शिवाजीनगरात चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

प्रशासनाकडून ८० कर्मचार्‍यांद्वारे परिसरात अबेटींग, फवारणी व धुरळणीच्या उपाययोजना सुरु

जळगावः
शहरातील शिवाजी नगरातील प्रभात मेडीकल चौकातील चार वर्षीय बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दोन दिवसांपासून आजारी असलेल्या या बालिकेचा गुरुवारी, ६ रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून ८० कर्मचार्‍यांद्वारे परिसरात अबेटींग, फवारणी व धुरळणीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.
 
 
घटनेची माहिती मिळताच डेंग्यू निर्मुलनाची मोहीम राबविणारे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शिवाजी नगरात जावून पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील भाजप नगरसेवक नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर उपस्थित होते. यावेळी सोनवणे यांनी तात्काळ याठिकाणी महापालिका मलेरिया विभागाचे सुनील पांडे, सुधीर सोनवाल यांच्यासह पथकाला बोलावून घेतले. यानंतर आ. सुरेश भोळे यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेवून महापालिका अधिकार्‍यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्यात.
 
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून कैलास सोनवणे यांच्या श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय मंडळाने शिवाजीनगर परिसरात उपाययोजना आखून धुरळणी केली. त्यांच्यासह मंडळाने परिसरात यापूर्वीही स्वच्छतेच्या उपाययोजना केल्या आहेत.
 
 
प्रशांत पाटील यांची साडेचार वर्षीय मुलगी जान्हवी ही बालवाडीत शिकत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी होती. प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला जळगावातील खासगी रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असतांना तिचा गुरुवारी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वडील प्रशांत पाटील हे इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतात तर आई घरकाम करते.
 
 
शहरात ६० संशयित रुग्ण
जळगाव शहरात मलेरिया विभागाकडून सुरु असलेल्या सर्व्हेक्षणानुसार सुमारे ६० डेंग्यू संशयित तापाच्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती मलेरीया विभागाचे सुनील पांडे यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@