समर्थस्थापित मारुती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |

 

 
हनुमानाच्या अंगी असलेल्या शक्ती, वज्रदेह, युक्ती (बुद्धी) व भक्ती किंवा स्वामीनिष्ठा हे गुण उपास्याच्या अंगी थोडेतरी यावेत. धर्मस्थापनेसाठी हिंदवी स्वराज्यासाठी मारूतीच्या अंगी असलेल्या गुणांची व रणकर्कश आवेशाची जरूरी असते, हे रामदासांना ठाऊक होते.
 

समर्थांनी ‘हिंदू धर्म व संस्कृती रक्षण’ या आपल्या कार्याची दिशा ठरवून ते मसूर व कराड परगण्यात आल्याचे आपण पाहिले. आपल्या कार्यासाठी हिंदवी स्वराज्य असले पाहिजे, हाही विचार त्यांच्या मनात होता. धार्मिक पातळीवर लोकांना एकत्र आणून लोकोद्धाराच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. ठिकठिकाणी मूर्ती स्थापन करून लोकांना भक्तिमार्गाला लावावे, म्हणजे त्यानिमित्ताने लोकं एकत्र येऊन त्यांना स्वधर्मिय राज्याची ओढ लागेल, हा त्यांचा उद्देश होता. स्वामींनी हेतुपुरस्सर रामराज्याची वर्णने त्यांच्या साहित्यात आणली. ती वाचून, ऐकून असे रामराज्य आपल्याला हवे, ही आशा लोकांच्या मनात निर्माण होईल, असे स्वामींना वाटत होते; नाहीतर उगीच हजारो वर्षांपूर्वी झालेल्या रामराज्याची वर्णने लोकांना ऐकवण्यात काय स्वारस्य होते? समर्थांनी आपली शिष्यशाखा वाढवायला सुरुवात केली. आपल्या कार्यास उपयोगी पडतील, अशांना अनुग्रह द्यायला सुरुवात केली. अनेकांनी आपणहून स्वामींकडून अनुग्रह घेऊन समर्थकार्यास अनुमती दर्शवली. समर्थांच्या मनात होते की, आपले लोक बलशाही होऊन त्यांचे शौर्य, वीरता धार्मिक अत्याचारांविरोधात राजकीय हेतूने वापरता येईल. त्याद्वारे आपले रामराज्य या भूतलावर आणता येईल, तथापि समर्थांचा उद्देश असा असावा, हे काहींना मान्य नाही. त्यांच्या मते, रामदास हे गतानुगतीक रूढी पाळण्यासाठी मारूतीची मंदिरे बांधत होते. प्रा. न. र. फाटक हे असे मानणाऱ्या पैकी एक होते. या संदर्भात ते लिहितात, “समर्थांनी महाराष्ट्रात कृष्णातीरी वस्ती केली, तेव्हा काही मारूती स्थापिले. यावरून लोकांचे शरीरसामर्थ्य वाढविणे, हा समर्थांचा हेतू होता, असे भासविण्याचा रिवाज पडला आहे.”

 

प्रा. फाटकांच्या या विधानाचा समाचार त्यानंतरच्या अनेक विद्वानांनी घेतला आहे. आपल्या आराध्य दैवताचे गुण आपल्यात यावेत यासाठी उपासना असते. रामदास स्वामींनी मारूतीची मंदिरे स्थापन केली; कारण, हनुमानाच्या अंगी असलेल्या शक्ती, वज्रदेह, युक्ती (बुद्धी) व भक्ती किंवा स्वामीनिष्ठा हे गुण उपास्याच्या अंगी थोडेतरी यावेत. धर्मस्थापनेसाठी हिंदवी स्वराज्यासाठी मारूतीच्या अंगी असलेल्या गुणांची व रणकर्कश आवेशाची जरूरी असते, हे रामदासांना ठाऊक होते. त्यात रूढी-परंपरांचा संबंध येतो कुठे? त्यामुळे प्रा. न. र. फाटकांच्या वरील विधानात फारसा अर्थ नाही, हे स्पष्ट होते. श्रीरामांनी रामदासांवर अनुग्रह करून त्यांना मारूतीच्या स्वाधीन केले होते. अन्यायी असुरांचा नाश करणारा रणकर्कश राम आणि त्याला साहाय्य करणारा वज्रदेही हनुमान यांचे स्वामींना विलक्षण आकर्षण होते. इ. स. 1645 पासून महाराष्ट्रात स्वामींनी मारूतीची मंदिरे ठिकठिकाणी स्थापन करायला सुरुवात केली. कृष्णाखोऱ्या त त्यांनी स्थापन केलेले बरेचसे मारूती हे ‘वीर मारूती’ म्हणजेच ‘प्रताप मारूती’ आहेत. प्रताप मारूतीची मूर्ती एकटीच उभी असते. त्याच्या पायाखाली मारूतीने राक्षस चिरडलेला असतो. तत्कालीन राजकीय परिस्थितीत रामदासांना हे प्रतीक लोकांसमोर ठेवावेसे वाटले; कारण, मारूती हा दृष्टांचा संहारक आहे. त्यांने पायाखाली राक्षस चिरडला म्हणजे जुलमी अत्याचारी मोगलसत्ता अशीच पायाखाली चिरडली जाईल, हा संदेश हनुमानाच्या उपासनेतून आपोआप मिळत होता. रामाने धर्म स्थापण्यासाठी असुरांबरोबर युद्ध करून त्यांचा नायनाट केला. त्या धर्मयुद्धात त्याला साहाय्य करणारा ‘वज्रदेही मारूती’ होता. पर्वत हलविण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी होते. रामदासांच्या मनात होते की, त्यावेळीच्या असुरांविरूद्ध युद्ध केले जावे. त्याचे नेतृत्व रामासारखे गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, त्याने करावे आणि त्याचे पाईक हनुमानासारखे शूर व स्वामीनिष्ठ असावे, म्हणून स्वामींनी मारूती मंदिरे स्थापण्याचा धडाका लावला.

 

समर्थस्थापित काही मारूती ‘दास मारूती’ही आहेत. रामाच्या समोर हात जोडून आज्ञेची वाट पाहणारा हा ‘दास मारूती’ असतो. रामदासांना या उपासनेतून बलवान स्वामीनिष्ठ सेवकांची फळी उभी करायची होती. लोकांना नुसते अत्याचाराविरुद्ध बंड करा, असे सांगण्याचा नव्हता, तर विवेकी राहून प्रसंगी आज्ञापालन करणारा स्वामीनिष्ठ सेवकही त्यांना घडवायचा होता. स्वामींनी ठिकठिकाणी मारूती स्थापन केले. त्यापैकी ‘अकरा मारूती’ विशेष प्रसिद्ध आहेत. शहापूर, मसूर, शिंगणवाडी, उंब्रज, माजगाव, बेहेगाव, मनपाडळे, पारगाव, शिराळे येथे प्रत्येकी एक आणि चाफळला दोन असे हे ‘अकरा मारूती’ आहेत. हे ‘अकरा मारूती’ सातारा जिल्ह्यात आहेत. हा भूभाग धाडसी लोकांचा आहे. योग्य नेतृत्व मिळाले, तर ही माणसे आपल्या कार्यास उपयोगी पडतील, अशी त्यामागे रामदासांची भावना असावी. त्यांच्या गुणांच्या विकासाची वाट रामदासांनी मोकळी केली. या अकरा मारूतींपैकी आठ स्थाने कृष्णेच्या काठी आणि कृष्णा-कोयना यांच्यामध्ये आहेत, तर तीन स्थाने वारणेच्या दक्षिणोत्तर आहेत. चाफळ हे संप्रदायाचे मुख्य क्षेत्र असून तेथे राममूर्ती सन्मुख ‘दास मारूती’ व मागील बाजूस ‘प्रताप मारूती’ची स्थापना केली आहे. आता समर्थकृत ‘अकरा मारुतीं’ची थोडक्यात ओळख पाहू.

 

शहापूरचा ‘वीर मारूती’- याची स्थापना इ.स. 1644 मधील आहे. मूर्तीची उंची सहा फूट, चेहरा उग्र.

 

मसूर येथील ‘सुंदर मारूती’- स्थापना इ.स. 1645. नावाप्रमाणे ही देखणी मूर्ती आहे. उंची पाच फूट असून याला ‘महारूद्र हनुमान’ही म्हणतात.

 

शिंगणवाडी येथील ‘खडीचा मारूती’- स्थापना 1649 साली. मूर्तीची उंची साडेतीन फूट. परिसर निसर्गरम्य आहे. येथे जवळच शिवाजी व स्वामींची भेट झाल्याचे ठिकाण आहे.

उंब्रजचा मारूती - स्थापना इ.स. 1649. मूर्तीची उंची सहा फूट, चेहऱ्यावर बालभाव आहेत.

 

माजगाव येथील मारूती - इ.स. 1649. मूर्तीची उंची पाच फूट. या मारूतीचे तोंड चाफळच्या दिशेने आहे.

 

बेहेगाव येथील मारूती - स्थापना इ.स. 1651 साली. बहेनदीच्या बेटावर, प्रवाह अडवण्याच्या पवित्र्यात. येथे समर्थांना साक्षात मारूतीने दर्शन दिल्याची आख्यायिका आहे.

 

मनपाडळे येथील ‘विशाल मारूती’- उंची साडेपाच फूट. स्थापना इ.स. 1651 साली.

 

पारगावचा ‘गोंडस मारूती’- स्थापना इ.स. 1652. मूर्ती दीडफूट.

 

बत्तीस शिराळे येथील ‘भव्य मारूती’- स्थापना इ.स. 1654. मूर्ती सात फूट उंच. ही मूर्ती खूप छान आहे.

 

चाफळचा ‘दास मारूती’- स्थापना इ.स. 1648. मूर्ती सहा फूट उंच असून रामासमोर हात जोडून आहे.

 

चाफळचा ‘प्रताप मारूती’- स्थापना इ.स. 1648. मूर्तीची उंची सुमारे सात फूट. मूर्ती भव्य, रेखीव व सडपातळ.

 

या ‘अकरा मारुतीं’ची भूमी समर्थांच्या सान्निध्याने पावन झालेली आहे.

 
 
- सुरेश जाखडी
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@