पोलीस व्हॅन-दुचाकी अपघातात दोघे ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

जळगाव - भुसावळ महामार्गावरील घटना, पोलीस कर्मचार्‍यांसह पाच जखमी

 
 
 
जळगाव, ७ सप्टेंबर
जळगावातील टी.व्ही.टॉवरसमोर दुचाकी अचानक समोर आल्याने पोलीस व्हॅनवर आदळली. प्रसंगी पोलीस व्हॅनने दुचाकीस वाचविण्याच्या प्रयत्नात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दोन पटली घेवून बाजूला कलंडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात दुचाकीस्वार ठार झाले असून पोलीसही गंभीर जखमी झाले.
 
 
भुसावळ न्यायालयातून कैदींना घेऊन जळगाव कारागृहात येणार्‍या पोलीस व्हॅनने जळगाव-भुसावळ महामार्गावरील टीव्ही टॉवरसमोर एका दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार दोघे ठार झाले. अपघातानंतर व्हॅनचालकाचा ताबा सुटल्यामुळे व्हॅन दोन पलट्या घेत रस्त्याच्या कडेला आडवी झाली. यात तीन पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता हा अपघात झाला. उमेश संजय वारुळे (वय २२, रा. चंदनवाडी, शनीपेठ) व जयमाला प्रभाकर गायकवाड (वय २६, रा. हिवरखेडा, ता.जामनेर) असे दुचाकीस्वार (एमएच १९, सीसी-८८३३) मृतांची नावे आहेत.
 
 
पोलीस व्हॅनचे चालक अनिल तायडे, प्रकाश विश्राम काळे (वय ५६, रा.पिंप्राळा), गयासोद्दीन कमरुद्दीन शेख (वय ५७, रा.पोलीस लाईन), दिलीप प्रकाश केंद्र (वय २९, रा.पोलीस लाईन) हे चार पोलीस कर्मचारी व भागवत दामू सूर्यवंशी (वय ५४, रा.साकळी, ता.यावल) हे कैदी असे पाच जण जखमी झाली आहेत. या शिवाय पोलीस व्हॅनमध्ये बसलेले गजानन दत्तू जाधव (वय २७), आकाश अरुण मोहने (२२) व आकाश रामचंद्र गोसावी हे तीन पोलीस कर्मचारी आणि सुरेश पंडित बोदडे (वय ३४, रा.विवरा, ता.रावेर), शेख कलीम शेख सलीम (वय २७, रा.भुसावळ), चंद्रभान शामराव सोनवणे (वय ३०, रा.शेळगाव), सदाशिव पंढरी पवार (वय २१, रा.बोदवड), आनंद महदू वानखेडे (वय २३, चुंचाळे, ता.यावल) व शेख अशरफ शेख चांद कुरेशी (वय ३०, रा.बोदवड) हे सहा कैदी यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. व्हॅनमध्ये सात पोलीस कर्मचारी व सात कैदी असे १४ जण बसलेले होते. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मुख्यालयातील पोलीस कर्मचारी ७ कैद्यांना व्हॅनने (एमएच १९ एम ०७१३) भुसावळ न्यायालयात कामकाजासाठी घेऊन गेले होते. कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजता पुन्हा कारागृहात येण्यासाठी निघाले.
 
दरम्यान, टीव्ही टॉवरजवळ समोरुन येणार्‍या उमेश याच्या दुचाकीस व्हॅनचालकाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा उजवा पाय मोडला जाऊन तो जागेवरच ठार झाला. तर मागे बसलेली जयमाला ही गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर व्हॅनचालकाचा ताबा सुटल्यामुळे व्हॅनने दोन पलटी घेत रस्त्याच्या कडेला आडवी झाली. त्यामुळे व्हॅनचालक तायडे यांच्यासह तीन पोलीस व एक कैदी जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक व एमआयडीसी पोलिसांनी तासाभरानंतर वाहतूक सुरळीत केली. जखमी व मृतांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली होती.
 
 
उपजिल्हाधिकारी मदतीला आले धावून
महसूल प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र भारदे यांचे वाहन तेथून जात असताना त्यांनी घटनेची माहिती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी त्यातील गंभीर जखमीला आपल्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यासोबत तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार (महसूल) लाडवंजारी, घनश्याम सानप, योगेश पाटील होते.
 
 
जयमालाला वाचवण्यासाठी प्रयत्न
अपघातात गंभीर जखमी झालेल्या जयमाला यांचा उजवा पाय मोडला होता. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अंबूबॅगच्या मदतीने त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तास डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. यानंतर नातेवाईकांनी दोन खासगी रुग्णालयातदेखील दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यामुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला.
@@AUTHORINFO_V1@@