बेस्ट संप : सलग चौथ्या दिवशी ९ कोटींचे नुकसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2019
Total Views |



मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शुक्रवारी चौथा दिवस उजाडला. तरीही यासाठी तोडगा काही निघाला नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटवा म्हणून विविध पातळींवर चर्चा चालू आहेत, परंतु कुठल्याही वाटाघाटींना यश मिळत नाही आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी बेस्टचा संप सुरूच असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतली आहे.

 

'बेस्ट'चे ९ कोटींचे नुकसान

 

दशकातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. सलग चौथ्या दिवशी चालणाऱ्या या संपामुळे बेस्टचे आतापर्यंत ९ कोटींचे नुकसान झाले आहे. ४ दिवस कर्मचारी हजेरी लावतच नसल्यामुळे बेस्टच्या बसेस रस्त्यावर उतरल्याचे नाही आहेत. त्यामुळे सर्व आगार बंद आहेत. लवकरच तोडगा निघाला नाही तर बेस्टला मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्ह आहेत.

 

बेस्ट संपावर राज्य सरकारने मध्यस्थी करून तोडगा काढावा, उच्च न्यायालयाचे निर्देश

 

बेस्ट संपामध्ये मध्यस्थी करून राज्य सरकारने तोडगा काढावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. बेस्टचा संप मागे घेण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाचे कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनाला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर शुक्रवारी दुपारी दीड वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

 

सलग ३ दिवसांच्या संपामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यात हा संप बेकायदेशीर असल्याचे म्हणत न्यायालयाने हस्तक्षेप करत त्वरित संप मागे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. ही याचिका अॅड. दत्ता माने यांनी दाखल केली असून यावर शुक्रवारी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील व न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. न्यायालयाने गुरुवारी बेस्ट प्रशासन, महापालिका व राज्य सरकारला याबद्दल नोटीस पाठवली असून या संदर्भात तातडीची सुनावणी घेतली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@