माणगावात पोलिसांकडून स्फोटके जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |


 

 

छाप्यात आढळल्या ९६५ डिटोनेटर्स आणि ४६ जिलेटिन कांड्या
 

रायगड : जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ढाळगाव येथे पोलिसांनी छापा टाकून ९६५ डिटोनेटर्स आणि ४६ जिलेटिन कांड्या, त्यावर पॉवर ९० इम्युलेशन एक्सप्लोझिव्हचे २५ बाय १२५ ग्रॅम, एक निळ्या रंगाचा प्लास्टिकचा ५० लिटरचा ड्रम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नूर महमद हुमर जाहीर काझी याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या स्फोटकांचा साठा करून ती बाळगल्याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. त्याचा अन्य कुठे वापर केला जाणार होता का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

 

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी माणगाव तालुक्यातील ढाळगाव येथे स्फोटकांच्या साठ्याबाबत अधिक माहिती देताना, चार-पाच दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील एक आदिवासी मच्छीमार स्फोटक पदार्थ हाताळताना एक आदिवासी जखमी झाला होता. पाण्यात मच्छीमारी करताना आदिवासी मच्छीमार जखमी कसा झाला, याची चौकशी करीत असताना पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्याचे सांगितले. हे आदिवासी मच्छीमार मासेमारीसाठी जाताना या प्रकारची स्फोटके सोबत घेऊन जात असत. ही विस्फोटके त्याच्या प्रवाहात विशिष्ट जागी ठेवली असता त्यांचा स्फोट होऊन आवाजाने मेलेले मासे एका जागी गोळा होत. त्यामुळे मच्छीमारांना ते जमा करता येत असत. मात्र, असे करीत असतानाच हा आदिवासी मच्छीमार जखमी झाला होता. आदिवासी मच्छीमारांकडे ही स्फोटके कुठून आली, याचा शोध घेताना पोलिसांना नूर मोहम्मद यांचे नाव समजून आले. हा नूर मोहम्मद आदिवासी मच्छीमारांना स्फोटकं विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

नूर मोहम्मद याच्याकडे ही विस्फोटके विकण्याचा आणि खरेदी करण्याचा कोणताही परवाना नव्हता, असेही चौकशीत आढळून आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आले आहे. नूर मोहम्मद याच्याकडे केलेल्या चौकशीनुसार जिलेटिन आणि डिटोनेटर तसेच स्फोटकासाठी लागणारे सामान एका अधिकृत विक्रेत्याकडून घेत असल्याचे समजले. पोलीस आता या अधिकृत विक्रेत्याची कसून चौकशी करीत आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@