विवेक जागृत करण्याची हीच वेळ : संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2019
Total Views |
 

बहिष्कार नाही, दिसला साहित्याचा प्रेमाविष्कार

 

यवतमाळ (विजय कुलकर्णी) : “अ. भा. मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे गेल्या कित्येक वर्षांची परंपरा राहिली आहे. त्यामुळे वाङ्मयीन वादासाठी अशाप्रकारे साहित्यास वेठीस धरणे योग्य नाही. जुन्या चुका आठवून हताश होण्यापेक्षा, त्या चुकांची भरपाई करण्याची वेळ आली असून त्यासाठी आपला विवेक जागृत करण्याची वेळ आली आहे,” असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक आणि ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्याक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या समायोचित अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

 

साहित्य रसिकांच्या अपूर्व उत्साहात ९२ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचा शानदार उद्घाटन सोहळा यवतमाळ येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपाठीवर राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, उद्घाटक म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नी वैशाली येडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते, ९१ व्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या सर्वस्पर्शी अध्यक्षीय भाषणात डॉ. अरुणा ढेरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीला ढेरे यांनी साहित्याचा हा संपन्न वारसा त्यांना त्यांचे वडील आणि संशोधक, ज्येष्ठ लेखक रा. चिं. ढेरे यांच्याकडून मिळाला असल्याचे सांगत त्यांनाही आपल्या साहित्यासाठी वैचारिक, न्यायालयीन संघर्ष करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, “साहित्य हा उत्सव असून वाङ्मयीन राजकारणामुळे हा उत्सव भ्रष्ट होऊ देता कामा नये. हे साहित्य संमेलन म्हणजे हा उत्सव निर्मल करण्याची संधी आहे.” साहित्य संमेलनाची शिळा रचणारे गोविंद महादेव रानडे यांच्या कार्यकर्तृत्वाचाही ढेरे यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून झालेलेया वादावर संमेलनाध्यक्षा म्हणाल्या की,“प्रत्येकाला विचारांचे स्वातंत्र्य आहे, तसे ते नयनतारा सहगल यांनाही आहे. पण वाचकांना त्यांच्या विचारांचे स्वातंत्र्य मान्य करायचे की अमान्य करायचे याचेही स्वातंत्र्य आहे.”


 
 

आपल्या भाषणात पुढे बोलताना डॉ. ढेरे म्हणाल्या की, भाबड्या वाचकांना भडकविण्याची ही जागा नाही. त्यामुळे माणसांनी स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवून समाजहिताचा विचार करावा. कारण हिंसा ही निंदा आहे आणि झुंडीचे राजकारण त्याज्य आहे. म्हणूनच परंपरेचे भान वर्तमान आणि भविष्यासाठी आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. संस्कृतीचे नवीकरण, मानवी जीवनातील टाकाऊ आणि टिकाऊ गोष्टींचा समतोल आदी विषयांवरही त्यांनी भाष्य केले. साहित्यिकांना उद्देशून त्या म्हणाल्या की, “साहित्यकारांची बांधिलकी ही जगण्याशी असली पाहिजे. आपल्या साहित्य कृतीमागे लेखकाने ठामपणे उभे राहायला हवे, त्यासाठी साहित्यिकाचा आपल्या निर्मितीवर दृढ विश्वास हवा.” मराठी भाषेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, “आपली मातृभाषा ही आधी आपल्या प्रेमाचा विषय झाली पाहिजे.” दैनंदिन वापरात भाषा कशी वापरतो ते महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाला.

 
 
 

संत साहित्यातील समृद्ध परंपरा, धर्म आणि कायदा, भारतीय स्त्रीवाद, महात्मा फुलेंचा एकमय मार्ग अशा समाजकारण, साहित्य, अध्यात्म इ. विविध पैलूंवर अरुणा ढेरे यांनी प्रकाश टाकला. आपल्या भाषणाच्या अंततः,“परिवर्तन ही जगण्याची खूण असून त्याचे प्रतिबिंब साहित्यामध्ये दिसते,” असे सांगून माणसाचे कल्याण करा, हाच विश्वात्मक भाव असल्याचा कानमंत्रही त्यांनी यावेळी दिला. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर यांनी महामंडळ आणि त्याच्याशी संबंधित संस्थांच्या मराठी भाषेसंबंधित कार्यावर प्रकाश टाकला. ९१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीवरून अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे सांगत तीव्र शब्दांत महामंडळाच्या या निर्णयाचा निषेध केला. आर्थिकदृष्ट्या महामंडळाने स्वयंपूर्ण व्हावे आणि साहित्यिकांनी मानधन नाकारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीने करण्यात आली, ज्याला साहित्य रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

 
 
 

अडचणीत गल्लीतील बाई कामी आली !

शेतकरी कुटुंबातील महिला आणि साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी परखड शब्दांत शेतकरी आणि महिलांच्या व्यथांना हात घातला. “अडचणीत दिल्लीची नाही, गल्लीची बाई कामाला आली,” या त्यांच्या विधानाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या म्हणाल्या की, “माणूस पुस्तक वाचून समजत नाही, त्यासाठी माणसात जावे लागते.” तसेच एकटी स्त्री सगळ्यांना संधी वाटत असल्याचा खेदही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. “लग्नानंतर बाईचे जग बदलते, पण लग्नानंतर नवरा आपले नाव तरी बदलेल का?,” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. “अभावानेच जगण्याला भाव मिळाला,” या त्यांच्या भाषणाच्या अंतिम ओळीने श्रोत्यांची मने जिंकून घेतली.

 
 

साहित्याच्या प्राचीवर अरुणोदय !

मराठी साहित्याच्या प्राचीवर अरुणोदय झाला आहे,” अशा शब्दांत मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी डॉ. अरुणा ढेरे यांच्या संमेलन अध्यक्ष निवडीबाबत कौतुकोद्गार काढले. तावडे म्हणाले की, “पहिली ते आठवी मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्य आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, ती होणे गरजेचे आहे. कारण मराठी भाषा हे आपले डोळे असले तर, इंग्रजी भाषा चष्मा आहे.” तसेच प्रत्येक महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ स्थापन करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणारी घटना शासनाला आवडली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. “देशाच्या एका मुख्यमंत्र्याला विदेशी विद्यापीठात भाषणासाठी विरोध झाला होता. आता नयनतारा सहगल यांच्या प्रकरणावरून विरोध करणार्‍यांचा विरोध तेव्हा कुठे गेला होता?,” असाही रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@