उडत्या तबकड्या-पुन्हा एकदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

उडत्या तबकड्यांविषयी सरकारी गोटातून कोणतीही प्रतिक्रिया आजतागायत व्यक्त करण्यात आलेली नाही आणि आता निवृत्त वैमानिकच आपले अनुभव सांगत आहेत. एकंदरीत गूढ कायमच आहे.

 

नुकतीच विविध देशांमधल्या काही निवृत्त वैमानिकांची एक बैठक अमेरिकेत झाली. त्यांनी उडत्या तबकडीसंबंधीचे स्वत:चे अनुभव पुन्हा एकवार सांगितले आणि अखेर सर्वांनी मिळून अमेरिकन सरकारला अशी विनंती केली की, त्याने हा विषय बंद न करता जारीने चालू ठेवावा. याविषयीचं सत्य लोकांना कळू द्यावे. या निवृत्त वैमानिकांमध्ये सगळ्यात अग्रगण्य होता फाईफ सीमिंग्टन. हा अमेरिकन हवाई दलातला निवृत्त वैमानिक तर आहेच, पण तो अरायझोना या प्रांताचा माजी राज्यपालदेखील आहे. सीमिंग्टन म्हणतो, “मी स्वत: १९९७ साली उडती तबकडी पाहिलेली आहे. सरकारने याबद्दलचे संशोधन पुन्हा चालू करावं. इतकंच नव्हे, तर जगभरच्या सर्व सरकारांनी अशा प्रकारचे संशोधन चालू करावं. कारण आपापल्या देशाची हवाई सुरक्षा हा प्रत्येकाचा हक्क आहे.”

 

जेम्स प्रिन्स्टनचा अनुभव तर विलक्षणच आहे. प्रिन्स्टन म्हणतो, “आम्ही वुडब्रिज या ब्रिटिश विमानतळावर तैनात असताना मी उडती तबकडी प्रत्यक्ष पाहिली. तिला स्पर्श केला. एका रात्री विमानतळालगतच्या रानातील एका मोकळ्या बखळीत उजेड दिसला म्हणून आम्ही तिथे गेलो. एक विलक्षण, त्रिकोणी आकाराचं विमान किंवा यान आमच्या दृष्टीस पडलं. निळा आणि पिवळा प्रकाश त्या यानाभोवती फिरत होता. त्या यानाच्या एका बाजूला विविध प्रकारची चिन्हं होती. सगळ्यात मधोमध एक त्रिकोण चिन्ह होतं. मी त्या यानाला स्पर्श केला. एखाद्या धातूच्या भांड्यासारखा तो स्पर्श मला भासला.” “पण यानंतर पुढे काहीच घडेना. त्या यानाचा दरवाजा किंवा एखादी पारदर्शक काच, जिच्यातून आतले लोक आम्हाला बघू शकतील, आम्ही आतल्या लोकांना पाहू शकू, असं काहीच कुठे दिसेना. मिनिटांमागून मिनिटं गेली. आमच्या तुकडीतले आणखीही लोक तिकडे गोळा झाले. या यानाचं आता काय करावं, याबद्दल आमच्यात बोलणी सुरू झाली. अशी सुमारे ४५ मिनिटं गेली आणि अचानक यानाभोवती फिरणारा निळा-पिवळा प्रकाश तीव्र होऊ लागला. मग अचानक आमच्या डोळ्यांदेखत ते यान कमालीच्या वेगाने उडाले. मला वाटतं, हे दृश्य पाहणारे आम्ही किमान ऐंशी लोक असू.”

 

इराणी वैमानिक परवीझ जाफरी याचा अनुभवही थरारक आहे. १९७६ साली परवीझ जाफरी आपल्या जेट झुंजी विमानातून उड्डाण करत असताना त्याने राजधानी तेहरानवर ‘यूफो’ म्हणजे अन्आयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेट- अज्ञात उडती वस्तू पाहिली. लाल, हिरवी, नारिंगी आणि निळी प्रकाशवलयं तिच्याभोवती झगमगत होती. जाफरीने त्या वस्तूवर सरळ हल्लाच चढवला, पण त्याचा रेडिओ बंद पडला. त्याची हत्यारं जाम झाली. थोडक्यात, त्याच्या विमानातली विद्युतचुंबकीय, यांत्रिक रचना बंद पडली...आणि पाहता-पाहता ‘यूफो’ गायब झाली. एअर फ्रान्स कंपनीचा वैमानिक जाँ चार्ल्स ड्युबॉक म्हणतो, “१९९४ साली पॅरिसच्या आसमंतात, मी आणि माझ्या केबिनमधल्या सहकार्‍यांनी एक विशाल उडती तबकडी पाहिली. तिचा व्यास किमान एक हजार फूट असावा. आम्ही आमच्या डोळ्यांसमोर ती एवढी मोठी तबकडी प्रत्यक्ष पाहत होतो. पण आमच्या विमानाच्या रडारवर तिची कसलीही खूण दिसत नव्हती आणि मग काही सेकंदातच ती नाहीशी झाली.

 

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे केंद्रीय हवाई प्रशासन हे सरकारी खातं अमेरिकेतल्या सर्व हवाई हालचालींचं नियंत्रक खातं. त्या खात्याचा एक माजी अधिकारी जॉन कॅलघान म्हणतो, “युफोच्या संदर्भातल्या कोणत्याही चौकशा टाळण्याकडे आमच्या खात्याचा कल असतो. या संदर्भात मी एकदा सी. आय. ए. च्या एका अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता तो म्हणाला की, “आम्ही युफोचं अस्तित्व नाकारणारच, कारण आम्ही युफो अस्तित्वात आहेत असं मान्य केलं, तर अमेरिकन जनतेत घबराट उडेल.” अमेरिकेच्या दक्षिणेकडचं न्यू मेक्सिको हे राज्य. त्याच्या आग्नेय भागात सिएरा ब्लँका या डोंगररांगेच्या पूर्वेच्या मैदानी भागात रॉजवेल नावाचं मध्यम दर्जाचं शहर आहे. १९४७ सालच्या जुलै महिन्यात तिथे एक विलक्षण घटना घडली. रॉजवेलच्या लष्करी विमानतळावर तैनात असलेला एक लष्करी अधिकारी फ्रँक कॉफमान आणि त्याचे काही सहकारी त्या रात्री जीपमधून लष्कराच्या मेसकडे चालले होते. एवढ्यात झगझगीत प्रकाशाने त्यांचं लक्ष आकाशाकडे वेधलं गेलं. लंबवर्तुळाकार आकाराची आणि अत्यंत तेजस्वी अशी एक वस्तू आकाशात उडत होती. नक्कीच ते कोणत्याही प्रकारचं विमान किंवा वेदर बलून नव्हतं. आश्चर्याने थक्क होऊन, ते काय असावं, असा अंदाज करत कॉफमान आणि त्याचे दोस्त त्या वस्तूकडे पाहतायत तोवर आणखी एक आश्चर्य घडलं. ती उडती वस्तू अतिशय वेगाने जमिनीकडे झेपावू लागली. झेपावू लागली कसली, कोसळलीच ती! फ्रँक कॉफमानने कमालीच्या वेगाने आपली जीप त्या दिशेला दामटली.

 

उडत्या तबकडीचं हे कॅश लँडिंग पाहणारे फक्त कॉफमान आणि त्याचे दोस्तच नव्हते. विमानतळ परिसरातल्या अनेकांनी ते पाहिलं होतं. त्यामुळे सर्वच बाजूंनी लष्करी वाहनं त्या दिशेला सुटली. लष्करी मदत पथकाच्या जवानांनी त्या अपघातग्रस्त यानातून पाच देह बाहेर काढले. कॉफमान सांगतो, “परग्रहावरच्या चित्रविचित्र मानवाप्रमाणे ते नव्हते. अगदी आपल्यासारखेच होते. लेफ्टनंट वॉल्टर हाऊट हा त्यावेळी रॉजवेल लष्करी ठाण्याचा जनसंपर्क अधिकारी होता. “एक उडती तबकडी रॉजवेल हवाई क्षेत्रात कोसळली असून ती ताब्यात घेण्यात आली आहे,” अशा आशयाची एक प्रेसनोट त्याने वृत्तपत्रांना पाठवूनसुद्धा दिली. पण रातोरात काहीतरी चक्रे फिरली. हा संपूर्ण विषय. अमेरिकन गुप्तचर खातं सी. आय. ए. ने आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये छापून आलं की, एक वेदर बलून म्हणजे हवामान निरीक्षक फुगा कोसळला.

 

१९९७ साली या घटनेला ५० वर्षे झाली तेव्हा अमेरिकन सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केलं, “प्रस्तुत घटना ही रहस्यमय उडती तबकडी नसून सी. आय. ए. काहीतरी उच्च शास्त्रीय प्रयोग करत होती, त्याचा भाग होता,” असं पत्रकात म्हटलं होतं. अनेकांची अशी अटकळ होती की, अमेरिकेची सी. आय. ए. आणि रशियाची के. जी. बी. एकमेकांवर मात करण्यासाठी कायमच काहीतरी भन्नाट उच्चस्तरीय शास्त्रीय संशोधन करत असत. युफो हा त्यातलाच प्रकार असावा, परंतु सोव्हियत रशिया कोसळल्यावर तिथल्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं की, आम्ही असे कोणतेही प्रयोग चालवलेले नव्हते. उलट युफोबद्दल आम्हीही तुमच्याचसारखे चाचपडत आहोत. वरील पत्रकामुळे या बाबतीत, अखेर याच्या मुळाशी सी. आय. ए. च आहे तर, असं सर्वसामान्य लोकांना वाटतं न वाटतं तोच, अमेरिकेतल्या हुशार वार्ताहरांनी सरकारला पेचात पकडलं.. “जर तुम्ही म्हणता की, युफो हा सी. आय. ए. चा काहीतरी उच्चस्तरीय शास्त्रीय प्रयोग होता, तर मग आता आम्हाला त्याचा पूर्ण तपशील द्या. हा नेमका काय प्रयोग होता? त्याचे उद्दिष्ट काय होतं? त्यावर खर्च किती झाला? त्याचे उद्दिष्ट कितपत सफल झालं? हे सगळं आम्हाला म्हणजे जनतेला समजलं पाहिजे. तो आमचा हक्क आहे. रॉजवेल घटनेला ५० वर्ष झाली म्हणून तुम्ही पत्रक काढून याबाबतचं सत्य सांगत आहात, तर मग आम्हाला त्या घटनेबाबतची सगळी अस्सल कागदपत्रे तपासायला मिळाली पाहिजेत.” यावर सरकारी गोटातून कोणतीही प्रतिक्रिया आजतागायत व्यक्त करण्यात आलेली नाही आणि आता निवृत्त वैमानिकच आपले अनुभव सांगत आहेत. एकंदरीत गूढ कायमच आहे!

 

दुर्लक्ष, अनास्था

 

 
 

भूगोल हा आपल्याकडचा एक अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित असा विषय आहे. अर्थात यात आश्चर्य काहीच नाही. मातृभाषा किंवा राष्ट्रभाषा हे विषयसुद्धा नाईलाज म्हणून घेतले जातात, तिथे भूगोलाची काय कथा? सगळ्यांची धाव पी.सी.एम. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सकडे! म्हणजे त्या विषयातलं ज्ञान मिळवण्यासाठी नव्हे; तर घोकंपट्टी किंवा अन्य झटपट मार्गाचा अवलंब करून भरघोस गुण मिळविण्यासाठी. मगच वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. बरं, डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचं ते कशासाठी? स्वत:बरोबर समाज आणि राष्ट्र यांनाही मोठं करण्यासाठी? छे, छे! खुळे की काय तुम्ही? डॉक्टर किंवा इंजिनियर झालं की, बदाबदा पैसा मिळवता येतो! परदेशी म्हणजे मुख्यत: अमेरिकेत जायची संधी मिळू शकते. अमेरिका म्हणजे काय; पृथ्वीवर अवतरलेला स्वर्गच तो! एकदा अमेरिकन नागरिकत्व मिळालं की, मानवी जन्माला आल्याचं सार्थक झालंथोडक्यात, पैसा आणि प्रतिष्ठा हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे नि ते मिळवण्याच्या दृष्टीने भाषा, इतिहास, भूगोल वगैरे विषय कुचकामी आहेत. स्वतंत्र भारताच्या नेत्यांनी प्रथमपासूनच शिक्षण या विषयाला दुय्यम-तिय्यम स्थान दिल्याचे हे सगळे परिणाम आहेत. ज्या देशांना आपण प्रगत, विकसित, समृद्ध देश मानतो; त्या युरोप-अमेरिकेत अशी स्थिती नाही. शिक्षणाला तिथे फार महत्त्व दिलं जातं. असंख्य विद्या, कला, शास्त्र यांना तिथे सारखाच मान दिला जातो. आधुनिक काळाबरोबर राहण्यासाठी विज्ञान आणि गणित यांची जेवढी आवश्यकता आहे, तेवढीच विविध भाषा, कला यांची आवश्यकता, आधुनिक मानव समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा होण्यासाठी आहे; याची नेमकी जाण त्यांना आहे.

 

भूगोल म्हणजे वेगवेगळ्या देशांचे, प्रांतांचे अन् जिल्ह्यांचे किचकट नकाशे आणि तिथली पिकं एवढंच नव्हे. एखादा देश, तिथले लोक, त्यांची भाषा, संस्कृती, जीवन, सण, उत्सव, परंपरा असा समग्र अभ्यास म्हणजे भूगोल. म्हणजेच भूगोल विषयात नकाशाशास्त्र, हवामानशास्त्र, समाजशास्त्र, भाषा, इतिहास, राज्यव्यवस्था असे कित्येक विषय येऊ शकतात. ‘नॅशनल जिओग्राफिक’ हे अमेरिकेतून निघणारे, शंभरी ओलांडलेले अत्यंत प्रख्यात असे मासिक आहे. जगभर सर्वत्र ते वाचले जाते. एखाद्या देशाच्या भूगोलात किती विविध कोनांमधून डोकावता येते, याचा नॅशनल जिओग्राफिक- हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. त्यांची दूरदर्शन वाहिनीदेखील अत्यंत सुंदर आणि विविध प्रकारच्या माहितीने खच्चून भरलेली असते. ‘नकाशा भरा’, हा भूगोलाच्या शालेय प्रश्नपत्रिकेतला एक कंटाळवाणा प्रश्न असतो, पण नॅशनल जिओग्राफिकच्या नकाशांमुळे वाचकाला जगभरच्या विविध देशांचे, भूविभागांचे नकाशे पाहण्याचा, अभ्यासण्याचा छंद जडतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर दोन तृतीयांश पाणी आहे नि एक तृतीयांश जमीन त्या पाण्यावर तरंगते आहे; या शब्दांचा अर्थ नकाशा पाहिल्यावर झटकन कळतो आणि पक्का लक्षात राहतो.

 

प्राचीन भारतीयांकडून अरबांनी बीजगणिताचं ज्ञान घेतलं आणि त्यांच्याकडून ते युरोपला मिळालं; या ऐतिहासिक विधानाचा अर्थ नकाशात भारत, अरबस्तान आणि युरोप यांची स्थानं पाहिल्यावर अधिक कळतो. ब्रिटिश बेटं ही युरोपच्या वायव्य कोपऱ्यातली, गारढोण उत्तर समुद्रातली नापीक बेटं होती. अन्य युरोपीय देश ब्रिटनपेक्षा सुपीक नि समृद्ध होते, हे युरोप खंडाचा नकाशा पाहिला की चटकन ध्यानी येते. अमेरिका हा किती अवाढव्य देश आहे; त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे विमानाने जायला देखील आठ-आठ तास लागतात, म्हणजे काय, हे नकाशा पाहिला की, लगेच लक्षात येते. मुंबईहून पुण्याला जाताना प्रथम सूर्य उजवीकडे असतो. कल्याण सुटल्यावर तो डावीकडे येतो; हे कसे घडते ते नकाशा पाहिल्यावर पटकन कळते. आता बऱ्याच लोकांचे असल्या किरकोळ, अनुत्पादक गोष्टींकडे लक्षच नसते, हा भाग सोडा. काही लोक पेंगत असतात. काही लोक पेपर-मासिकांतली राजकारणी, नटनटी यांची लफडी वाचत असतात. काही शेअरबाजाराची चर्चा करत असतात. ज्यांना यातलं काही जमत नाही, ते कर्जत स्टेशन येतं कधी नि गरमागरम बटाटेवडा येतो कधी, याची वाट पाहत असतात. मुंबई हे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरचे एक महत्त्वपूर्ण आर्थिक, सामाजिक नि नाविक केंद्र आहे; पुणे हे मुंबईच्या पूर्वेला वसलेले महत्त्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक नि लष्करी केंद्र आहे; याची त्या बहुसंख्य प्रवाशांना जाणीवही नसते नि पर्वा तर अजिबात नसते. अशा लोकांचा समाज आणि राष्ट्र महान कसे होणार?

 

समृद्ध आणि बलवान असलेले अमेरिकन राष्ट्रही आता आमच्या पंगतीत येऊन बसू पाहात आहे. ‘नॅशनल जिओग्राफिकमासिक ज्या संस्थेतर्फे प्रसिद्ध केले जाते तिने अलीकडेच, अमेरिकन नागरिकांच्या भूगोलविषयक ज्ञानाची तपासणी करणारा एक सर्व्हे केला. वय वर्ष १८ ते २४ या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना जागतिक भूगोलाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. ६९ टक्के मुलांना इंग्लंड, ६५ टक्क्यांना फ्रान्स, ५८ टक्क्यांना जपान हे देश कुठे आहेत, हे माहिती नाही. राजकीयदृष्ट्या हे देश अमेरिकेचे मित्र समजले जातात. २९ टक्के मुलांना पॅसिफिक महासागर माहीत नाही; तर ११ टक्के मुलांना खुद्द अमेरिका कुठे आहे, हेच माहीत नाही! इराण, इराक आणि अफगाणिस्तान हे सध्या अमेरिकेतले बहुचर्चित विषय आहेत. सर्व प्रसारमाध्यमांतून या तीन देशांबद्दल सतत काहीतरी बोलले-लिहिले जात असते आणि तरीही अफगाणिस्तान, इराक व इराण हे नेमके कुठे आहेत, याचे अचूक उत्तर अनुक्रमे १६ टक्के, १५ टक्के व २० टक्के एवढ्याच मुलांना देता आले१९७० सालापासून अमेरिकन साम्राज्य खचायला सुरुवात झालेली आहे. २०१० पर्यंत ते संपुष्टात आलेले असेल, असे एक निरीक्षण पूर्वीच नोंदविण्यात आलेले आहे. जगावरचा आर्थिक वरचष्मा टिकविण्यासाठी अमेरिकेचा सध्या कसा आटापिटा चाललाय, हे आपण पाहतोच आहोत. आता तिथल्या ज्ञानपिपासेचाही बोजवारा उडू लागलाय, असे वरील उदाहरणावरून वाटते. तरीही असे सुचवावेसे वाटते की, नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने विद्यार्थ्यांपेक्षा समाजाचे राजकीय, वैचारिक, आर्थिक नेतृत्व करणाऱ्या मंडळींच्या भूगोलज्ञानाचे सर्वेक्षण करावे. त्याचा निष्कर्ष कदाचित जास्तच धक्कादायक असेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@