छगनराव, तुमची डाळ शिजणार नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2019
Total Views |

 


मोदी फडणवीस यांच्या सरकारमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा उधळलेला बैलोबा खाली बसला, झोपला, त्यांची मनमर्जी करण्याची संधी हुकली. तशीच संधी आज पुन्हा मिळावी, म्हणून भुजबळांसारखे नेते भाजपवर तोंडसुख घेताना, सरकार उलथवून लावण्याची भाषा करताना दिसतात. बरोबरच आहे, दलालांचे धंदे बंद पडले की, चौकादाराविरोधात सगळेच एकवटतात!

 

न्यायालयाने जामिनावर सोडल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून छातीत कळ न येता इकडे-तिकडे पोपटपंची करत फिरणार्‍या छगन भुजबळांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राफेल विमान खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा देऊनही आपल्या बुद्धीची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगणार्‍या राहुल गांधींचा वाण नाही पण गुण भुजबळांना लागला आणि त्यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ज्याला साधे खेळण्यातले विमान तयार करण्याचा अनुभव नाही, त्या अंबानींना मोदींनी राफेल विमान निर्मितीचे कंत्राट दिले. यातूनच धनदांडग्यांना हाताशी धरून मोदी देश लुटायला निघाल्याचे स्पष्ट होते,” अशा शब्दांत भुजबळांनी स्वतःच्या मनातली खदखद बाहेर काढली. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षे कारागृहाची हवा खाल्ल्याने भुजबळांचा होत असलेला जळफळाट समजण्यासारखाच म्हटला पाहिजे. आधी स्वतः जनतेचा पैसा लुटून खाण्याचे उद्योग करायचे आणि नंतर चोरी पकडली गेली की पहारेकर्‍याच्या नावाने बोंबा मारायच्या, हा शिरस्ता भुजबळांनी या काळात अवलंबला. जोडीला शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाचा जपही तोंडी लावायला होताच. पण ज्या तत्त्वांसाठी या तिन्ही महापुरुषांनी आपले जीवन वेचले, त्या तत्त्वांतल्या चा उच्चार करण्याइतकेही आपले कार्य नाही, याचा भुजबळांना विसर पडला. लोकांना केवळ भावनेच्या जोरावर वेडे करून स्वतःच्या मागे पळवण्यासाठी भुजबळांनी शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाचा आणि कार्याचा वापर करून घेतला. पण अखेर खोट्याचे बिंग फुटतेच, तसे छगनरावांचेही झाले आणि साळसूद मुखवट्यामागचा खरा चेहरा समोर आला. राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी संसदेत चर्चा झाली, त्यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली आणि नंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कराराची सत्यता सर्वांसमोर मांडली. तरीही आपल्या अकला कुठल्यातरी आडगावात गहाण टाकलेल्यांना अजूनही या कराराचे महत्त्व आणि प्रक्रिया लक्षात येताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींना राफेल विमान खरेदी व्यवहार समजावून सांगणार्‍या एका आठ वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. हाच व्हिडिओ छगन भुजबळांनीही पाहून घ्यावा, कदाचित यातून आपली अवस्था या आठ वर्षांच्या मुलीपेक्षाही कमी वयाची व योग्यतेची झाली असल्याचेच त्यांना पटेल.

 

दुसरीकडे शिवसेनेत लढवय्येगिरी करत राजकारणाचे मैदान गाजविणार्‍या छगन भुजबळांचे आजचे स्थान अतिशय केविलवाणे झाले आहे. भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आल्याने जनतेला सामोरे जाण्याचे सामर्थ्य नाही, म्हणून उसने अवसान आणून आता ते परिवर्तनाच्या यात्रेत सहभागी होताना दिसतात. याच यात्रेत छगन भुजबळांनी आणखीही काही विधाने केली. देशात मनुवाद उफाळून आल्याची, जातीय-धार्मिक तेढ वाढल्याची, माध्यम आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आल्याची टेप त्यांनी यावेळी वाजवली. खरे म्हणजे सातत्याने एखादे पुस्तक जाळण्याची भाषा आणि कृती करणारा इसम अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बोलतो, ही कीव करण्यासारखीच गोष्ट. छगन भुजबळांनी आधी स्वतःकडे पाहावे, आपल्या सत्ताकाळात अभिव्यक्तीची ऐशी की तैशी करणार्‍या घटना कशा घडवून आणल्या गेल्या, त्याचे आत्मपरीक्षण करावे, मगच आताच्या सरकारबद्दल बोलावे. सोबतच देशात सध्या कोणीही हवे तसे बोलू, लिहू, वागू शकतो तरीही छगन भुजबळ बावचळल्यागत विधाने करतात, यावरूनच मोदी सरकारच्या कारवाईमुळे भुजबळांचे बरेच काही जळाल्याचे स्पष्ट होते; अन्यथा त्यांनी जिथे राईच नाही त्याचा पर्वत करण्याच्या गोष्टी केल्या नसत्या. पण मनातल्या मनात असहिष्णुतेचे ढोल बडवणार्‍या अन् अघोषित आणीबाणीच्या बिनबुडाच्या चकाट्या पिटणार्‍यांना सध्याचे उत्तम वातावरण दिसू शकत नाही, ते त्याचा अनुभवही घेऊ शकत नाही. कारण कावीळ झालेल्याला सगळे जगच जसे पिवळे दिसते, तसे भुजबळांचे झाले आहे. ते पांढर्‍याशुभ्र फळ्यावर सुईच्या अग्राएवढा का होईना काळा ठिपका दिसतो का, हेच शोधणार.

 

मोदी देश लुटायला निघाल्याचे आणि भाजप सरकारला सत्तेचा माज आल्याचे विधानही भुजबळांनी केले. सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या स्थानापर्यंत पोहोचण्याची पात्रता नसली की माणूस त्या व्यक्तीचीच निंदा करू लागतो. आपण केलेल्या निंदेमुळे कोणीतरी आपल्याला विचारेल, अशी या लोकांची भावना असते. सध्या तशी अवस्था बहुतेक सगळ्याच विरोधकांची झाली आहे. म्हणूनच गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकालाच मोदींविरोधात बोलायला आवडत असल्याचे पाहायला मिळते. छगन भुजबळही याच गटातले. मोदींविरोधात बोललो की आपल्यासारख्या जामिनावर बाहेर फिरणार्‍यालाही आपसूकच प्रसिद्धी मिळेल, हा भुजबळांचा हिशेब. पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात केलेला सत्तेचा माज आजही इथल्या प्रत्येकाला माहिती आहे. राज्यातल्या गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावून निरनिराळ्या घोटाळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला कसे पोखरून खाल्ले हे सर्वच जाणतात. सिंचन घोटाळा, अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा, आदर्श घोटाळ्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकांतील कारभारही लोकांना चांगलाच स्मरतो.

 

आपल्याला सत्ता मिळाली म्हणजे आपण महाराष्ट्राचे, इथल्या जनतेचे मालक झाल्याचा आविर्भाव तत्कालीन सत्ताधार्‍यांत होता. म्हणूच मध्ययुगीन सरंजामशहांच्या तोडीस तोड अशी धरण भरण्याची वैशिष्ट्यपूर्ण भाषा यांच्याच सरकारमधल्या एकाने केली आणि शेतकर्‍यांवर गोळीबार करण्याचा उन्मत्तपणाही यांनीच केला! पण नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा उधळलेला बैलोबा खाली बसला, झोपला, प्रत्येक गोष्टीतली स्वतःची मनमर्जी करण्याची संधी हुकली. तशीच संधी आज पुन्हा मिळावी, म्हणून भुजबळांसारखे नेते भाजप सरकारवर तोंडसुख घेत आहेत, सरकार उलथवून लावण्याची भाषा करत आहेत. बरोबरच आहे, दलालांचे धंदे बंद पडले की, चौकादाराविरोधात सगळेच एकवटतात, तसेच इथे होत आहे. पण जनता हुशार आहे आणि तिला स्वतःची पिळवणूक करणारे नव्हे तर प्रश्नांची सोडवणूक करणारे राज्यकर्ते हवे आहेत. म्हणूनच छगन भुजबळांनी कितीही आगी लावण्याच्या गोष्टी केल्या तरी त्यांना हवी असलेली सत्तेची डाळ कधी शिजणारच नाही, हे लक्षात घेतलेले बरे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@