ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. किशोर प्रधान यांच्या निधनामुळे अभिनय क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपला असल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे. मराठी सिनेसृष्टी, मराठी मालिका, जाहिरात आणि इंग्रजी नाटकांमधूनही त्यांनी काम केले होते.
 

‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘लालबाग परळ’ या सिनेमांमध्येही त्यांनी काम केले होते. ‘जब वी मेटया हिंदी सिनेमात करिना कपूरला भेटलेला स्टेशन मास्टर किशोर प्रधान यांनी साकारला होता. तसेच ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमामध्ये त्यांनी साकारलेले खट्याळ आजोबा सर्व प्रेक्षकांच्या लक्षात राहिले होते.

 

दूरदर्शनवरील ‘गजरा’ हा कार्यक्रम किशोर प्रधान यांनी त्यांच्या पत्नी शोभासह सादर केला होता. किशोर प्रधान यांनी अनेक इंग्रजी नाटकांमध्ये काम केले होते. किशोर प्रधान हे मूळचे नागपूरचे रहिवासी होते. प्रधान यांच्या कुटंबातूनच त्यांच्यावर अभिनयाचे संस्कार झाले होते. किशोर प्रधान यांच्या आई मालतीताई प्रधान या नाटकात काम करायच्या. याच वातावरणात किशोर प्रधान लहानाचे मोठे झाले. किशोर प्रधान हे उच्चशिक्षित होते. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातून एम.ए केले होते. त्यानंतर किशोर यांनी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस(टीस) मधून दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशीप आणि मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी प्राप्त केली होती.

 

महाविद्यालयीन जीवनापासूनच किशोर यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. अनेक नाटकांमधून आणि एकांकिकांमधून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर ते रंगभूमीतच रमले. नाटकाच्या आवडीमुळे त्यांनी काही नाट्यवेड्यांना घेऊन ‘नटराज’ या संस्थेची स्थापना केली. नटराज या संस्थेमार्फत काही नाटकेही रंगभूमीवर आली होती. तसेच स्वत: अभिनय करून किशोर यांनी एकेकाळी रंगभूमी गाजवली. ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘हनिमून झालाच पाहिजे’, ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रम्हचारी असावा शेजारी’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हँडसप’, ‘संभव असंभव’, या नाटकांमधून त्यांनी विविधरंगी भूमिका साकारल्या होत्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@