एक शहर संपर्कापलीकडचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018   
Total Views |


 

‘ग्रीन बँक’मध्ये साधारण 150 नागरिक वास्तव्यास आहेत. या सगळ्या संपर्कहीन व्यवस्थेतही येथील नागरिक आपल्या जीवनाला आजच्या आधुनिक काळात मिळालेले वरदान समजतात, हे विशेष.


आजचे युग म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाचे युग. संपर्क व्यवस्था मजबूत करणे आणि ती टिकविणे ही आजमितीस काळाची गरज झाली आहे. संपर्काशिवाय व्यक्तीचे अस्तित्व आजच्या जगात टिकणे, हे दुरापास्तच. आधुनिक युगाचा आविष्कार म्हणा किंवा अजून काही, पण मानवाने काळाची पावले ओळखून आपल्या सीमा या केव्हाच पार केल्या आहेत. परंतु, मोबाईल, इंटरनेट अशा भौतिक सुविधांनी वेढलेल्या मानवी जगात एक शहर असेही आहे, ज्याला भौतिक सुविधांचे वावडे आहे. हे शहर आफ्रिका-आशियातील कुठल्या मागास-विकनसशील देशात नाही, तर ते आहे चक्क महासत्ता असलेल्या अमेरिकेत. अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील पोकाहोटस काऊटी येथील ‘ग्रीन बँक’ हे शहर तंत्रज्ञानापासून आजही दूर आहे. या शहरात मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी शांतता नेहमीच अनुभवास येते. या शहरातील नागरिक आणि येथे येणारे नागरिकही मोबाईल, वायफाय आणि दूरचित्रवाहिनी संच वापरत नाही.

 

ग्रीन बँक या शहरात जगातील सर्वात मोठा ‘स्टीरबल रेडिओ सी. बार्द ग्रीन बँक’ हा टेलिस्कोप (दुर्बीण) लावला आहे. त्यामुळेच या शहरात विद्युत चुंबकीय लहरी उत्पादित करणाऱ्या सर्व उपकरणांवर बंदी आहे. कारण, रेडिओ टेलिस्कोप अवकाशामधून येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींची ओळख पटवितो. त्यामुळे इतर साधनांमुळे जसे मोबाईल, वायफाय, रेडिओ, वायरलेस फोन यांच्यामुळे निर्माण झालेल्या लहरी या टेलिस्कोपच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अंतराळातून प्राप्त होणाऱ्या लहरींचे योग्य प्रकारे आकलन होण्यात बाधा निर्माण होऊ शकते. तसेच, या शहरात पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. याचे वैज्ञानिक कारण असे की, गॅसोलीन इंजिनमध्ये इंजिन कार्यान्वित होण्यासाठी स्पार्कचा वापर केला जातो आणि त्यामुळे इंधन व इंजिन यांचा संपर्क होऊन विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होतात. केवळ ग्रीन बँकच नाही तर, भोवतालचा जो साधारणतः 13 हजार स्क्वेअर फूट पसरलेला परिसर आहे, तोही ‘डिव्हाइस फ्री क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. या परिसराला ‘राष्ट्रीय रेडिओ क्वालिटी क्षेत्र’ संबोधले जाते. हे ठिकाण व्हर्जिनिया आणि मेरिलँडच्या सीमेवर आहे.

 

आता, इतकी सगळी बंदी असतानाही संपर्क ठेवणे ही देखील काळाची गरज. त्यावर उपाय म्हणून येथे पे-फोन बूथचा पर्याय सुचविण्यात आला आहे. ‘ग्रीन बँक’मध्ये साधारण 150 नागरिक वास्तव्यास आहेत. या सगळ्या संपर्कहीन व्यवस्थेतही येथील नागरिक आपल्या जीवनाला आजच्या आधुनिक काळात मिळालेले वरदान समजतात, हे विशेष. भारतासह सारे जग लहान मुलांनी मोबाईल सोडून मैदानी खेळ खेळावे म्हणून प्रयत्नशील आहे. अशावेळी येथील लहान मुले मैदानी खेळ आणि मित्रपरिवारासमवेत गप्पा यांना प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे आधुनिक जगाची आवश्यकता असलेले व्यक्तिमत्त्व विकास आणि खिलाडू वृत्ती, शारीरिक सक्षमता यांचा विकास येथील मुलांमध्ये झालेला सर्वार्थाने दिसून येतो. अशा या शहराला जगातील इतर नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. जगभरातील विविध देशांतून येथे नागरिक स्थलांतरित होत आहेत. काही स्थलांतरितांच्या मते, त्यांचे शारीरिक दुखणे केवळ या शहरात वास्तव्यास आल्यामुळे दूर झाले. तसेच, शांतता आणि एकांत मिळत असल्याने चिंतन, मनन यांना वेळ देणे व ते करणे सहज साध्य होत आहे. त्यामुळे नाविन्याची अनुभूती आणि निर्मिती करणे सहज सोपे होते.

 

आजच्या या धकाधकीच्या जीवनात अशी शांतता मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. परिवेशाशी समायोजन साधण्याकामी व्यक्तीला तिच्या मानसिक आणि भौतिक यंत्रणेशी गतिशील संगठन नेहमीच साधावे लागते. ते शक्य करण्यासाठी आवश्यक असतो तो स्वतःचा वेळ. मात्र, भौतिक साधनांवर अवलंबून असणारे आपण या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे व्यक्तिमत्व विकसित होण्यास बाधा निर्माण होते. याची जाणीव आपल्याला असायला हवी. आणि ‘ग्रीन बँक’ शहराला जरी तेथील स्थितीमुळे भौतिक सुविधांचे वावडे असले तरी, तेथील नागरिकाची नसणारी तक्रार आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन याला आपण नमन करावयास हवे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@