बेस्ट संप : मुंबईकरांसाठी धावून आल्या खासगी बस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : बेस्ट संपाचा आज पाचवा दिवस आहे. काल झालेल्या संपाबाबतच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे संप पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय बेस्ट कामगार कृती समितीने घेतला आहे. परंतु यामुळे मुंबईकरांचे हाल होऊ नयेत म्हणून खासगी बसेस मुंबईकरांसाठी धावून आल्या आहेत. शनिवारी सुमारे दोन हजार खासगी बसेस मुंबईकरांच्या सेवेला हजर असणार आहेत. स्कूल बस संघटना आणि मुंबई बस मालक संघटना यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.
 

बेस्ट संपामुळे गेल्या चार दिवसांपासून बेस्टची एकही बस रस्त्यावर धावलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होत आहे. मुंबईकरांना हा त्रास भोगावा लागू नये, म्हणून स्कूल बस संघटना आणि मुंबई बस मालक संघटना यांनी मिळून हा मुंबईकरांच्या हितासाठी हा निर्णय घेतला. दोन्ही संघटनाच्या मिळून सुमारे दोन हजार बसेस मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहेत.

 

या खासगी बसेसमधून प्रवास करताना मुंबईकरांकडून १० किलोमीटर अंतरासाठी २० रुपये भाडे आकारले जाणार आहे. तर अपंग आणि ज्येष्ठांना या खासगी बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. अशी माहिती स्कूल बस मालक संघटनेचे मालक अनिल गर्ग यांनी दिली. बेस्टच्या बसेसवर खासगी चालक आणि वाहक नेमून त्या रस्त्यावर उतरविण्याच्या तयारीत बेस्ट प्रशासन आहे. बेस्ट संपाबाबत राज्य सरकारच्या उच्च समितीची शनिवारी सकाळी ११ वाजता बैठक होणार होती. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यांची एक समिती नेमण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.

 

‘या’ आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

 

- बेस्टचा 'क’ अर्थसंकल्प हा मुंबई पालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्याच्या मंजूर ठरावाची त्वरीत अंमलबजावणी करणे.

 

- २००७ पासून उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,३९० रुपये सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती करण्यात यावी.

 

- २०१६ च्या एप्रिल पासून लागू होणाऱ्या नवीन वेतन करारावर त्वरित वाटाघाटी सुरु करण्यात यावी.

 

- २०१६-१७ आणि २०१७-१८ साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जावा.

 

- बेस्ट कर्मचाऱ्यांचा निवासस्थानांचा प्रश्न निकालात काढावा.

 

- अनुकंपा भरती त्वरित सुरु करण्यात यावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@