सुंबरान :एक नैसर्गिक कलाकृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |



सकाळच्या सूर्यकिरणांच्या अन् ढगांच्या लपंडावात ‘सुंबरान’ नावाची नैसर्गिक त्रिमिती कलाकृती पाहून सर्व अठराच्या अठराजणं दिग्मूढ झाले. डोंगरात पुण्यापासून 25 ते 30 किमी अंतरावर असलेले ‘सुंबरान’ म्हणजे अभिनव कला महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य रावसाहेब गुरव सर यांनी पाहिलेल्या स्वप्नांचे मूर्तस्वरूप होते. दऱ्याखोऱ्याच्या सुमारे एक ते सव्वा एकर जमिनीवर नैसर्गिक चढउतारांना बाधा न आणता कोकणातील जांभ दगड वापरून बांधलेली कलापूर्ण वास्तू...


वेळ दुपारी दोन वाजताची...आम्ही सारे म्हणजे सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे कलाध्यापक आणि अध्यापकेतर कर्मचारी पुणे-दौंड रोडला पोहोचण्याच्या दृष्टीने तयारीत होतो. माझी घाई होती, वेळेत निघण्याची. कारण, पुढे खंडाळा घाटात ट्रॅफिकजॅम झाले, तर पुढे पोहोचायला रात्रच होईल. साऱ्या च्याच मनांत उत्सुकता होती ‘सुंबरान’ कसे असेल याची...धीरगंभीर, परंतु सकारात्मक विचारांचे राहुल थोरात सर अगोदरच गाडीजवळ येऊन थांबले होते. हळूहळू आदेश, भगवान रवि, माडे, करिश्मा, भोगटे बाई हे सहकारी गाडीजवळ आले. बाकीचा स्टाफ येण्याची वाट पाहत होतो, तोही अध्यापक वर्ग आला. मग हेमंत नंतर राहुल साऊतकर सर पण आले. आमच्यातील एक अनुभवी सर गोविंदरावसुद्धा वेळेत गाडीजवळ पोहोचले. वाट पाहत होतो, ती संतोष क्षीरसागरांची आमचे प्रभारी अधिष्ठाता. त्यांच्या खांद्यावर सध्या जेजेचा धुरा आहे. त्यांचे मित्र आणि आमचे सहाध्यायी जोग सर हे वाशीला आमच्यात सामील होणार होते. सर्व गाडीत बसेपर्यंत तीन वाजले. आम्ही निघालो, ‘सुंबरान’च्या दिशेने...

 

भारतातील नावाजलेल्या ‘यशदा’च्या श्रीमान डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने सुमारे आठ वक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुंबरान’ हे शिबीर आमच्यासाठी होणार आहे, ते अनुभवण्याच्या उत्सुकतेपोटी गाडीत अठराजण बसलेले होते. डॉ. संतोष क्षीरसागर यांच्या सकारात्मकतेमुळे आणि 2010 पासूनच्या अशा शिबिराला सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी एकत्र यावेत, या अशा स्वप्नांना मूर्त स्वरूप आणण्याच्या माझ्या प्रयत्नांना यश येते आहे याचा आनंद माझ्या मनात होता. मी प्रा. रावसाहेब गुरव यांना फोन केला. “सर, आम्ही निघालोत,” रात्री किती लोकांची जेवणाची तयारी करावी लागणार, हे सांगणारा माझा फोन होता. त्यांनी आम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा देऊन आमच्या आनंदातील आत्मविश्वास आणि उत्साह वाढविला.सुमारे एक ते सव्वा तासाने जोग सर वाशीला आमच्यात सामील झाले आणि आम्ही थोड्याच वेळात द्रुतगती मार्गावर आलो. एरवी जरा अंतरच ठेवून बोलणारा स्टाफ, शिपाई, क्लार्क चरण पवार, सर्वचजण एकाच टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये हास्यविनोद करीत होते. प्रवासादरम्यान मध्ये आम्ही चहाला थांबलो. तिथे टीव्ही सुरू होता. भारताचे अत्यंत अभ्यासू, साहित्यिक आणि संसदपटू ज्यांचा विकसित-विकसनशील देशांनी आदर्श घेतला. त्या अटलजींच्या दु:खदनिधनाची बातमी ‘breaking news’च्या पट्टीसह दाखविली जात होती. चहा कंठाच्या खाली उतरला नाही. कंठ दाटून आला होता. “भावना आणि कर्तव्य यांच्यात गल्लत करायची नसते,” अटलजींच्याच एका भाषणातील वाक्य... आमचा पुढील प्रवास सुरू झाला.

 

लोणावळाच्या पुढे आलो. नंतर एक्सप्रेस वे संपला. कोंढाणा रोडच्या दिशेने हिंजवडी सिग्नलकडून आम्ही उजव्या रस्त्याला वळलो. आम्हाला मुंबई-हिंजवडीला प्रवासासाठी जेवढा वेळ लागला, तेवढा वेळ घोटावडे ते हवेली फाटा या रस्त्यावरच लागला. चंद्रभूमी कशी आहे? हे त्या ‘नासा’लाच माहिती. परंतु, आम्ही सारेच कलामय मनाचे असल्याने चांद्रभूमीचे ‘हिज्युअल’ आम्ही त्या रस्त्यावर अनुभवत होतो. ‘नासा’ने काय भूमी शोधली ते त्यांनाच माहिती. आम्हा प्रवासी शूर संशोधकांची मने मात्र त्या रस्त्याने पूर्ण नासवली. थकवा आला होता. पाच ते दहा किमी दूर राहिलेले ‘सुंबरान’ शेकडो मैल दूर असल्यासारखे जाणवत होते. अखेर तो क्षण आलाच...आमचा सुंबरानपर्यंतचा प्रवास संपला होता. आम्ही सुंबरानला रात्री साडेनऊच्या दरम्यान पोहोचलो. पाऊस त्याचे अस्तित्व दाखवत होता. ‘सुंबरान’चे कुत्रे म्हणजे ‘ग्रामसिंह’ आसमंत दणाणून सोडत होते. धीरगंभीर आवाजात ‘ग्रामसिंहां’ना शांत बसण्याचा आदेश रावसाहेबांनी दिला आणि आम्हा सर्वांना ‘सुंबरान’च्या राजाचं दर्शन झालं. डोक्यावर कानटोपीसारखं थंडीपासून बचाव करणारं काहीतरी, अंगात मोठा स्वेटर, हातात ‘ग्रामसिंहा’च्या खाद्याचं पाकीट... आमचं स्वागत करून औपचारिक ओळख साऱ्या सहकाऱ्याशी करून दिल्यानंतर सगळे त्यांच्या त्यांच्या निवासाच्या खोल्यांमध्ये रवाना झाले. 10-15 मिनिटांनी आमची जेवणाची सोय एका कक्षात केली असल्याचे सांगण्यात आलेआम्ही सारे अगदी पोटभर जेवलो. थकणं-प्रवास आणि भूक या त्रिगुणांनी जेवणाच्या रुचकरपणात अधिकच भर टाकली. भुकेपोटी जेवण पण अधिकच पोटात सरकले. लाईट असल्यामुळे रात्रीच्या वेळी ‘सुंबरान’बद्दल फारसं कुणाला काही वाटलं नाही. सारे विश्रांतीसाठी आपापल्या खोल्यांमध्ये गेले. सकाळ झाली. व्यवस्था चोख असल्याने प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या वेळेत स्नानादी कर्मे पूर्ण केली. चहा-नाश्ता ‘ताज’ला काय करता? असा होता आणि सकाळच्या सूर्यकिरणांच्या अन् ढगांच्या लपंडावात ‘सुंबरान’ नावाची नैसर्गिक त्रिमिती कलाकृती पाहून सर्व अठराच्या अठराजणं दिग्मूढ झाले. डोंगरात पुण्यापासून 25 ते 30 किमी अंतरावर असलेले ‘सुंबरान’ म्हणजे अभिनव कला महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य रावसाहेब गुरव सर यांनी पाहिलेल्या स्वप्नांचे मूर्तस्वरूप होते. दऱ्या खोऱ्या च्या सुमारे एक ते सव्वा एकर जमिनीवर नैसर्गिक चढउतारांना बाधा न आणता कोकणातील जांभ दगड वापरून बांधलेली कलापूर्ण वास्तू की, जिच्यात एक सेमिनार हॉल, गेस्टरूम ऑफीस स्टुडिओ, गेस्टरूम्स प्रदर्शन कक्ष, बैठक व्यवस्था, बाथरूम-शौचालय, स्वयंपाकघर; एवढंच नव्हे, तर दालनं, पाहुण्यांची वेगळी सोय असलेल्या पंचतारांकीतला लाजवतील अशा खोल्या आणि बाहेर शेकडो फुलझाडे मोठमोठी शोभा वाढविणारी झाडे, लॉन, पाण्याचे तळे, त्याला सरोवरच म्हणा ना, प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी सुंदर रस्ते, त्यांच्या बाजूला फुलझाडे, हे कमीच की काय, पारंपरिक आणि आशयगर्भ तसेच फारसे पाहण्यात न येणाऱ्या वस्तुंची रचना, भिंतीच्या रस्त्यांच्या खोल्यांच्या सजावटीसाठी केलेली. मग पितळे बंब असले, तर तांब्याचं घंगाळ असेल, अगदीच दुर्मिळ वस्तुंनी नैसर्गिकतेला सजविण्यासाठी केलेले संयोजन भासत होते.आमची दोन दिवस आठ तज्ज्ञांनी घेतलेलीकार्यशाळा ‘सुंबरान’मध्ये प्रथमच होती. त्या प्रत्येक तज्ज्ञाला पुण्यात राहूनही ‘सुंबरान’ माहिती नव्हतं. मी उगाचंच ‘हिरो’ झालो.शेपाळ सरांमुळे आम्हाला ‘सुंबरान’ कळलं, असं जरी सारे म्हणत होते तरी ‘सुंबरान’ ही जादुई नैसर्गिक अविष्कारांनी मुक्त नगरी आहे. त्या नगरीचा कलासम्राट ज्यांच्या नावातचरावसाहेब आहे. त्यांचं स्वप्न मूर्त स्वरूपात आणलं, त्या त्यांच्या मुलींपैकी एकीचं नाव चित्रा. चित्रा आणि तिच्या बहिणीने तीर्थरूप वडिलांना दिलेली ‘सुंबरान’ नावाची भेट. फारच अद्भुत... कलाकारांच्या भावनांना मुक्त संचार करायला लावणारे कलाशक्तीपीठच आहे.

- प्रा. गजानन शेपाळ

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@