चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये मुंबईत : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |


 

मुंबई : आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा, संशोधन व्हावे, यासाठी ‘फ्युचर वी वॉन्ट - ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन’ या संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस दि. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या दरम्यान मुंबई आयआयटी येथे आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने या जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
 

या परिषदेसाठी गठित सुकाणू समितीची पहिली बैठक आज मंत्रालयात मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक दौलत देसाई, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम आणि अभिसरण सोसायटीचे सल्लागार व माजी केंद्रीय सचिव पी. जी. धार चक्रवर्ती आदी यावेळी उपस्थित होते.

 

दि. 29 जानेवारी 2019 रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आपत्ती निवारणासंदर्भातील जागतिक संरचनेच्या अंमलबजावणीमधील आव्हानांवर या परिसंवादात चर्चा होणार आहे. परिषदेत विविध सत्रांमध्ये आठ विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये जागतिक पातळीवरील तज्ज्ञ व्याख्याने देणार आहेत. तसेच विविध संशोधकांना परिषदेत आपले शोधनिबंध मांडता येणार असून हे शोधनिबंध नंतर जागतिक पातळीवरील प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या परिषदेतील मांडण्यात येणारे शोधनिबंध, संशोधन व नाविन्यपूर्ण स्टार्टअपसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. येत्या दि. 10 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत लघुनिबंध पाठविता येतील. परिषदेत लोकप्रतिनिधी, विविध शहरांचे महापौर, आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@