि जबाबदारी या दोन्ही शब्दाचा अर्थ माध्यमकर्मीनी आधी समजून घ्यायला हवा. कारण, पत्रकारितेची बांधिलकी समजून मग त्याचे निर्वहन करणे आवश्यक आहे. सामान्य प्रेक्षकांना उद्देशूनही केळकर यांनी माध्यम समजुतीबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, वाचन, श्रवण, प्रेक्षण या तीन माध्यमातून आपण माहिती स्वीकारतो. पण, आज याची जाण किती प्रेक्षकांना आहे? म्हणून मी गांधीजींचे तीन बंदर मत बनो असे म्हणणार नाही, उलट डोळे उघडे ठेवा, वाचा, कानावर पडते ते नीट ऐका. पण, वाचताना त्यामधील रिकाम्या जागा समजून घ्या, माहिती ऐकताना त्यामध्ये मौन कुठे होते ते समजून घ्या आणि काहीही बघताना (माध्यमांनी) काय दाखवायचं टाळलं याचा विचार करा.

 

समाजमाध्यमाच्या ताकदीचे, व्यापकतेचे कौतुक करताना केळकर म्हणाले की, नवीन माध्यमांची ताकद खूप मोठी आहे. आज या नवमाध्यमांमुळे प्रत्येक जण बातमीदार झाला आहे. या नवमाध्यमांमध्ये प्रस्थापित माध्यमांकडून सत्ता काढून घेण्याचीही ताकद आहे. आपल्या भाषणाच्या अंतत: देशातील माध्यम क्रांतीला सामोरे जाण्यासाठी माध्यम साक्षरतेची गरज असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन त्यांनी केले.

 

अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे तर्कसंगत निर्बंधांसह - अपर्णा मोहिले

 

सेन्सॉर बोर्डाच्या माजी कार्यकारी अध्यक्षा अपर्णा मोहिले यांनी मोजक्या शब्दात माध्यमांतील स्वायत्तता हा विषय चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडला. त्या म्हणाल्या की, चित्रपट हे सर्वात प्रभावशाली माध्यम आहे. सेन्सॉर बोर्ड हे प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीमधील दुवा आहे. पण, इतर अभिव्यक्तिस्वातंत्र्यासह चित्रपटातील अभिव्यक्तिही तर्कसंगत निर्बंधांसोबतचे येते. त्यामुळे घटनाकारांनी अगदी योग्य लिहिले असून ही बाब आज प्रत्येक माध्यमाला लागू पडते.

 

यावेळी बोलताना चित्रपटातील प्री-सेन्सॉरशीपची प्रक्रिया काही उदाहरणांसह मोहिले यांनी उपस्थितांसमोर मांडली. तसेच संस्कृत साहित्यात आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिसते. नाट्यशास्त्र हा भरतमुनींनी लिहिलेला ग्रंथ हा पहिला सेन्सॉरचा प्रयोग म्हणावा लागेल, असेही त्या म्हणाल्या. ज्येष्ठ पत्रकारांनी बहिष्कार घातल्यानंतर परिसंवादाचे हे सत्र होणार नाही, रद्द केले गेले, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, तरीही नितीन केळकर आणि अपर्णा मोहिले यांच्या उपस्थितीत प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह हा परिसंवाद संपन्न झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@