‘अभाविप’च्या ‘त्या’ शिस्तबद्ध मोर्चाची पंचविशी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2018
Total Views |
 
 
जळगाव, ६ सप्टेबर :
विना-अनुदानित महाविद्यालयांतून चालणारी विद्यार्थ्यांची वारेमाप पिळवणूक आणि दुसरीकडे सरकारी शाळा-महाविद्यालयांची दुर्दशा हे अस्वस्थ करणारे चित्र बदलायला सिध्द झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गावोगावच्या तरुण कार्यकर्त्यांच्या निर्धाराने १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी मंत्रालयावर मोर्चां काढला होता. या मोर्चाला गुरूवारी, ६ सप्टेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, मोर्चात सर्वाधिक १२ हजार संख्या जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होती. त्यात विद्यार्थिंनी ३० ते ४० टक्के होत्या. जळगाव शहरातून २ हजार विद्यार्थी मोर्चात सहभागी होते.
 
 
हा १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा मुंबईच्या रस्त्यांवरून अत्यंत शिस्तीत तरीही आवेशपूर्ण घोषणा देत मंत्रालयावर धडकला. कुठेही गडबड-गोंधळ न करता त्यांनी प्रभावीपणे आपल्या मागण्या मांडल्या आणि तितक्याच शिस्तीत सर्वजण आपापल्या गावी परतले. ना कुठे तोडफोड-ना कोणती नारेबाजी. पंचवीस वर्षांपूर्वी ही गोष्ट साधी  नव्हती.
 
 
मोर्चासाठी महाराष्ट्रातील अक्षरशः प्रत्येक गाव पिंजून काढले गेले. सर्व महाविद्यालयांपर्यंत कार्यकर्ते पोहचले. अनेकजण महिनाभर प्रवास करीत होते. नियोजनाचे आणि नेतृत्वाचे एक अद्भूत प्रशिक्षण नकळतपणे कार्यकर्त्यांच्या या पिढीला मिळत होते. आपापल्या जिल्ह्याचे लक्ष्य नक्की करणे, त्याप्रमाणे तालुका आणि गावांमधील संख्या नक्की करणे, प्राचार्य व व्यवस्थापनांना माहिती देणे, पूर्वतयारीसाठी त्यांची
 
 
परवानगी शक्यतो. विनासंघर्ष मिळवणे, प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करणे व तो धडाक्यात मांडणे, दिवसभर संपर्क मोहिम काढणे आणि रात्री भिंती रंगवणे असा हा विलक्षण ‘काळ’ या पिढीला भारून टाकत होता. ७ सप्टेंबर, १९९३ च्या मुंबईत निघालेल्या या ‘विराट’ मोर्चाने महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळीला एक सकारात्मक दिशा दिली. गावोगावच्या विद्यार्थ्यांना ‘व्यवस्था परिवर्तनाचा’ एक शिस्तबद्ध मार्ग आणि कार्यकर्त्यांना अडचणींचे डोंगर फोडणारा प्रचंड आत्मविश्वास दिला. शिवाय संघर्षातही ‘विधायक’ दृष्टी ठेवण्याचा एक कायमस्वरूपी संस्कार रुजला.
 
 
निमित्त मोर्चाचे पण धडे मिळाले शिस्त आणि नियोजनाचे
एकाही विद्यार्थ्यांने विनातिकीट प्रवास करून मोर्चाला यायचे नाही हा स्वयंघोषित दंडक. ज्यांना प्रवासखर्च शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी थोडीफार मदत करणारे देणगीदार शोधणे, गाड्यांचे वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करणे, कोठेही अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घेणे, पोलिसांशी संपर्क ठेवत पालकांनाही भरवसा देणे, मुंबईच्या कार्यालयाशी सतत संपर्क ठेवणे, युवा अवस्थेतच सर्व शहाणपण कार्यकर्ते आत्मविश्वासाने शिकले.
 
 
विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय
२५ वर्षापूर्वी आजच्यासारखे महिलांना स्वातंत्र्य नव्हते. मोर्चासाठी मुंबईला जाऊ देणे ही तर अवघडच गोष्ट होती. परंतु, अ.भा.वि.प. वर असलेल्या विश्वासामुळे हे साध्य झाले. मोर्चात सर्वाधिक विद्यार्थिनी जळगाव जिल्ह्यातून होत्या. प्रवासात आणि मुंबईला विद्यार्थिनींच्या सुरक्षेची आणि भोजनाची विशेष काळजी घेण्यात आली. मुंबईला कार्यकर्त्यांनी घराघरातून भोजनाची व्यवस्था केली होती.
 
 
असे झाले नियोजन
सुमारे १ वर्षापासून नियोजन सुरु झाले होते. स्थानिक पातळीवर सुरुवात झाली. जळगाव शहराचे १७ भाग करून महाविद्यालये, वसतिगृह आदी ठिकाणी बैठका घेऊन नियोजन करण्यात आले. मोर्चाच्या २ महिने अगोदर अनेक कार्यकर्ते सामान घेऊन कार्यालयात मुक्कामी आले होते. वस्ती व पाड्यात जाऊन विद्यार्थी संघटित करण्यात आले. स्थानिक महाविद्यालयाच्या समस्यांबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आली. स्थानिक ते राज्य पातळीपर्यंतच्या समस्या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. घरून आणलेले डबे, एकाच्या डब्यात ऐनवेळी चार-चार जणांचे जेवण, सायकलचा भरपूर वापर करण्यात आला. फोन वगैरे सुविधा जवळपास नव्हती, पैशांची चणचण नव्हे तर खडखडाटच होता.
 
 
यांचा होता प्रमुख सहभाग
अ.भा.वि.प.चे तत्कालिन जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पाटील, रवींद पाटील, प्रा. मनिष जोशी, मनीषा खडके (चौधरी), माधुरी अयाती (पुंडे), स्वाती फेगडे (फिरके), मंगेश जोशी,वैशाली धर्माधिकारी, अनिल केर्‍हाडे, भानुदास येवलेकर, छाया पाटील आदींचा यात सहभाग होता.
 
 
यांचे राहिले मार्गदर्शन
भरतदादा अमळकर, दिलीप रामू पाटील, संजय बिर्ला, गिरीश महाजन, स्मिताताई वाघ, राजेश पांडे यांनी नियोजनात आणि आर्थिक सहाय्य उभारण्यास अत्यंत मोलाची मदत केली होती.
 
 
या घोषणा ठरल्या प्रेरणादायी
शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे
उठ दोस्ता उगार मूठ तू तुझ्या शिक्षणाची थांबव लूट
 
@@AUTHORINFO_V1@@