कुंभमेळा हा भारतीय जीवनाचे प्रतीक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |



 

सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
 

मुंबई : कुंभमेळा हा भारतीय जीवनाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. तसेच, जानेवारी महिन्यापासून आयोजित करण्यात येणाऱ्या कुंभमेळ्याचा अनुभव सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही भैय्याजी जोशी यांनी केले.

 

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अनोखा संगम असलेलला संस्कृती कुंभ हा सोहळा बुधवारी मुंबईतील जुहू परिसरातील इस्कॉन मंदिराच्या सभागृहामध्ये पार पडला, त्यावेळी भैय्याजी बोलत होते. चित्रपट, टीव्ही उद्योगक्षेत्र आणि विचारवंतांना कुंभाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबईत पहिल्यांदा वैचारिक कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश राज्य सरकार, उत्तर प्रदेश पर्यटन विभाग, ‘नैमिषारण्य फाउंडेशन’ आणि ‘संस्कृति गंगा’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एस्सेल समुहाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांच्यासह संगीतकार अजय-अतुल, सेन्सार बोर्डाचे अध्यक्ष गीतकार प्रसून जोशी, एनएसडीचे संचालक वामन केंद्रे, सिनेदिग्दर्शक मधूर भांडारकर, मनोज जोशी, भरत दाभोळकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अशोक पंडित, गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर, गायक कैलाश खेर, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी, अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता अभिजित खांडकेकर आदी उपस्थित होते. यादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन यांनी तयार केलेले गीत मनोज तिवारी यांनी सादर केले.

 

कुंभ हे एकतेचे प्रतिक

कुंभ हा आम्हाला लाभलेला अद्वितीय वारसा आहे. आपल्या मोठ्या परंपरांची देणगी मिळाली आहे आणि याच परंपरांनी आपल्याला प्रवाहाप्रमाणे बदलण्याची शिकवणदेखील दिली आहे. जगभरात अनेक संस्कृती होत्या. त्यापैकी अनेक संस्कृतींचा नाश झाला. परंतु आपली संस्कृती आजही टिकून आहे आणि याच संस्कृतीच्या जोरावर आपण जग जिंकल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. कुंभमेळा हे आपल्या एकतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतिक आहे. 2015 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या संस्कृती कुंभच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि प्रत्येकाने सकारात्मक भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्याचे व्यवस्थापन ही देशाची ताकद दर्शवते. तो यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनदेखील फडणवीस यांनी यावेळी केले.

 

कुंभमेळ्यात भेदभाव नाही - योगी आदित्यननाथ

आपल्या संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्यामध्ये मुंबई आणि चित्रपटसृष्टीचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले. कुंभमेळ्यामध्ये जात, लिंग, पंथ या आधारे कोणताही भेदभाव करण्यात येत नाही. तसेच जे लोक या कुंभ मेळ्याला उपस्थित असतील तेच या कुंभ मेळ्याचे अँबेसेडर्स असतील आणि त्यांच्याच माध्यमाधून सकारात्मक संदेश समाजाला देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दि. 15 जानेवारी ते 4 मार्च 2019 या कालावधीत कुंभांचे आयोजन करण्यात येणार असून यादरम्यान पाच वैचारिक कुंभही आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसुधैव कुटुंबम हा संदेशदेखील या माध्यमातून देण्यात येणार असून या कुंभमेळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले. यादरम्यान त्यांनी आपल्या संत बनण्याच्या आठवणींनाही उजाळा दिला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@