१६ रस्त्यांवर 'फेरीवाला क्षेत्र' लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई: वाढती लोकसंख्या आणि वाढती गर्दी अशातच जागा मिळेल तिथे आपलं बस्तान बसवणारे फेरीवाले यांच्या संख्येवर येत्या काळात नियंत्रण येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचा आधार घेत कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरातील पदपथ मोकळे ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे या भागांतील ६ हजार फेरीवाल्यांपैकी ४ हजार फेरीवाल्यांना हद्दपार व्हावे लागणार आहे.
 

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत या परिसरात केवळ १६ रस्त्यांवरील काही भाग ‘फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. तेथे केवळ २८०० फेरीवाल्यांनाच बसण्याची परवानगी मिळणार आहे. कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरात मोठय़ा संख्येने कार्यालये, पर्यटनस्थळे आहेत. इथे दररोज कार्यालयात येणारे कर्मचारी आणि पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येणारे पर्यटक यांची संख्या मोठी आहे.

 

मुंबईमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यासाठी फेरीवाल्यांना अर्जाचे वाटप करण्यात आले. फेरीवाल्यांनी अर्ज भरून दिल्यानंतर त्यांचे सव्‍‌र्हेक्षण करण्यात आले. कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील ७८४५ फेरीवाल्यांना अर्ज देण्यात आले होते. त्यापैकी ६२९८ फेरीवाल्यांनी पालिकेकडे अर्ज भरून सादर केले. या सर्वेक्षणात १९२१ फेरीवाले अपात्र ठरले आहेत.

 

'पथविक्रेता अधिनियमानुसार या परिसरातील १६ रस्त्यांवरील भागांची ‘फेरीवाला क्षेत्रा’साठी निवड करण्यात आली आहे. या परिसरात मोठय़ा संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांना पदपथावरून चालताना त्रास होऊ नये या बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.' असे ‘ए’ विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@