तेंडुलकरी हिंसात्मकतेचे महाराष्ट्रातील दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
 
 
डॉ. अरुणा ढेरे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना आपल्या कळपात ओढून त्यांनी आपला अजेंडा राबवावा, असे प्रयत्न सुरू झाले. आजवर ज्यांनी केवळ आपल्या आत्मबलाच्या आधारे वाटचाल केली, त्यांना ही गोष्ट रुचणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांचे इथले जगणे कसे अशक्य करता येईल, असे प्रयत्न सुरू झाले. हा सर्व अजेंडा राजकीय होता. कारण कोणत्याही डाव्या विचारसरणीच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट राजकारणापासून सुरू होते व राजकारणातच संपते.
 

प्रत्येक प्रतिभाशाली साहित्यिक आपापल्या प्रतिभेतून व्यक्ती व सामाजिक मानसिकतेचे दर्शन घडवित असतो. त्यातून त्याच्याही नकळत त्याचे स्वतःचे असे जीवनाचे तत्त्वज्ञान तयार होते. विजय तेंडुलकर असेच प्रतिभाशाली नाटककार. आधुनिक समाजातील हिंसात्मकता हा त्यांच्या चिंतनाचा विषय. त्याचे दोन वेगवेगळे आविष्कार ‘सखाराम बाईंडर’ आणि ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकात बघायला मिळतात. त्यातील ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक सखारामच्या व्यक्तिगत हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवते. हे दर्शन स्त्री-पुरुष संबंधातील पुरुषी वृत्तीच्या हिंसात्मकतेवर प्रकाश टाकते. पुरुषाला लैंगिक संबंधांसाठी आणि घरकामासाठी स्त्री लागते व स्त्रीला जगण्यासाठी, आर्थिक व इतर सुरक्षेसाठी पुरुष लागतो. परंतु, हे संबंध समान पातळीवरचे नसतात. या संबंधात पुरुष आपल्या हिंसात्मक पाशवी बळाच्या जोरावर स्त्रीला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. पाहणाऱ्यांना तो अन्याय वाटतो, पण सखारामच्या दृष्टीने तो स्वाभाविकच वागत असतो. त्याच्या जीवनाचा नैसर्गिक भाग म्हणून ही हिंसात्मकता येते. अशाच हिंसात्मकतेचे वेगळे दर्शन ‘शांतता कोर्ट चालू आहे’मध्ये घडते. ही हिंसा मानसिक पातळीवरची आहे, त्यामुळे अधिक सूक्ष्म आहे. ती समूहाने प्रकट केलेली आहे. ती करत असताना आपण एक खेळच खेळत आहोत, अशा भावनेने केली जात असते. अगदी खेळता खेळता व्यक्तीचे हिंस्त्र रूप प्रकट होत जाते. यात हिंसकपणे वावरणारी व्यक्ती एरवी सर्वसामान्य व्यक्तीसारखी वागणारी असते, पण पुढ्यात एखादी एकट्याने जीवन जगू पाहणारी स्त्री दिसली की, नकळत त्याच्यातील हिंस्त्रपणा जागा होत जातो व त्याच्याही नकळत ती व्यक्ती त्या खेळात सामील होत जाते. यात आपल्याला काय मिळेल अशा लाभाचाही विचार असतो व एकट्या जगू पाहणाऱ्या व्यक्तीचं एकटेपणाचं बळ समूहाला सहन होत नसतं, हेही एक कारण असतं. हातात एखादं कारण मिळालं तर त्या व्यक्तीला त्याच्या एकटेपणाच्या कोंडीत पकडून तिला शरण आणण्याचा विचार त्यामागे असतो.

 

शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाची सुरुवात अगदी सहजपणे होते. एका गावात सामाजिक कार्य म्हणून अभिरूप न्यायालयाचा प्रयोग करण्याकरिता नाटकाचे प्रयोग करणारा एक संच आला आहे. आपल्या शिक्षकी पेशात आनंद मानणारी व त्यातच रमणारी एक शिक्षिका म्हणजे बेणारेबाई. नाटकाच्या प्रयोगाला वेळ असतो म्हणून वेळ काढण्यासाठी दुसऱ्या नाटकाचा प्रयोग सुरू होतो. त्यात बेणारेबाईंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. पण खेळ म्हणून सुरू झालेले नाटक हे बेणारेबाईंच्या व्यक्तिगत जीवनात शिरते आणि मग त्यात प्रत्येकाच्या मनातली हिंसात्मक प्रवृत्ती जागी होत जाते व त्यातून अंग शहारून जावे तशा सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातील एक एक प्रवृत्ती अंगावर येऊ लागतात. माणसाच्या आदिम संस्कृतीतील सामूहिक मनातील हिंसात्मकता मध्यमवर्गीय समूह जीवनात कशी अभिव्यक्त होते, ते दर्शविणारे हे नाटक आहे. एरवी सर्वसाधारण दिसणारी माणसे समूहात आली की किती हिंसात्मक प्रवृत्तीने वागू शकतात, याचे उत्तम चित्रण या नाटकात आहे. यु ट्यूबवर ते उपलब्ध आहे.

 

अशाच प्रकारचा एक नाट्यप्रयोग महाराष्ट्राच्या रंगभूमीवर साजरा झाला. या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली. डाव्या किंवा उजव्या गटात न जाता त्यांनी आजवर आपल्या स्वतंत्र वाटेवर वाटचाल केली आहे. या वाटेवर स्वाभाविकपणे जे मिळेल ते त्या स्वीकारत गेल्या. त्यापलीकडची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. कधी कधी अशा व्यक्तींची अपेक्षा नसतानाही त्यांच्या जीवनात त्यांच्या कामाचा परिणाम म्हणून काही गोष्टी मिळून जातात. तशी त्यांची इच्छा व अपेक्षा नसताना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळून गेले. ज्या व्यक्ती त्यासाठी प्रयत्न करीत होत्या किंवा ज्यांना ते मिळविण्याकरिता खूप प्रयत्न करावे लागले, त्यांच्यातील काही जणांच्या मनात मत्सरभाव जागृत होणे स्वाभाविक आहे. तो मानवी मनाचा एक भाग म्हणून सोडून देऊ. पण साहित्याचे व संस्कृतीचे क्षेत्र म्हणजे आपल्या हक्काचे कुरण आहे व त्यात दुसऱ्या कोणीही घुसता कामा नये, अशी मिरासदारीची भावना असलेल्या व्यक्ती सर्वच क्षेत्रांत असतात.

 
नव्या येणाऱ्या व्यक्तीने एकतर आपल्या कळपात सामील व्हावे, नाही तर त्याचे इथले जीवन मुश्कील करू, अशी त्यांची भावना असते. डॉ. अरुणा ढेरे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना आपल्या कळपात ओढून त्यांनी आपला अजेंडा राबवावा, असे प्रयत्न सुरू झाले. आजवर ज्यांनी केवळ आपल्या आत्मबलाच्या आधारे वाटचाल केली, त्यांना ही गोष्ट रुचणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांचे इथले जगणे कसे अशक्य करता येईल, असे प्रयत्न सुरू झाले. हा सर्व अजेंडा राजकीय होता. कारण कोणत्याही डाव्या विचारसरणीच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट राजकारणापासून सुरू होते व राजकारणातच संपते. त्यामुळे डॉ. ढेरे राजकीय भूमिका घ्यायला तयार नसतील तर असा उद्घाटक आणायचा की, तो राजकीय भूमिका घेईल व हे संमेलन त्याचेच व्यासपीठ बनेल, असे प्रयत्न सुरु झाले. यामागची कारणे एक तर आयोजकांच्या लक्षात आली नाहीत किंवा त्याचे गांभीर्य कळले नाही. या सर्वांतील डावपेच लक्षात आले नाहीत की, त्यांनाही हे हवेच होते, हे कळायला मार्ग नाही. परंतु, कोणत्यातरी एका टप्प्यावर आयोजकांच्या लक्षात कुणीतरी आणून दिले की, हे सर्व साहित्यिक कारणापेक्षा राजकीय कारणामुळे होत आहे. यात असेही कोणी होते का की, उद्घाटनाच्या नावाला त्यांना अपेक्षित असलेल्या वर्गाकडून विरोध न झाल्याने त्यांना अपेक्षित होते, असे खळबळजनक वातावरण तयार झाले नाही. त्यामुळे नसलेला विरोध तयार केला गेला. उद्घाटकांनी येऊन उद्घाटन करण्यापेक्षा न येण्याचेच अधिक भांडवल करून संमेलन रद्द करता येईल, असे त्यांना वाटले असावे. कारणे कोणतीही असोत, आयोजक एका विशिष्ट गटाच्या डावपेचांचे बळी पडत गेले. एकदा निमंत्रण रद्द झाल्याबरोबर आधीच ठरलेला खेळ सुरू झाला. या आंदोलनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सुरू झाले.
 

गर्दीचा बुद्ध्यांक कमी असतो, असे समूह मानसशास्त्र सांगते. त्यामुळे बहिष्काराचे कारण सांगून हाकारे घालायला सुरुवात केली की, एरवी सामान्य दिसणारी माणसेही हिंसक बनून व्यवहार करू लागतात. आपल्या अग्रलेखातून व लेखातून जगभरातल्या स्वातंत्र्याविषयक कहाण्या सांगण्याची सवय असलेल्या पण आपल्यावर वेळ आल्यानंतर त्याच्या कसोटीवर न उतरलेल्या संपादकापासून संमेलनाध्यक्षपदी बसण्याची इच्छा असूनही ते न मिळालेल्या सर्वांचे बाहू फुरफुरू लागले. डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षपदाची घोषणा म्हणजे मराठी साहित्यसृष्टीत घडलेली उत्तम घटना असा अग्रलेख आपणच लिहिला आहे व आपल्या बहिष्काराच्या घोषणेने त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणाऱ्या साहित्य संमेलनाचा गळा घोटत आहोत, हे त्यांच्या लक्षात आले नव्हते काय? ज्या व्यक्तीवर विविध लेख लिहून निस्पृहता, निर्भयता याचे प्रमाणपत्र दिले, त्या व्यक्तीलाही काही स्वतःचे स्वतंत्र विचार असू शकतात, असा विचार त्यांच्या मनात आला नसेल काय? पण ‘शांतता कोर्ट चालू आहे’मध्ये जे चित्रित केले आहे त्यानुसार एकदा कळपाची धुंदी मनावर चढू लागली की, व्यक्तीची सारासार विचारबुद्धी लयाला जाते. तोही नकळत एका कळपाचा भाग बनून जातो. हा खेळ गेले काही दिवस अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. ज्या व्यक्तीच्या जीवनाविषयी लिहिले, तो फक्त शब्दांचा खेळ होता काय? एखाद्या राजकीय व्यासपीठावरून करावे अशा भाषणासाठी, ज्या व्यक्तीने आपली हयात खऱ्या अर्थाने सरस्वतीच्या पूजनात घालवली तिचा बळी जातो एवढे न कळण्याइतकी संवेदनशीलता कशी बधीर झाली? हे संमेलन झालेच नाही तर सरकारवर त्याचा ठपका ठेवून त्याचा सरकारविरोधी प्रचारासाठी उपयोग करता येईल व ते माझ्यामुळे झाले, असे पदक सन्मानाने मिरवता येईल इतकी मानसिकता घसरलेली आहे काय? ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकात तर कथा कोणीच रचलेली नसते. प्रत्येक पात्र त्याच्या विखारी व हिंस्र अभिव्यक्तीतून प्रसंग पुढे नेत जातो व शेवटी बेणारेंना तो पेलणे अशक्य होते.

 

तेंडुलकरांच्या दोन्ही नाटकांतील हिंस्त्रतेला बळी पडलेली पात्रे आतून कोसळलेली असतात. पण महाराष्ट्रातील या घडलेल्या नाटकाचा मात्र असा शेवट झाला नाही, कारण या कळपाचा ज्या व्यक्तीशी सामना होता ती, वरवर सौम्य वाटत असली तरी आतून कणखर होती. त्याचबरोबर अशा कळपासोबत वाहून न जाणाऱ्या व सारासार बुद्धी शाबूत असलेल्या अनेक व्यक्ती समाजात शिल्लक होत्या. त्यामुळे हा जीवघेणा खेळ फार काळ चालू शकला नाही. धर्माने अंध होऊन झुंडीने शिकार करायला निघालेल्या मध्ययुगीन मानसिकतेतील जमाव असो की, आपण काहीतरी विचारांची क्रांती करायला निघालो आहोत, असा अभिनिवेश असणारा पुरोगामी म्हणविणारा समाज असो, त्याची मानसिकता एकच असते. एक रस्त्यावर दिसते तर एक मानसिक पातळीवर लढली जाते. एक, जो आपल्यात नाही त्याचे शरीर नष्ट करू पाहते तर दुसरी त्याला मनाने उद्ध्वस्त करू पाहते. दोघांच्याही भाषा वेगळ्या असतात. एकाला आपल्या समूहाव्यतिरिक्तचे जग आपल्या ताब्यात आणून जगाला मुक्ती द्यायची असते, तर दुसऱ्याला आपल्या वैचारिक कळपात आणून ‘वैचारिक सहिष्णुता’ व ‘वैचारिक स्वातंत्र्य’ जपायचं असतं. कोणीही व्यक्ती आपल्यापेक्षा स्वतंत्र अधिक चांगला विचार करू शकते, यावर त्यांचा विश्वास नसतो. एका समूहवादाचा सामना करण्यासाठी दुसरा समूहवाद अंगीकारणे म्हणजे ‘सहिष्णुता’, हे जे नवे समीकरण घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच हा एक अंक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@