महिलांच्या क्षमता जाणून त्यांना संधी द्या, परिवार, समाज व देशही बदलेल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |

‘तरुण भारत’शी साधलेल्या विशेष संवादात शताब्दी पांडे यांंचे प्रतिपादन

 
जळगाव, ८ सप्टेंबर :
स्वत:चे घर, कुटुंब सक्षमपणे सांभाळणारी महिला ही राष्ट्राची सारथी आहे. तिने आणि समाजाने तिच्या क्षमता जाणून घेतल्या आणि संधी दिली तर परिवार, समाज व देशात परिवर्तन घडू शकेल, असे प्रतिपादन बाल संरक्षण आयोग छत्तीसगडच्या माजी अध्यक्षा आणि नीती आयोगाच्या युवा रोजगार समितीच्या सदस्या शताब्दी पांडे यांनी तरुण भारतने साधलेल्या विशेष संवादात केले.
 
 
सहकार भारतीतर्फे शनिवार, ८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात महिला मेळावा प्रचंड उपस्थितीत पार पडला. त्यात मार्गदर्शन करण्यासाठी त्या जळगावात आल्या होत्या, त्यांच्याशी झालेल्या संवादाचा गोषवारा असा,
 
प्रश्‍न : या समितीची रचना कशी आहे?
उत्तर : पंतप्रधान अध्यक्ष असतात आणि राजीवकुमार हे उपाध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून ५ वर्षासाठी माझी नियुक्ती झाली आहे.
 
प्रश्‍न : आपली समिती नेमके काय कार्य करते?
उत्तर : ही समिती नीती आयोगाच्या विविध समित्यांमधील एक समिती आहे. कृषी उत्पादनावर आधारित रोजगारनिर्मिती, उत्पादनात वाढ, विपणन व्यवस्था
प्रभावी करणे, त्याद्वारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती याला चालना देण्याचे काम करते. युवक-युवतींना मार्गदर्शन, प्रशिक्षण देणे, रोजगारनिर्मितीचे प्रयत्न करणे, बेरोजगारीला अटकाव कसा करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न असतात.
 
प्रश्‍न : तुमचा प्रवास आणि संपर्क पाहता सध्या सहकार चळवळ आणि महिला बचत गटांचे कार्य याबाबत काय सांगाल?...
उत्तर : आमच्या छत्तीसगड क्षेत्रात मजूर, कष्टकरी, अल्पशिक्षित महिलांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्तच आहेत. पण कर्नाटक आणि त्याखालोखाल महाराष्ट्रात आर्थिक जागरुकता व सहभाग चांगला आहे. या राज्यांमधील महिला वर्गात आर्थिक साक्षरता, समज, जाण समाधानकारक असून बहुसंख्य महिला बचत गट चांगले काम करीत आहेत.
 
प्रश्‍न : आपण आणि समिती कशावर लक्ष केंद्रित करीत आहात?
उत्तर : शासकीय विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन व प्रशिक्षण याद्वारे युवक-युवतींमध्ये उद्यमशीलता, उत्पादनांचा दर्जा वाढवणे, बाजारपेठेत प्रभुत्व कसे निर्माण करता येईल, (स्टार्ट अप) याबाबत त्यांना संधी देणे व त्यांचा सहभाग वाढविणे तसेच महिला बचत गटांद्वारे महिला सक्षमीकरण (अर्थात परिवार, भारतीय संस्कृतीचे पालन व संवर्धन) करणे, त्यांच्यात आर्थिक साक्षरता (पैशांचा उत्तम विनियोग करण्याची दृष्टी) वाढवणे, सर्वस्तरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती यावर भर असणार आहे. त्याशिवाय मूळ हेतू साधणे कठीण आहे.
 
प्रश्‍न : आपल्या आयुष्यातील काही सुखद क्षण
उत्तर : महान नेते, माजी पंतप्रधान अटलजींच्या हस्ते २००४ मध्ये आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते २००८ मध्ये पुरस्काराने सन्मानित झाले.
 
शताब्दी पांडे छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या. पण त्या मूळच्या नागपूरच्या. पूर्वाश्रमीच्या अर्चना ठाणवी, त्यांच्या माहेरी व सासरीही ३ पिढ्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराशी निगडित आहेत. परिवारात अजूनही मराठी भाषा आणि संस्कार, संस्कृती व संवादही कायम आहे. (याची झलक वेळोेवेळी त्यांच्या पाऊण तासाच्या भाषणात जाणवली.)
 
त्यांच्या आई सुधा ठाणवी आणि वडील वल्लभचंद्र ठाणवी (मूळ रा.खामगाव) हे विश्‍व हिंदू परिषदेचे निष्ठावंत कार्यकर्ते, अध्यक्ष स्व.अशोकजी सिंघल यांचे सहकारी आणि सासरे मनोहर विनायकराव पांडे हे तर बालपणापासूनचे संघ स्वयंसेवक.
 
शताब्दी यांचे महाविद्यालयीन शिक्षण रायपूरला झाले आहे. फिलॉसॉफीत एम.ए. (सुवर्णपदकासह), एम.फिल, एम.एस.डब्ल्यू., एल एल.बी.असे उच्च शिक्षण घेतलेल्या शताब्दी यांनी काही काळ असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही सेवा बजावलेली आहे. राष्ट्रसेविका समितीच्या त्या द्वितीय वर्ष प्रशिक्षित कार्यकर्त्या. सहकार भारतीच्या राष्ट्रीयमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या विविधांगी अनुभवांची व विचारांची आणि गुणसमुच्चयाची प्रचिती त्यांच्या सुस्पष्ट, अनुभवसिद्ध व मुद्देसूद भाषणात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@