अरे बजाओ... पण जरा हळू..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |


 

 

पुणे: गणेशोत्सव म्हणजे ढोल ताशा पथकांचा तामझाम. हे समीकरण गेले कित्येक वर्ष पुण्याच्या मिरवणुकींमधली एक शान असते. मग कोणी ५० तर कोणी १०० वादकांचा दणदणाट घेऊनच मिरवणुकीत सामील होणार हे ठरलेलंच. पण आता मात्र यावर्षी पथकांवर मर्यादा घातली जाणार आहे. पोलिसांच्या या निर्णयावर ढोल ताशा पथकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या ढोल पथकामध्ये वादकांची कमाल संख्या ५२ असावी. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत तीन आणि अन्य मंडळांच्या मिरवणुकीत दोन पथकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. गणेशोत्सवात ढोल-ताशा मिळून केवळ ५२ वादक असावेत. त्यामध्ये एका पथकामध्ये २५ ढोलवादक, ७ ताशावादक आणि ४ झांजवादक असावेत, असे नियम असलेली आचारसंहिता पोलिसांनी गणेशोत्सव ढोल ताशा महासंघाकडे देण्यात आली. मात्र, यामध्ये वादकांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी ढोल ताशा महासंघाने केली आहे. यावर येत्या २ ते ३ दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. पोलिस आणि ढोल-ताशा महासंघ यांच्यामध्ये गुरुवारी ही बैठक पार पडली. ध्वज, बर्ची, लेझिम पथकांची संख्या वेगळी ग्राह्य धरली जाणार असून, तीदेखील पोलिसांमार्फत नियंत्रित करण्यात येणार असल्याचे या आचारसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे. या शिवाय विसर्जन मिरवणुकीमध्ये एका पथकाने एकदाच लक्ष्मी रस्त्यावरून वादन करत जावे, अशी अटही घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व वादकांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक पथकाला वादकांची यादी पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

पथकांचा सराव आता अंतिम टप्प्यात आला आहे. या नियमावलीमुळे त्यांचा हिरमोड होणार असून, काही मोजक्याच वादकांना वादन करता येईल. पोलिसांनी याचा विचार करून सर्वसमावेशक आचारसंहिता द्यावी, त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी भूमिका ढोल-ताशा महासंघातर्फे घेण्यात आली आहे.

 

याची माहिती देताना पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले की, ढोल पथकांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असून, त्या संदर्भातील आचारसंहिता ढोल-ताशा महासंघामार्फत पथकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. आणखी एका बैठकीमध्ये यावर चर्चा होईल. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत. तर पोलिसांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत जी आचारसंहिता दिली गेली त्याबद्दल अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. यावर पुन्हा एकदा बैठक घेऊन पथकांची आणि वादकांची बाजू मांडली जाईल. या बैठकीत निश्चितपणे तोडगा निघेल. असा विश्वास ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी दाखवला.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@