‘स्व-निर्मिती’ची दिशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |


 

 

 
आपले प्रश्न कमी करून मुलांना प्रश्न विचारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे जास्त आवश्यक आहे. मुलांना बोलते करण्यासाठी बहुतांश वेळा पालकांनी केवळ संयमी श्रोता होणेही पुरेसे असते. ‘स्व-निर्मिती’च्या या प्राथमिक टप्प्यामध्ये मुलांवर शिक्कामोर्तब करणे व त्यांची इतरांशी तुलनाकरणे कटाक्षाने टाळावे.


“अगं, ती खेळते आहे, तिच्या मित्रमंडळींबरोबर. तू तिला कशाला बोलावतेस सारखं? आपण इथे बसू शांत. तिला यायचं तेव्हा ती येईल.” लेकीचे कौतुक वाटून तिला जवळ घेण्याची माझ्यातील आईची तीव्र इच्छा जाणून नवऱ्याने मला थोपवले. परवा एका कौटुंबिक कार्यक्रमात आमची लेक तिथे जमलेल्या इतर मुलांबरोबर मस्त धुमाकूळ घालत होती. बरेच लोक जमलेले असतानाही, इतर मुले फारशी ओळखीची नसतानाही, ती न बुजता मोकळेपणाने वागते आहे, असा हा पहिलाच प्रसंग. मला तिच्यातील हा बदल पाहून खूप आनंद होत होता आणि त्याक्षणी तिला जवळ घेऊन तो व्यक्त करावा असे वाटत होते. पण, ती तिच्या विश्वात इतकी मग्न होती की, तिला माझ्याकडे पाहायलाही सवड नव्हती. माझी द्विधा मनःस्थिती नवऱ्याने बरोबर ओळखली. एका कोपऱ्यात शांतपणे बसून आम्ही अनिमिष नेत्रांनी लेकीचे स्वच्छंद रूप मनात साठवत राहिलो. माझ्या तोंडून नकळत उद्गार आले, “मोठी झाली रे...” आणि पालकत्वाच्या वाटेवरचा माझा सहप्रवासी समजुतीने छानसे हसला.

 

साधारण आठव्या-नवव्या वर्षानंतर मुले खूप बदलत जातात. कालपर्यंत आई-बाबाला चिकटून असणारी, वारंवार लाडाने गळ्यात हात टाकून चिवचिव करणारी मुले आता फारकाळ आई-बाबाच्या वाट्याला येत नाहीत. त्यांचे विश्व विस्तारत असते. एक-दोन वर्षापूर्वीचे आपले लाडके बाळ शारीरिक-बौद्धिक-भावनिक-सामाजिक सर्वच अंगाने खूप बदलू लागते. मुलांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हळूहळू उमलू लागते. यावेळी पालक मुलांच्या या नव्याने साकारणाऱ्या रुपाला जितके मनापासून स्वीकारतील तितके चांगले. नव्याने गवसणारे हे स्वातंत्र्य हाताळताना मुले खूपदा धडपडतात, गोंधळतात, चिडचिड करतात, पालकांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू पाहतात. अशावेळी आपण त्यांच्या वागण्याला कसा प्रतिसाद देतो हे फार महत्त्वाचे ठरते. इथे ‘काय लावून धरायचे’ आणि ‘काय सोडून द्यायचे’ याचा समतोल साधत मुलांशी संवाद चालू ठेवावा लागतो. पालकांची भूमिका केवळ ‘काळजी घेणारे’ पासून बदलून आता ‘समजून घेणारे’ अशी व्हावी लागते.

 

या वयातील मुलांना पालकांपेक्षा जास्त मैत्र जीवाचे होऊ लागतात. अशावेळी कुठेतरी आपले मूल आपल्याला दुरावत तर नाही ना? नापसंत तर करत नाही ना? असे प्रश्न पालकांच्या मनात डोकावू शकतात. त्यातून निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना मुलांच्या आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त लक्ष घालू बघते. त्यांचा अभ्यास, त्यांचा मित्रपरिवार या सगळ्याची आपल्याला इत्यंभूत माहिती असायलाच हवी, यासाठी आटापिटा केला जातो. यातून मुलांबरोबर सुसंवादापेक्षा विसंवाद, तर जास्त होत नाही ना? याचा विचार करायला हवा. आपल्या मुलांची शाळेत झालेली भांडणे व्हॉट्सअप ग्रुपवर पुढे घेऊन जाणारे काही पालक मी पाहिले आहेत. यातून परस्परांमध्ये तेढ तर निर्माण होऊ शकतेच, शिवाय ‘आपली भांडणे आपणच संवादाने सोडवू शकतो’ हा आत्मविश्वास मुलांना देण्याची संधीही हुकते.

 

या वयात मुलांना बोलते करण्यासाठी त्यांच्याबरोबर दिवसातला काही वेळ मुद्दाम राखून ठेवणे फायद्याचे ठरते. गप्पा-गोष्टी खेळ, चर्चा करताना मुलांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती आपसूक मिळू शकते. त्यांना पडणारे प्रश्न त्यांच्या विचारप्रक्रियेचा अंदाज देऊ शकतात. आपले प्रश्न कमी करून मुलांना प्रश्न विचारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे जास्त आवश्यक आहे. मुलांना बोलते करण्यासाठी बहुतांश वेळा पालकांनी केवळ संयमी श्रोता होणेही पुरेसे असते. ‘स्व-निर्मिती’च्या या प्राथमिक टप्प्यामध्ये मुलांवर शिक्कामोर्तब करणे व त्यांची इतरांशी तुलनाकरणे कटाक्षाने टाळावे. या अलवार वयात आपल्यावर बसलेल्या चांगल्या-वाईट शिक्क्यांचे ओझे अनेकदा आपली पाठ आयुष्यभर सोडत नाही, असे अभ्यासांतून समोर आलेले आहे. या वयात सातत्याने कानावर पडलेली तुलनात्मक वाक्ये आपली घडण ईर्ष्येच्या किंवा नैराश्याच्या दिशेने नेऊ शकतात असेही अनेक अभ्यासकांनी नमूद केलेले आहे. आपल्या पायावर मुलांना सक्षमपणे चालायला शिकवायचे असेल, तर त्यांना कडेवरून खाली उतरवावे लागते. केवळ शरीरानेच नाही, तर मनानेही त्यांचा घट्ट धरलेला हात अलगद सोडावा लागतो.

 
 

-गुंजन कुलकर्णी 

(बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ)

७७७५०९२२७७

 [email protected]

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@