दिग्विजय सिंह यांना त्यांची जागा दाखवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
कॉंग्रेसमध्ये काही नेते आपल्या कृतीने पक्षाला वारंवार अडचणीत आणत असतात. अशा नेत्यांची यादी खूप मोठी आहे. पण, या यादीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर आघाडीवर आहेत. वाचाळपणामुळे कॉंग्रेसला वारंवार अडचणीत आणणारे दिग्विजय सिंह आता नक्षलसमर्थनामुळे चर्चेत आले आहेत. कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून दिग्विजय सिंह ओळखले जातात. मुळात दिग्गीराजा म्हणून ओळखले जाणारे दिग्विजय सिंह यांचे व्यक्तिमत्त्व हे वादग्रस्त आहे. ते कधी काय बरळतील, हे त्यांनाही माहीत नसते!
 
 
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सलग 10 वर्षांचा कार्यकाळ मिळूनही दिग्विजय सिंह यांनी मध्यप्रदेशच्या विकासासाठी काहीच केले नाही. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजांच्या बाबतीत मध्यप्रदेशला मागास ठेवत त्याचा बिमारू राज्यांच्या यादीत समावेश करण्याचे एकमेव काम दिग्विजय सिंह यांनी केले. त्यामुळे मध्यप्रदेशच्या जनतेने त्यांची राज्यातून हकालपट्टी केली. अंगी कोणतेही कर्तृत्व नसताना चर्चेत राहण्याचे कसब मात्र दिग्विजय सिंह यांना साधले आहे.
 
 
कॉंग्रेसच्या नेतृत्वालाही, पक्षात अनेक कार्यक्षम नेते असताना दिग्विजय सिंह आणि मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या नाठाळ नेत्यांबद्दल प्रेम का वाटते, हे अनाकलनीय आहे. पक्षाला अनेक वेळा अडचणीत आणूनही कॉंग्रेसच्या नेतृत्वाने कधी दिग्गीराजा यांच्यावर कारवाई केल्याचे स्मरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्यामुळे कॉंग्रेसने, माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना नाही म्हणायला पक्षातून काही महिन्यांपूर्वी निलंबित केले होते, पण त्यांच्यावरची निलंबनाची कारवाई नुकतीच मागे घेत त्यांना ससन्मान पक्षात परत घेतले. पण, दिग्विजय सिंह यांच्यावर मात्र कारवाई करण्याची हिंमत कॉंग्रेसच्या नेतृत्वाला कधी दाखवता आली नाही. कदाचित दिग्गीराजा जे करतात ते चुकीचे वा पक्षाच्या हिताच्या विरोधात असल्याचे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला वाटत नसावे.
 
 
पुणे पोलिसांनी कॉम्रेड प्रकाश आणि कॉम्रेड सुरेंद्र या दोन नक्षल नेत्यांमधला पत्रव्यवहार जाहीर केला, त्यात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. देशात नक्षल कारवाया वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन या पत्रातून एक नक्षल नेता दुसर्या नक्षल नेत्याला करत आहे. विशेष म्हणजे हा पत्रव्यवहार जवळपास वर्षभरापूर्वीचा आहे. मात्र, या वर्षभराच्या काळात दिग्गीराजा यांनी कधीच आपला मोबाईल क्रमांक नक्षलवाद्यांच्या पत्रात कसा आला, असा प्रश्न उपस्थित केला नाही वा तो मोबाईल क्रमांक आपला नाही, याचा इन्कारही केला नाही.
 
नक्षलवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे कारस्थान रचल्याची पोलिसांची माहिती आहे, या संदर्भात पोलिसांजवळ भक्कम कागदोपत्री पुरावेही आहेत. अशा नक्षलवाद्यांच्या पत्रव्यवहारात कॉंग्रेसच्या एका नेत्याच्या नावाचा उल्लेख येत असेल, तर तो प्रकार अतिशय गंभीर म्हटला पाहिजे. हा साधा गुन्हा नाही तर देशद्रोहाचाच प्रकार आहे. त्यामुळे या मुद्यावर पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई केली पाहिजे. जे दोषी असतील त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. अगदी गरज पडली तर दिग्विजय सिंह यांनाही अटक केली पाहिजे. म्हणजे कॉंग्रेस नेते आपल्या राजकीय फायद्यासाठी किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात, हे देशाला समजून येईल.
 
दहशतवादी आणि नक्षलवादी यांच्याबद्दल दिग्गीराजा यांचे प्रेम आजचे नाही तर जुने आहे. 2008 मध्ये राजधानी दिल्लीत बाटला हाऊस येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत इंडियन मुजाहिदीनचे दोन दहशतवादी मारले गेले होते, मोहनचंद शर्मा नावाचा एक बहादूर पोलिस अधिकारीही त्यात शहीद झाला होता. बाटला हाऊस चकमक झाली तेव्हा केंद्रात आणि दिल्लीतही कॉंग्रेसचे सरकार होते. मात्र, या चकमकीवर दिग्विजय सिंह यांनी 8 वर्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. ही चकमक बनावट होती, हे समजायला दिग्विजय सिंह यांना आठ वर्षे लागत असतील, तर त्यांच्या आयक्यूवर शंका घ्यायला पाहिजे.
विशेष म्हणजे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ही चकमक योग्य असल्याचे तसेच चकमकीत मारले गेलेले इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी असल्याचे वारंवार स्पष्ट केले होते. जी व्यक्ती स्वत:च्या पक्षाला आणि सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करायला मागेपुढे पाहात नाही, ती पंतप्रधानाच्या हत्येच्या कारस्थानात नक्षलवाद्यांना मदत करणार नाही, याची खात्री कोण देणार? त्या वेळी कॉंग्रेसने दिग्विजय सिंह यांच्या मागणीपासून स्वत:ला दूर ठेवले होते.
 
 
कॉंग्रेसच्या नेत्यांनी याआधी नीचपणाची पातळी गाठली होती, आता ते पंतप्रधानांच्या हत्येच्या कारस्थानात नक्षलवाद्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करत आहेत. त्यामुळे दिग्विजय सिंह मुद्यावर कॉंग्रेसने विशेषत: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण दिग्विजय सिंह यांची ओळख राहुल गांधी यांचे राजकीय सल्लागार अशी आहे. दिग्विजय सिंह यांच्या नक्षलसमर्थक भूमिकेशी कॉंग्रेस पक्ष तसेच अध्यक्ष म्हणून आपण सहमत आहात का, हे राहुल गांधी यांनी सांगितले पाहिजे.
 
 
नक्षलवाद्यांचे समर्थक असलेले दिग्विजय सिंह कॉंग्रेस पक्षात एकटे नाही, त्यांच्यासारखे अनेक जण आहेत. एखाद्या नक्षलसमर्थक नेत्याला अटक झाली की, कॉंग्रेसच्या कोणत्या ना कोणत्या नेत्याने त्याची तरफदारी केलीच पाहिजे. विनायक सेन यांना कॉंग्रेस सरकारच्या काळातच देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, नंतर कॉंग्रेसनेच त्यांची योजना आयोगावर तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महेश राऊत याला भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संपुआ सरकारच्या कार्यकाळातही त्याला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती, त्या वेळी कॉँग्रेसचे अन्य एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून महेश राऊत यांना क्लीन चिट दिली होती.
ही क्लीन चिट जयराम रमेश यांनी कशाच्या आधारावर दिली? जयराम रमेश यांची क्लीन चिट खरी असेल, तर महाराष्ट्र सरकारची कारवाई चुकीची म्हणावी लागेल आणि महाराष्ट्र सरकारची कारवाई बरोबर असेल, तर जयराम रमेश यांची तरफदारी चुकीची म्हणावी लागेल. पोलिस अनेकवेळा निरपराध लोकांना पकडतात, त्यांच्या सुटकेसाठी कॉंग्रेस नेत्यांनी आवाज उठवल्याचे कधी दिसत नाही. नक्षलवाद्यांना वा त्यांच्या समर्थकांना अटक झाली की, कॉंग्रेस नेत्यांना असा प्रेमाचा उमाळा का येतो, ते देशाला समजले पाहिजे.
 
 
 
देशाला खरा अंतर्गत धोका नक्षलवाद्यांपासून असल्याचे कॉंग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही वारंवार स्पष्ट केले असताना, दिग्विजय सिंह यांच्यासारखे नेते नक्षलवाद्यांचे समर्थन करतात आणि कॉंग्रेस पक्ष ते खपवून घेतो, याचे आश्चर्य वाटते. मुळात कॉंग्रेस पक्षाला देशहिताच्या कोणत्याही मुद्यावर ठोस भूमिका घेता आली नाही. कॉंग्रेसच्या अशा भूमिकेमुळे कॉंग्रेस पक्षाचे तर नुकसान झालेच, पण देशाचेेही नुकसान झाले. मात्र, कॉंग्रेस पक्षाला शहाणपण काही आले नाही आणि पक्षाची सद्य:स्थिती पाहिली तर येईल, असे वाटतही नाही.
 
 
जेव्हा पक्षाच्या नेत्याला स्वत:ची बुद्धी नसते, दुसर्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ त्याच्यावर येते, तेव्हा दिग्विजय सिंहसारख्या नेत्यांचे फावत असते. पोलिस आपल्या पद्धतीने दिग्विजय सिंह यांच्यावर कारवाई करतीलच, पण कॉंग्रेस पक्षानेही त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी केली पाहिजे. दिग्विजय सिंह ही पक्षासाठी अॅसेट नाही तर लायबिलिटी आहे, हे कॉंग्रेस पक्षाला आणि त्याच्या नेत्याला समजत नाही, हेच कॉंग्रेस पक्षाचे आणि देशाचेही दुर्दैव आहे!
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@