माओवाद्यांचे सरकार उलथविण्याचे कारस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |



.स. 1950 साल हे जर मध्यवर्ती मानले तर त्याच्या आधी आणि नंतर पाच वर्षांत जगातील ज्या शंभरपेक्षा अधिक देशांना स्वातंत्र्य मिळाले, त्या प्रत्येक देशाला कायम अस्थिर ठेवून पुढेमागे त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाश्चात्त्य देश कायमच तयारीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून त्या प्रत्येक देशात दहशतवादी संघटनांना पाश्चात्त्य देश मदत करत असतात.


पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात देशात पाच ठिकाणी छापे टाकून पाच कट्टर माओवादी दहशतवाद्यांना अटक केली. 27 वर्षांपूर्वी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जशी हत्या करण्यात आली, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट पोलिसांनी बोलून दाखवला. या कटाबाबत आपली सन्माननीय न्याययंत्रणा योग्य तो निवाडा करीलच, पण इ.स. 2011 मध्ये देशातील तीन-चार दहशतवादी संघटना या देशातील सत्ता उलथविण्यासाठी आणि देशाचे तुकडे करून वाटून घेण्यासाठी युद्धपद्धतीच्या घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत आहेत, असे ‘ब्रेकिंग इंडिया’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यात साऱ्या दहशतवादी संघटना काय कारवाया करत आहेत आणि काय करणार आहेत, याचा आराखडाच मांडला होता. त्या पुस्तकाबरहुकूम घटना घडत आहेत, हे मात्र निश्चित.

 

देशात मोठ्या प्रमाणावर घातपात घडवून येथील कायद्याने चालणारी सरकारी यंत्रणा आणि सरकार उलथवून टाकून या देशाचे तुकडे करण्याचे एक महा कटकारस्थान पुणे पोलिसांनी देशातील पाच मोठ्या नक्षली नेत्यांना अटक करून उजेडात आणले. नक्षलवादी लोक असे हिंसक प्रकार करतच असतात. त्यामुळे त्यांच्या या उपद्व्यापातून अधिकाधिक काय तर पश्चिम बंगालसारखी त्या त्या राज्याची काहीही प्रगती न करू शकणारे शासन येईल, एवढीच शंका येते. पण सध्या पुढे आलेली कूटयोजना फक्त घातपाताच्या आधारे आपल्या राजकीय भूमिकेचा प्रचार करण्यापुरती मर्यादित नाही तर घातपाताच्या आधारे देशात कायद्याने आणि राज्यघटनेने स्थापन झालेले सरकार उलथवून टाकण्याची ही योजना होती, हे आता स्पष्ट झाले आहे. घातपाताच्या आधारे सरकार पाडण्याची ही योजना म्हणजे अधिकाधिक काय तर निवडणुकीचा प्रचार अधिक आक्रमक करणे, असे असेल असे आपण वाटून घेतो आणि त्या विषयाकडे कानाडोळा करतो, पण ही योजना तेवढी मर्यादित नाही. एक म्हणजे या युद्धसदृश घातपाताच्या योजनेत फक्त नक्षलवादी म्हणजे माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचे लोक नाहीत तर भारतात जे जे दहशतवादी कारवाया करतात, अशा सगळ्या संघटनांचे लोक त्यात आहेत. एखाद्या देशावर आक्रमण करायला जेवढी तयारी लागते, तेवढी तयारी करून आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. हा लढा हा जनतेचा आहे, असे दाखविण्यासाठी ते लोकांची जमवाजमव करत आहेत. या ना त्या कारणाने अस्वस्थ असणाऱ्या तरुणांना ‘आपण आंबेडकरवादी संघटन उभे करत आहोत,’ असे सांगून संघटित करत आहेत आणि त्यांच्या घातपाताच्या योजनेत सहभागी करून घेत आहेत. देशातील माओवाद्यांची सारी शक्ती एकवटली तरी अशी युद्धसदृश स्थिती निर्माण करण्याएवढी त्यांची स्थिती नाही, म्हणून घातपाताच्या आधारे ज्यांना या देशातील सत्ता उलथवायची आहे, अशा अन्य दहशतवादी चळवळींचा सहभागही ते घेत आहेत. असे दहशतवादी म्हणजे देशातील जिहादी दहशतवादी संघटना आणि नागालँड, मिझोरामसारख्या क्षेत्रात दहशतवादाच्या आधारे ‘स्वतंत्र देश’अशी घोषणा करणाऱ्या चर्च दहशतवादी संघटना यांचीही तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे. देशातील आघाडीच्या माओवाद्यांवर जेव्हा पुणे पोलिसांनी कारवाई केली, तेव्हा त्यांच्या तपासातून असे लक्षात आले की, त्यांचा काश्मीरमध्ये पाकिस्तानमधून आक्रमक कारवाया करणाऱ्या आणि काश्मिरात भारतीय सेनेवर दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्यांच्या टोळ्यांशी संबंध आहे. त्याचप्रमाणे त्या अटक झालेल्या यादीत एक ख्रिश्चन मिशनरीही आहे. अर्थात हे फक्त वरवर दिसणारे छोटे-छोटे घटक आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की, हे सारे देशात युद्धसदृश स्थिती निर्माण करण्याच्या तयारीला लागले आहेत. खरे म्हणजे या मंडळींसाठी ‘युद्धसदृश स्थिती’ असा शब्द वापरणे योग्य नाही तर प्रत्यक्ष युद्धाचीच ती तयारी सुरू आहे. वरील तीन दहशतवादी संघटनांबरोबरच प्रत्येक राज्यात कार्यरत असणाऱ्या काही दहशतवादी संघटना त्यात सहभागी होत आहेत. दक्षिण भारतात द्रविड संघटना दीर्घकाळ अशाच दहशती कारवायांत सहभागी होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आता आंबेडकरवादी गट त्याचा भाग बनली आहे. कोरेगाव-भीमा दंगलीत ज्या कारवाया स्पष्ट झाल्या त्या प्रामुख्याने ‘आंबेडकरवादी’ नावावरच होत्या.

 

वरील साऱ्या वर्णनावरून त्यांच्या या देशाविरोधात पुकारलेल्या युद्धाची कल्पना येणार नाही. कारण हे सारे करून त्यांना काय मिळवायचे आहे, याची कल्पना येणार नाही. याबाबत जी माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार या साऱ्या दहशतवादी संघटनांनी भारतात हे घातपाती युद्ध जिंकून देशाचा ताबा घेतल्यावर या देशाचे तुकडे कसे करायचे आणि त्याचे वाटप कसे करायचे, हेही ठरविले आहे. या साऱ्या बाबींवर प्रकाश पाडणाऱ्या ‘ब्रेकिंग इंडिया’ पुस्तकात हा नकाशा दिला आहे. बऱ्या च वेळा असे होते की, मोठ्या व्यासंगाने लिहिलेल्या पुस्तकात सविस्तर माहिती असते पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळीच असते. पण ‘ब्रेकिंग इंडिया’बाबत वस्तुस्थिती निराळी आहे. त्या पुस्तकात इ.स. 2011 मध्ये दिलेल्या प्रत्येक बाबीची प्रचिती आजही येत आहे. त्यामुळे त्यातील अन्य माहितीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. या विषयातील विश्वास ठेवायला कठीण भाग म्हणजे परस्परविरोधी मते असलेल्या या दहशतवादी संघटना एकत्र काम कशा करतील? त्या संघटना केवळ भिन्न विचारसरणीच्या आहेत, असे नव्हे तर एकमेकांविरोधात लढल्या आहेत. साम्यवादी हे धर्माला अफूची आणि विषाची गोळी मानतात आणि ख्रिश्चन, मुस्लीम हे तर त्यांच्या त्यांच्या देवदूताच्या विरोधात चक्कार शब्द काढणाऱ्या ला मारणे हा त्यांचा धर्म समजतात. ख्रिश्चन आणि मुस्लीम हे तर गेली एक हजार वर्षे एकमेकांविरोधात केवळ आक्रमक आहेत, असे नव्हे तर युद्धे लढले आहेत. असे असेल तर मग या संघटना एकत्र कशा लढू शकतील? असे असले तरी भारतात आपण बघतो की, या साऱ्या दहशतवादी संघटना परस्परांच्या सहकार्याने लढत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यात जर त्यांना यश मिळाले तर त्यांना या देशाचा छोटा-मोठा तुकडा मिळणार आहे, अशी त्यांना आशा आहे. दुसरे असे की, अशा दहशतवादी संघटना आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘शत्रूचा शत्रू, हाच आपला जिवलग सखा’ असे मानले गेल्याची उदाहरणे पदोपदी सापडतात. पाकिस्तानातील ओसामा बिन लादेनसह साऱ्या च्या दहशतवादी संघटना या पाश्चात्त्यांच्या सहकार्यावरच उभ्या राहिल्या, ही वस्तुस्थिती सर्वांना ज्ञात आहे. या विषयात सखोल अभ्यास केल्यावर धक्कादायक माहिती पुढे येईलच पण एक गोष्ट मात्र आपण आज पाहू शकतो की, भारतातील या दहशतवादी संघटनामध्ये एकजिनसीपणा आहे. ‘ब्रेकिंग इंडिया’ या पुस्तकात तर यावर चारशे पाने माहिती दिली आहे.

 

देशातील पाच दहशतवादी संघटनांबरोबर अनेक छोट्यामोठ्या टोळ्याही एकत्र काम करताना दिसत आहेत, याचा अर्थ या साऱ्याना एकत्र आणणारी कोणीतरी अजून निराळी शक्ती आहे आणि प्रत्येक दहशतवादी गटाला त्यांचे त्यांचे मर्यादित उद्दिष्ट त्यांच्या पदरात पाडून द्यायला ती बांधील आहे. वास्तविक या विषयाचा तपशील फारच व्यापक आहे. ही बाब फक्त भारतापुरती मर्यादित नाही तर इ.स. 1950 साल हे जर मध्यवर्ती मानले तर त्याच्या आधी आणि नंतर पाच वर्षांत जगातील ज्या शंभरपेक्षा अधिक देशांना स्वातंत्र्य मिळाले, त्या प्रत्येक देशाला कायम अस्थिर ठेवून पुढेमागे त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाश्चात्त्य देश कायमच तयारीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून त्या प्रत्येक देशात अशा दहशतवादी संघटनांना पाश्चात्त्य देश मदत करत असतात. या छोट्या-छोट्या दहशतवादी संघटनांना अन्य काही मदतीची कायमच आवश्यकता असते. एक म्हणजे त्याला लपण्याची ठिकाणे-स्लिपिंग सेल हवी असतात. त्यांची माहितीची दळणवळण यंत्रणा मर्यादित असते, भूमिगत स्थितीत अनेक किमान गरजाही वारंवार निर्माण होत असतात. इतके करून ज्याच्या त्याच्या आखून दिलेल्या क्षेत्रात हस्तक्षेप नाही केला तर अन्य काही आक्षेपाचे मुद्दे येत नाहीत. भारतात पंजाब आणि तामिळनाडू येथे अशा स्वतंत्र देशाच्या मागण्या करणाऱ्या चळवळी उभ्या राहिल्या पण कोसळल्याही, पण त्यामागे नेमके कोण उभे होते, हे पाहिले तर यांची व्याप्ती किती असते, याची कल्पना येईल. यापैकी ज्या दहशतवादी संघटनांना एकदम टोकाची घातपाताची संधी मिळत नाही, त्या संघटना सध्या ‘येथील यंत्रणेवर दगड मारण्याच्या मोहिमा’ हाती घेताना दिसत आहेत. त्याची प्रचिती काश्मीरमध्ये येत आहे. प्रत्येक दहशतवादी संघटनेने त्या दिशेने तयारी सुरू केली आहे. दगड मारण्यातून सुरू झालेला हा लढा त्यांना या देशाविरोधात युद्धाच्या दिशेने न्यायचा आहे. कोरेगाव भीमाच्या निमित्ताने जी बाब पुढे येत आहे, त्यातून ते स्पष्ट होते आहे. यातील महत्त्वाची बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की, हे सारे लढे लोकांमधून उभे करण्याचा दावा करण्यात येतो आहे, त्यामुळे येथील प्रत्येक व्यक्तीला या आक्रमणाविरोधात आणि संयुक्त युद्धाविरोधात सावध करण्याची गरज आहे.

मोरेश्वर जोशी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@