इंटरनेट, प्लास्टिक सर्जरी आणि विज्ञान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |






विकारमुक्त जीवनाचा हा संदेश सगळ्यांपर्यंत जाण्याची आज गरज असताना, आम्ही त्याचा विज्ञानाशी बादरायण सबंध जोडत असू, तर त्यात आपल्याच आध्यत्मिक परंपरेशी प्रतारणा केल्यासारखे होईल. अध्यात्मात विज्ञान नाहीच हे सांगण्याचा हेतू अजिबात नाही, मात्र ज्या गोष्टी विज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. त्याला जाणीवपूर्वक विज्ञानाच्या कक्षेत मांडण्याचा प्रयत्न जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावा नाही तोपर्यंत करू नये...


सामाजिकशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये दोन वाक्ये हमखास वापरली जातात. पहिले म्हणजे, ‘जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज स्वतःचा इतिहास निर्माण करू शकत नाही’ आणि दुसरे, ‘जे इतिहासात रमतात, त्यांना वर्तमान नसतो.’ या दोन्ही वाक्यांचे महत्त्व नाकारता येत नसले, तरी वर्तमानात या दोन्ही वाक्यांचा काही सुवर्णमध्य असू शकतो का? याचा विचार करणे गरजेचे होते..दोन्ही वाक्यांना चिंतनाचा आधार आहे, हे निश्चित! मात्र, ‘इतिहास विसरणे’ हे जसे समाजासाठी आत्मघातकी ठरू शकते, तसे इतिहासाचे स्मरणरंजन हेदेखील समकालीन प्रश्नांपासून आपल्याला दूर नेऊ शकते, याचे भान असलेला समाजच विवेकनिष्ठ ठरतो. आपली संस्कृती आणि त्यातील सांप्रत काळी अनुरूप अशा परंपरा यांचा अभिमान असणे आणि त्यांचे पालन करणे हे जसे आपले कर्तव्य ठरते, तसे गतकाळातील स्मरणरंजनात न रमता समाजाच्या समस्यांचा व त्याच्या प्रगतीचा विचार प्राप्त परिस्थितीत होणे गरजेचे होऊन बसते. दुर्दैवाने जे जे काही म्हणून भारतीय ते नाकारण्याची एक लाटच भारतात आलेली दिसेल आणि जे पश्चिमेकडून आलेले ते आम्ही डोळे बंद करून स्वीकारत गेलो. या स्वीकार्यतेत चाळणी लावण्याची जी गरज होती, ती वारंवार अधोरेखित झालेली आहे. ब्रिटिशांच्या जीवनपद्धतीचे आम्हाला असलेले आकर्षण ते विजेते असल्याने स्वाभाविकही होते. परंतु, त्यांच्या संस्कृतीतले दोष बाजूला सारूनदेखील ती आम्हाला स्वीकारता आली असती. शिवाय त्यांच्यातील चांगले घेण्यातदेखील आम्ही अपयशी ठरलो. आमच्या देशातील संत, शास्त्रकार आणि वैज्ञानिकांनी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून मानवी जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या रचनेत भौतिकवादाला जागा नव्हती. अवाजवी गरजा आणि उपभोगाचे स्थान यात दुय्यम होते. अध्यात्मातून मानवी जीवनास सुख आणि शांतता लाभेल, असा प्रयत्न होता, तर विज्ञानातून आवश्यक तेवढ्याच भौतिक गरजांची पूर्ती होती. पुढे युरोपीय भौतिकवाद आला आणि त्याने आपल्या सगळ्यांचे जगण्याचे मानदंड बदलून टाकले. उपभोक्तावादाच्या प्रचंड आक्रमणात आमच्या जीवनपद्धतीचा पालापाचोळा झाला नसता तर नवल. 1990 नंतरच्या काळात हे सपाटीकरण वेगाने झालेले आपल्याला दिसेल. मग आम्ही पश्चिमेला तोंड देण्याचा सोपा मार्ग स्वीकारला- तो म्हणजे जे आज युरोप सांगतोय ते सारे काही आमच्याकडे आधीच होते. अर्थात, आमच्याकडे काहीच नव्हते असे नाही, पण आमची आराध्यदेवता असलेला गणपती म्हणजे संगणक असून त्याच्यासमोर ठेवला जाणारा उंदीर हा संगणकाचा माऊस, अशी बाष्कळ विधाने केली जातात. 2015 च्या मुंबई येथे झालेल्या भारतीय सायन्स काँग्रेसमध्ये, भारतीय विमानविद्येवर कॅप्टन आनंद बोडस यांचे व्याख्यान आयोजित करणे ही आयोजकांची मोठी चूक होती. त्याहीपेक्षा आयोजकांना चुकीची माहिती दिली गेली, असे म्हणणे जास्त सोयिस्कर ठरेल. कॅ. आनंद बोडस यांची विमानशास्त्रावरची व्याख्याने मी स्वतः अशाच चुकीच्या सल्ल्याने आयोजित केलेली असल्याने, त्या विषयातील त्यांची अत्यंत तोकडी माहिती (ज्ञान नव्हे!) आम्ही जाणून आहोत. ज्या ‘विमानशास्त्रम्’ या ग्रंथाचा उल्लेख सायन्स काँग्रेसमध्ये झाला, तो ग्रंथ 1904 नंतरचा आहे, हे आतासे सिद्ध झाले आहे. त्याहीपेक्षा खुद्द पंतप्रधानांनी,मानवी शरीराला हत्तीचे डोके बसवून गणपती करणे, हे प्लास्टिक सर्जरीचे जगातील पहिले उदाहरण आहे, असे सांगणे त्यांना टाळता आले असते. अशी विधाने करताना संबंधितानी त्या विषयाचा आपला अभ्यास आणि त्यासबंधीचे पुरावे या दोन्हीचा विचार करणे गरजेचे आहे. सायन्स काँग्रेसमधील वादावर बोलताना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी सांगितले की, असे दावे करताना त्यासाठी लागणारे ठोस असे पुरावे आणि संदर्भ देता आले पाहिजे; अन्यथा या देशात होऊन गेलेल्या सुश्रुतापासून ते जगदीशचंद्रांपर्यंत आणि कणादांपासून ते कलामांपर्यंतच्या संशोधनाचे महत्त्व कमी होते.

 

याच परिषदेत National Aerospace Laboratories चे संचालक डॉ. रुद्रम नरसिंहा यांनीदेखील, ज्या पुस्तकाच्या आधारावर सात हजार वर्षे आधी विमान होते, हा दावा केला जातोय ते विश्वसनीय नसल्याचे सांगितले आणि त्यांच्या वैज्ञानिकतेला आव्हान दिले. डॉ. विजय भटकर आणि अन्य अनेक वैज्ञानिक आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म हे हातात हात घालून पुढे गेल्यास जगाचे चित्र वेगळे राहील, असे सांगतात. विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या, तरी पुराणातील कथांमधूनशास्त्रकारांना जे सांगायचे आहे ते बळजबरीने वैज्ञानिक असल्याचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. ते शुद्ध अध्यात्म असू शकेल. त्याच वेळी भारताच्या वैज्ञानिक परंपरेचादेखील नव्याने विचार व्हायला हवा. गणपती, दुर्गा या देवतांच्या स्वरूपातून शास्त्रकारांना जे सांगायचे आहे, ते पुढे आणले गेले पाहिजे. या कामी गणेश अभ्यासक डॉ. स्वानंद पुंड यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. देशातील डाव्या चळवळीतील मंडळींनी हिंदू धर्म आणि त्याच्या देवतांबद्दल सदैव अपप्रचार केला. दुर्गा किंवा काली ही शास्त्रकारांनी नेहमीच आक्रमक आणि हिंस्र अशी दाखविली आहे. देवी काली, जिच्या गळ्यात नरमुंडांची माळ आहे, पायाखाली साक्षात तिचा पती शिव पडलाय, डोळे रागाने लालबुंद आहेत, एका हातात शस्त्र आणि एका हातात खप्पर आहे. खप्पर रक्ताने भरून वाहते आहे, रक्ताने माखलेली जीभ बाहेर आली आहे. हे आहे तिचे एकंदर रूप. हिंस्र आणि आक्रमक असलेल्या देवीची आम्ही नवरात्रात मनोभावे पूजा करतो. मात्र, शास्त्रकारांना जे सांगायचे आहे ते आम्ही कधी समजून घेतलेले नसते. विपश्यनेचे दिवंगत आचार्य सत्यनारायण गोएंका त्यांच्या बोलण्यातून देवीच्या या रूपाची उकल करायचे. काली ज्या राक्षसांसोबत लढतेय ते आहेत शुंभ आणि निशुंभ. हे शुंभ आणि निशुंभ प्रतीक आहेत आपल्यातील राग आणि द्वेषाचे. या ठिकाणी राग म्हणजे आसक्ती. राग आणि द्वेष हे आपले खरे शत्रू. हे निर्माण कुठे होतात, तर आमच्या मनात. ईर्ष्या, क्रोध, मत्सर, वासना, अहंकार ही या राग आणि द्वेषाची अपत्ये. शुंभ आणि निशुंभाचे कितीही वेळा देवीने डोके उडवल्यावर जमिनीवर पडणाऱ्या रक्तातून ते पुन:पुन्हा जन्माला येतात. म्हणजे त्यांचे रक्तबीज तयार झाले. आमच्या मनात तयार होणाऱ्या राग आणि द्वेष या भावना आपण कितीही संपविण्याचा प्रयत्न केला, तरी सामन्य माणूस म्हणून आपल्याला तसे करणे शक्य नसते. अर्थात, या विकारांवर विजय मिळविल्याची अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत. वर्धमान महावीर, भगवान बुद्ध, संत ज्ञानदेव, तुकोबाराय ही स्थितप्रज्ञ माणसांची उदाहरणे होत. पण, सामान्य माणूस या विकारांवर विजय कसा मिळवेल?मग, त्या राक्षसांच्या शरीरातून बाहेर उडणारे रक्त, देवी सुरुवातीला आपल्या जिभेने पिऊन टाकण्याचा प्रयत्न करते. पिऊन ते संपविता येणे शक्य नसल्याने, देवी पुढे जाऊन त्यांच्या रक्ताची चिळकांडी हातातील खप्परात झेलून घेते. ज्यामुळे रक्ताचा थेंब जमिनीवर पडणार नाही आणि शुंभ-निशुंभमारले जातील. आमचे चंचल असलेले मन ही विकार जन्माला येणारी जमीन आहे. त्या जमिनीवर विकारांचे पीक यायचे नसेल, तर विकारांना जमीन म्हणजे मनात थारा देता कामा नये. हा आध्यात्मिक संदेश देवी आपल्याला देते. काळाच्या ओघात आम्ही हा संदेश विसरलो आणि ‘उत्सवी’ झालो.

 
 

विकारमुक्तजीवनाचा हा संदेश सगळ्यांपर्यंत जाण्याची आज गरज असताना, आम्ही त्याचा विज्ञानाशी बादरायण संबंध जोडत असू, तर त्यात आपल्याच आध्यत्मिक परंपरेशी प्रतारणा केल्यासारखे होईल. अध्यात्मात विज्ञान नाहीच, हे सांगण्याचा हेतू अजिबात नाही. मात्र, ज्या गोष्टी विज्ञानाच्या कक्षेत येत नाही त्याला जाणीवपूर्वक विज्ञानाच्या कक्षेत मांडण्याचा प्रयत्न जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावा नाही तोपर्यंत करू नये. राजकारणी मंडळींनी तरी असल्या अवैज्ञानिक विधानांपासून सावध असावे. आमच्या इतिहासातील वर्तमानाला पोषक असलेली तत्त्वे स्मरणरंजनात न अडकता बाहेर काढता आली पाहिजे. आमच्या देशातील अनेक वैज्ञानिक शोध आजही पुढे आणण्याची गरज आहे. गणपती, प्लास्टिक सर्जरी, इंटरनेट या गोष्टी आमच्याकडे होत्याच, असा दावा न करता, ज्या गोष्टी आमच्याकडे खरेच होत्या. त्यांचे स्मरण आणि त्या आधारावर त्याचे दस्तऐवजीकरण झाले पाहिजे. कारण, भारतीय समाज हा डॉक्युमेंटेशन करण्यात कधीच अग्रेसर नव्हता, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. ज्ञानाचे व्यावसायीकरण करणे, हे भारतात प्रचलित नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचे ‘हिंदू केमेस्ट्री’, ब्रजेंद्रनाथ सील यांचे The positive science of ancient Hindus,रावसाहेब वझे यांचे ‘हिंदी शिल्पशास्त्र’ या ग्रंथांनी भारतीय विज्ञानाच्या बाबतीत मोलाची कामगिरी केली आहे. या श्रेणीत डॉ. ए. पी. जे. कलाम यांनी त्यांच्या 'India Two Thousand twenty : vision for new Millennium' या पुस्तकात मांडलेला विचार महत्त्वपूर्ण ठरतो. एकदा एका समारोहात काही देशी, विदेशी वैज्ञानिक आणि महत्त्वपूर्ण लोक निमंत्रित होते. त्यात रॉकेट लाँचरच्या शोधाचा विषय निघाला. कुणीतरी सांगितले की, एक हजार वर्षांपूर्वी बारूदचा शोध चिन्यांनी लावला. बाराव्या किंवा तेराव्या शतकात अग्निबाणांचा वापर सुरू झाला. त्या चर्चेत कलामांनी भाग घेत सांगितले की, सर्वप्रथम अग्निबाणाचा वापर श्रीरंगपट्टणच्या युद्धात इंग्रजांच्या विरुद्ध करण्यात आला. टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज, असे ते युद्ध होते. विख्यात वैज्ञानिक सर बर्नार्ड लॉवेल यांच्या The origins and international economics of space Exploration' या ग्रंथात संपूर्ण घटनाक्रम आला आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्याच देशातील ज्या व्यक्तीने अग्निबाणाचा शोध लावला, त्याचे आम्हाला साधे नावदेखील माहीत नसावे? याचा अर्थ असा की, अनेक अवैज्ञानिक गोष्टींना आम्ही बळजबरीने वैज्ञानिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि डॉ. कलाम ज्या वैज्ञानिक परंपरेबद्दल सप्रमाण सांगतात, त्यावर काम करायला आम्हाला सवड नाही. वर्तमानातआम्ही विज्ञानात काय करतोय, हे तपासण्याची वेळ आली आहे. आमच्या मागून आलेल्या सिंगापूर, इस्रायलसारख्या देशांनी केलेली प्रगती सगळ्यांचे डोळे दिपवणारी आहे. आजही आम्हाला तंत्रज्ञान आणि त्यासबंधी अनेक गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागत असतील, तर आमच्याकडे सगळेच होते, हे विधान तपासून पाहण्याची वेळ आली आहे. म्हणून वैज्ञानिक स्मरणरंजन आणि खरी वैज्ञानिक परंपरा यातील सुवर्णमध्य आपल्याला योग्य दिशेने पुढे नेणार आहे. पुराणातील कथांना यापुढे वैज्ञानिक अंगरखा न पांघरता, आपली खरी वैज्ञानिक परंपरा शोधणे आणि तद्नुसार मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त ठरते.

- प्रशांत आर्वे

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@