नवव्या वर्षीच लेखिका झालेली यशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018   
Total Views |



लेखन कौशल्य हे ज्ञान संपादन, वाचन, अनुभवाने संपन्न होत जाते. पण, बाराबंकीतील आज चौदा वर्षांची असलेली यशी एका पुस्तकाची लेखिका आहे. अशा या यशस्वी लेखिकेविषयी...

 

समाजातील उलथापालथी, घडणाऱ्या घटना, अस्वस्थपणा, बदलते प्रवाह, परिस्थिती, राजकारण-समाजकारण अशा असंख्य गोष्टी कोणा एखाद्याच्या मनी रुंजी घालत असतात अन् त्यातूनच कोणाला तरी या गोष्टी कागदावर उतरविण्याची स्फूर्ती मिळते. या गोष्टी जी व्यक्ती कागदावर उतरवते, तिला आपण ‘लेखक’ म्हणतो, पण लेखक म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर कोणीतरी तरुण, युवक वा प्रौढ व्यक्तीच येते अन् अशातच एखादी नऊ वर्षे वयाची मुलगी तुमच्यासमोर लेखिका म्हणून आली तर? ज्या वयात मुले-मुली टेलिव्हिजनवरील कार्टून पाहण्यात आणि मोबाईलवरील गेम खेळण्यात गर्क असतात, त्याच वयात तिने इंग्रजी भाषेत पुस्तके लिहायला सुरुवात केली. यशी, यशी त्रिपाठी तिचे नाव. उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी येथे राहणाऱ्या यशीचे नाव चर्चेत आहे ते तिने लिहिलेल्या पुस्तकांमुळे अन् त्यातील घटनाक्रम-कथेमुळे. आज दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीच्या महापुरामुळे लहान मुले-मुली पुस्तकांपासून लांब जाताना दिसतात, त्याच काळात यशीचे साहित्यलेखन कौतुकास्पद वाटते. यशीने लिखाणाला सुरुवात कशी केली? तर तिने सुरुवात केली ती काव्यलेखनाने. आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींवर तिने आधी कविता केल्या, त्यानंतर कथांचा जन्म झाला अन् पुढे पुढे तर एक संपूर्ण पुस्तकच तिने लिहिले! अन् तेही वयाच्या केवळ नवव्या वर्षी सुरुवात करून आज चौदाव्या वर्षी नाव घेण्याएवढे प्रसिद्ध! सुरुवाती-सुरुवातीला यशीला विश्वास नव्हता की, आपण एखादे पुस्तक लिहू शकू. पण तिला तिच्या शिक्षकांनी लिखाणासाठी प्रोत्साहन दिले अन् तिचे हात लिहिते झाले.

 

यशीने लिहिलेली कविता, कथा अन् पुस्तक इंग्रजीत असून त्यातली पात्रे ही परकीयच आहेत. तिच्या पहिल्या पुस्तकाचे नाव आहे, ‘इन दॅट अवर ऑफ डिस्पोन्डेन्सी.’ पुस्तकाची कथा आहे, अशा एका पात्राची, जो आयुष्यातल्या एका क्षणी हताश-निराश झाला अन् त्यानंतर त्याने स्वतःच त्यावरचा उपाय-उत्तरही शोधले. सध्या नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या यशीसाठी दररोज लिखाणासाठी वेळ देणे शक्य होत नाही, जिकिरीचे ठरते. पण, लिखाणाप्रति असलेल्या उत्कटतेमुळे तिला त्यासाठी वेळ द्यावाच लागतो. यशीला हा वेळ मिळतो तो सुट्टीच्या दिवशी अथवा ज्या दिवशी कोणतेही काम नसेल अथवा काम संपले असेल तेव्हा. लिखाणाची आवड असूनही यशीला रोज लिहिता येत नाही, मग रविवारी सलग आठ ते नऊ तास लिहित राहून ती आपली आवड जोपासते-जसे काही आठवड्याभराच्या लिखाणासाठी लागणाऱ्या वेळेचे व्यवस्थापनच करते! शाळेत जाणारी मुलगी असल्याने साहजिकच शालेय अभ्यास, गृहपाठ ही कामेदेखील यशीच्या समोर उभी ठाकलेली असतातच अन् त्या व्यापातून कथा वा पुस्तक लिहिण्यासाठीचे विचार नेमके येतात कुठून? यावर यशी म्हणते की, “विचार एकाएकी येतात. असे नाही की प्रत्येकवेळी एकच मूड असेल, जर मनात एखादा विचार आला तर मोठ्या बहिणीशी आणि वडिलांशी चर्चा करते, त्यानंतर लिखाणाला सुरुवात करते, विचार करते की, कथा जिथे जाईल तिथे जाईल. अन् आता तर वेळेबरोबर विचारही परिपक्व होत आहेत.”

 

एवढ्या कमी वयात लेखिका झालेल्या यशीचे वडील एक आयएएस अधिकारी आहेत. आपल्या मुलीनेही शिकून-सवरून आपल्यासारखेच आयएएस अधिकारी व्हावे, अशी यशीचे वडील उदयभान त्रिपाठी यांची इच्छा होती. पण, मुलीची लिखाणातली आवड पाहून त्यांनी तिला आपल्या मनपसंत क्षेत्रात कारकीर्द घडविण्याचे स्वातंत्र्य दिले. बाराबंकीचे जिल्हाधिकारी अन् यशीचे वडील उदयभान त्रिपाठी यशीबद्दल सांगतात की, “आमची इच्छा नक्कीच अशी होती की, यशी प्रशासकीय सेवेत आल्यास चांगले होईल. पण मुलीची इच्छा लिखाण करण्याची आहे, त्यामुळे ती जे करू इच्छिते तेच तिने करावे.” पण, असे असले तरी शिक्षणही महत्त्वाचे असल्याने त्यात काही घोळ झाला, कमी गुण वगैरे पडले तर यशीचे वडील तिला दोन्ही गोष्टींत संतुलन राखण्याचा सल्ला तर देतातच, पण त्यावरून यशीला बोलणीही खावे लागतात. कधीकधी शालेय अभ्यासक्रमातल्या अन्य विषयांत यशीला कमी गुणही मिळाले, पण इंग्रजीत मात्र तिची कामगिरी सर्वात चांगली राहिली. तिच्या वडिलांनी सुरुवातीला यामुळे तिला लिखाणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला, पण तिची पुस्तक लेखनाची आवड पाहून त्यांनी आपली इच्छा तिच्यावर लादणे सोडून दिले. मुलीच्या एवढ्या कमी वयातील यशामुळे त्यांना अभिमानही वाटतो. यशी आपल्या शाळेतही आपल्या लिखाणाचे सादरीकरण करते, ते पाहूनही तिच्या वडिलांना आनंद वाटतो. अशा यशीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@